ये “बये” इकडे ये गं जरा !!
विद्या किचन मध्ये दुपारचं जेवण झाल्यावर साचलेली भांडी आवरत होती, इतक्यात विजय ने तिला आवाज दिला !
विद्या हातातलं काम सोडून लगेच बाहेर आली, बघते तर आईचं डायपर भिजून खालची चादरही भिजली होती; विद्याने विजय ला बाजूला करून स्वतः ती चादर काढली नि दोघांनी मिळून आईच डायपर बदली केलं, विद्याने आईच्या चेहऱ्यावर स्मित हास्य करत प्रेमाने हात फिरवला आणि चादर धुवायला निघून गेली.
विजय ला प्रश्न पडला होता वर-वर दोघांचे खटके उडत असूनसुद्धा वेळेला, ही आईचं एवढं सगळं करत आहे.
लेक असते तरी एवढं केलं नसतं तेवढं सून करतेय म्हणजे माझंच भाग्य समजायचं विजय मनातून थोडा सुखावला.
आईच ब्रेनचं ऑपरेशन झालं आणि 4 महिने व्यवस्थित होती आई चांगली बरीही झाली होती पण काय झाले कुणास ठाऊक आई पुन्हा आजारी पडली ती जाग्यावरच.
सहा महिने झाले होते, विद्या आणि विजय आईच्या देखरेखीसाठी घरीच थांबले होते, विजयचा छोटा भाऊ संजय एकप्रकारे कसरत करूनच घरातली आर्थिक बाजू सांभाळत होता.
अहो’ ऐकलात का ? तुम्ही चहा घेणार का ?
विद्याने सर्व कामे उरकून विजय ला आवाज देत प्रश्न केला.
हो… म्हणून विजयने चहाला जणू आमंत्रणच दिलं आणि पुढच्या दोन सेकंदात चहा पुढ्यात हजर झाला होता.
दहा वर्षांची गुंजन बाहेर खेळत होती विद्याने तिलाही हाक मारत चहा घ्यायला बोलावले, तिघांनी एकत्रच बसून चहा घेतला नि विद्या थोडी आईच्या बाजूलाच पहूडली.
गुंजन चहा घेऊन पुन्हा बाहेर खेळायला गेली, तसे तिचे पाय काय तिला घरात बसू देत न्हवतेच.
विजय या क्षणीही तोच विचार करत होता, आई व्यवस्थित असताना थोडी कुरबुर करणारी ही माझी बायको आज वेळप्रसंगी किती समंजसपणे आणि मायेने सगळं स्वतःच्या हाताने सासूचे सगळं काही करत होती, विजयला मनातून स्वतःचाच अभिमान वाटत होता.
थोडा वेळ गेला आणि विजयने तिला आवाज दिला….
ए बये….
आत्ताच मिटलेले डोळे किलकिले करून विद्याने विजयकडे एक प्रश्नार्थक कटाक्ष टाकला.
ये इथे बस माझ्या बाजूला थोडे बोलायचे आहे !!
विद्या अगदी थोडी लाजत च पण विजयला जाणवणार नाही अशी उठली आणि त्याच्या मांडीवर डोके ठेऊन अलगद पहुडली; विद्या थोडी लाजली हे विजय ला समजणार नाही मग तो नावाचा विजय कसला.
विजय ने डोक्यावर हात ठेवत तिला प्रश्न केला, अगं काही नाही गं…….
विजय : तू आणि आई तशा एकमेकींना सांभाळून घ्यायच्या, माझं काही चुकलं तर दोघीही माझ्यावर अगदी तुटून पडायच्या, तरीही तुमच्या दोघीत थोडी कुरबुर व्हायचीच नाही का! मग तू आता एवढी म्हणजे मी गेले पाच – सहा महिने बघतोच आहे, तू आईसाठी किती करतेयस ते …..
विजय चं वाक्य मध्येच तोडत विद्या बोलू लागली…
विद्या : अहो तुम्हाला काय वाटतं, आम्ही भांडलो तरीही सुख दुःखात एकमेकींना नेहमीच साथ दिलेली आहे, आता घरात माझ्या शिवाय कोणी आहे का तुम्ही आहात म्हणून मला काही वाटत नाही आहे, माझ्या एकटीने तरी त्यांचं सगळं करता आलं असत का ? नाही !! तुम्ही सोबतीला आहात म्हणूनच होतय ना! आणि भाऊ बघा, आपण दोघेही घरी आहोत! खर्च काय कमी होतोय का ? ते एकट्याने सगळं खर्च करतायत, तुम्ही घरात राहिललायत, हो पण आईसाठी राहिलायत हे मला माहितेय, पण – आज सर्व घरची जबाबदारी भाऊ एकटे खांद्यावर घेऊन संभाळतायत आणि निभावतायत.
अहो – माझं काय , तुम्ही दोघांनी जे केलंय आईसाठी ते काय कमी आहे का ? हे मी नाही सर्वच बोलतायत ज्यांनी तुम्ही केलेली धडपड बघितलेय ते सगळेच बोलतायत….
आणि मी करतेय ते काय हो, माझी आई असती तर केलंच असतं ना, मग ह्या पण माझ्या आईच आहेत ना !! मग थोडं यांच्यासाठी केलं म्हणून काय बिघडलं, यांना मुलगी नाहीय ना मग मी आता यांची मुलगीच आहे ना !!
एवढं बोलता बोलता विद्या उठून आई जवळ गेली नि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, हो ना ओ आई मी तुमची मुलगीच आहे ना !!
आईने शब्द ऐकले आणि दोघींच्याही डोळ्यांतून अश्रू ओघळले, विद्याला तिच्या प्रश्नांची पोच-पावती मिळाली होती .
गहिवरल्या मनाने आणि आसवे भरल्या डोळ्यांनी विजय ने विद्या ला आवाज दिला….” बये “
विजयचा आवाज थोडा तिला जड वाटला म्हणून त्याच्याकडे बघितलं आणि दोघेही आईच्या कुशीत एक होऊन रडू लागले…
आईचे दोन्ही हात भरल्या अंतःकरणाने दोघांच्याही डोक्यावर येऊन स्थिरावले होते……
विजय हळूच म्हणाला…बये – तुला मातृदिनाच्या शुभेच्छा
आज तू माझ्या आईची आई झालीस…..
असाही एक मातृदिवस……
ही गोष्ट माझी आई आजारी असतानाची आहे, माझ्या पत्नीने माझ्या आईसाठी केलेली मेहनत मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आणि त्यावेळी एक प्रश्न पडला होता….
मला जर बहीण असती तर खरंच एवढ्या मायेने तिने आईचं एवढं सगळं केलं असत का ??
- विजय वैशाली दत्ताराम पराडकर
( आण्णा )

मुख्यसंपादक