" दरवर्षी प्रमाणे नागपंचमी या सणापासून सर्व सणांना सुरुवात झाली.. पाहायला गेलं तर दरवर्षी पेक्षा या वर्षी सण जरा लवकरच आले आहेत हो ना....?
अहो तसही सण लवकर असले किंवा उशिरा असले तरी देखील मराठी माणसाच्या, कोकणवासीयांच्या मनात उत्साह प्रचंड प्रमाणात संचारत असतो...
धावपळीच्या युगाला सणां निमित्त का होईना विराम मिळतोच. पारंपारिक कला जोपासत आलेले कोकण पावसाळ्यात अजूनच खुलून दिसतं. हिरवं गार रान, धुकं पडलेलं डोंगर, दऱ्या, खळखळणाऱ्या नद्या, पक्ष्यांचा किलबिलाट, वाऱ्याची झुळूक, पावसाच्या सरी आणि त्याच सोबत इंद्रधनुष्याची कमान हा नजारा मन प्रसन्न करून टाकतो. असं काही ऐकायला, वाचायला मिळालं कि, गावी जायची इच्छा होते ना..? माझी सुद्धा झाली आहे परंतु, अडलंय कुठे...! तर, पुढील काहीच दिवसामध्येच आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे.. त्याच्या आतुरते मध्ये सर्व कोकणवासी गावी जाण्यास सज्ज आहेत..
'गणेशोत्सव' नाव घेतलं कि सर्वांच्या घरी विराजमान होणारे 'बाप्पा' दिसू लागतात मग काय भक्तांच्या मनात एक वेगळाच आनंद, उत्साह आणि त्याचसोबत जागी होते ती गावाकडची ओढ....
काम कोणतेही असो पण, शिमगा आणि गणेशोत्सव यांच्यासाठी सुट्ट्या राखून ठेवाव्या लागतात.. कारण भक्तांचा नादच आगळा वेगळा असतो, सध्याचंच बघा ना दोन महिन्यांपूर्वी गाड्या बुकिंग करून राखीव करून ठेवल्या गेलेत.. मागील 'कोरोना', 'लॉकडाऊन' या सारख्या कालावधीत या सणांचा मनसोक्त आनंद घेता आला नव्हता, त्यामुळेच या वर्षी नव्या रंगात, नव्या आनंदात, जल्लोषात गणरायाचे आगमन आणि जागरण केले जाणार आहे, प्रत्येक भक्तजण गणरायाची आतुरतेने वाट पाहत आहे..
गणेशोत्सवाच्या निमित्ताने समूह एकत्र येऊन एकमेकांमधील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, आनंदासोबत नाती अजून अतूट केली जातात, तसेच कोकणच्या पारंपारिक कलेचा आदर ठेऊन ती कला जोपासली जाते.. विशेषतः गावी 'शक्ती-तुरा' या नृत्यप्रकाराला सर्वाधिक महत्व दिले जाते.. लोकांमध्ये एकोपा जागृत राहणे हे या सणांमधील मुख्य हेतू असतो.. हे सर्व अनुभवायला गावाकडची ओढ हाक मारत असते, पोटाची खळगी भरण्यासाठी जरी मुंबई चा हात धरावा लागला असला तरी देखील मायेची, सुखाची झोप, समाधान मिळण्याचे एकमेव ठिकाण 'आपलं गाव'...
परतीची वाट धरावी लागणार हे माहित असून देखील खेचत नेते ती खरी गावाकडची ओढ…..
- विशाखा चंद्रकांत आगरे
(दापोली, पांगारी)
मुख्यसंपादक