मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते. विजयाचं, मांगल्याचं, उत्साहाचं, शुभमुहुर्ताचे प्रतिक म्हणजे गुढीपाडवा. झाडांची पानगळ होऊन नवीन पालवी फुटलेली असते. रखरखत्या उन्हात झाडे मात्र हिरवेगार असतात. उन्हाळ्यात याच झाडांची गुढी गार सावली देते. चैत्राची नवलाई झाडेच सांगतात. दरवर्षी हा गुढीपाडवा येतो. पण बालपणी्चा गुढीपाडवा हा आगळावेगळाच असतो. प्रत्येकाच्या घरासमोर ही गुढी उभारली जाते. शुभशकुनाच्या या गुढीत एक स्वच्छ काठी, त्या काठीच्या टोकावर नवे वस्त्र (साडी, ब्लाउजपिस, रूमाल), गाठी, आंब्याची पानं, कडुलिंबाची पानं, झेंडुच्या फुलांची माळ, तांब्याच्या धातुचा लोटा अश्या सर्व वस्तुंनी ही गुढी सजवली जाते.
या गुढीच्या भवती रांगोळी आणि इतर सजावट केली जाते, तिच्याकरता पाट मांडला जातो, गोड धोडाचा नैवेद्य दाखविला जातो, निराजंन उदबत्ती लावुन औक्षवण केले जाते. संध्याकाळी सुर्यास्तापुर्वी हळदकुंकु अक्षता वाहुन गुढी उतरवली जाते.
माझं गाव वाहिरा .. लहानपणी गावापासून एक किलोमीटर अंतरावर एका वस्तीवर राहायचो. सात-आठ घरांची ती वस्ती. घरापुढे मोठे चिंचेचे झाड. झाडाखाली गप्पा रंगत असे. आई, वडील, बहिणी, चुलत बहिणी, चुलत भाऊ असे 30 – 35 जणांचा मोठा परिवार होता. आज तो परिवार आणखी मोठा झाला आहे. भेटीही दुर्लभ झाल्या आहेत. परंतु लहानपणी आम्ही सर्वजण एकत्र खेळायचो. प्रत्येक सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरा व्हायचे. सर्वांची गरिबी असायची. घर अगदी छोटे होती. चार चार खणाचे माळवदाचे मातीचे घर.. गुढीपाडवा सण जवळ आला की एकमेकांना विचारायचे.. आता कोणता सण येणार आहे? तो म्हणायचा गुढीपाडवा. अन् लगेच सर्वजण म्हणायचे ‘नीट बोल गाढवा’.. सगळे फिदीफिदी हसायचे. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वजण सकाळी लवकर उठायचे. कोणाची गुढी अगोदर उभी राहते याची उत्सुकता असायची. गुढी उभा राहिल्यावर कोणाची उंच तर कोणाची बुटकी यावर चर्चा चालु व्हायची. घरचे मोठी माणसं गुढी उभारून आपापल्या कामाला लागायची. मग आम्हाला वेद लागायचे माळवदावर चढायचे. गुढीला लावलेली गाठी खाण्याचे. मग आम्ही भावंडं तीन चार जण एकत्र येऊन घरावर चढायचो. कुणाला दिसणार नाही असं सरपटत सरपटत गुढीकडे जायचो . प्रत्येक गुढीतील दोन तीन गाठी तोडायचो. मग सगळ्या गाठी एकत्र करून गुपचूप खायचो. संध्याकाळी गुढी उतरण्याच्या वेळी कळायचे गाठी तोडलेल्या आहेत. परंतु आम्ही मात्र त्यावेळी पसार झालेलो असायचो. आजही तो गोड स्वाद जीभेवर रेंगाळत आहे. आजच्या गोडी पेक्षा ती गोडी अजूनही हवीहवीशी वाटते. ‘ गुढीपाडवा आणि तो हवाहवासा गोडवा ..’ आजही आठवतो.
खरचं बालपणात प्रत्येक गोष्टीत आनंद होता. निरागस भाव भावना होत्या. भावंडांमध्ये एकोपा होता. आज दररोज गोड खाऊन गोडवा संपला आहे. तेव्हा कधीतरी गोड खायला मिळायचे. परंतु माणुसकीची गोडी होती. आनंद उत्साह ठासून भरलेला होता. आज त्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या की त्या आठवणीत मस्तपैकी रमावस वाटतं. वाटत पुन्हा एकदा लहान व्हाव .. चोरून गुढीवरच्या गाठी तोडून खावं..
आनंद देणाऱ्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
लेखक – श्री. किसन आटोळे सर
वाहिरा ता. आष्टी जि बीड
मुख्यसंपादक