खुळूक् खुळ्ळूक असा घुंगरांचा आवाज आला की शेतकऱ्याला बैलगाडी आठवते, एखाद्या गुलहौशी माणसाला लावणी आठवते आणि आम्हा शहरवासियांना रसवंती गृह आठवते!!!
भर दुपारी किंवा उन्हे उतरत्या संध्याकाळी घशाला कोरड पडलेली असताना जर हा घुंगरांचा आवाज ऐकू आला तर आपले पाय आपसूक त्या दिशेने वळतात आणि आपण त्या रसवंती गृहाजवळ जाऊन पोहोचतो.
ते सतत फिरणारे यंत्र, काचेच्या ग्लासांचा खणखणाट,रस गाळणारा एखादा दादा बर्फाची लादी फोडताना अंगावर उडणारे बर्फाच्या पाण्याचे थेंब, लिंबू, आले आणि उसाच्या रसाचा एकत्र येणारा गंध.. आपले मन सुखावून जाते..
त्या फेसाळत्या रसाचा पहिला घोट घेतला की घसा आणि पोटही गारेगार होते.
रस पिताना आपले पोट जरी गारेगार होत असले तरी उसाचा रस काढणे हे अजिबात सोपे काम नाही. उस चरकात टाकायला आणि त्यातला रस पूर्णपणे बाहेर येईपर्यंत पुन्हा पुन्हा तो उस चरकात सरकवायला खूप ताकद लागते.
आज अनेक संशोधने करून, खूप अभ्यास आणि विचारविनिमय करून मार्केटिंगचे फंडे शोधले जातात आणि शिकविले जातात. रसाच्या चरकाला घुंगरू बांधण्याची शक्कल ज्याला सुचली असेल तो ही मार्केटिंग गुरूच म्हणायला हवा…उसाच्या रसाचे दुकान आणि तालात वाजणारे घुंगरू हे समीकरण आपल्या मेंदूत फिट्ट बसले आहे की नाही!!
उसाच्या रसातही कितीतरी प्रकार मिळतात..फक्त लिंबू, फक्त आले, आलेलिंबू दोन्ही घातलेले, सैंधव मीठ घातलेला किंवा साधा रस.. यातही बर्फ घालून किंवा बिना बर्फाचे.. क्वचित कुठे अननसाचा तुकडा घालून दिलेला रस..
या रसवंती गृहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जास्त करून कनिफनाथ किंवा नवनाथ हे नाव रसवंती गृहांना दिलेले असते..माझ्या पूर्वीच्या क्लिनिकसमोर फडतरे यांचे नवनाथ रसवंती गृह आहे. रात्री उशिरा क्लिनिक बंद केल्यावर घरी जायच्या आधी आम्ही दोघे उसाचा रस पिऊन, क्षणभर विश्रांती घेऊन घरी जायचो.
फडतरे देखील आमचे क्लिनिक बंद झाल्याशिवाय दुकान बंद करीत नसत.
माझ्याकडे येणारे कन्सल्टंट डॉक्टर्स देखील सर्जरीनंतर उसाचा रस प्यायचाच या रुटीनला सरावले होते..
आमच्या लहानपणी जून महिन्याच्या सुरूवातीला दादरच्या आयडियल बुक डेपोत शाळेची पुस्तके घ्यायला जायचो, तेव्हा तिथे जवळच असलेल्या श्रीकृष्ण वडापावच्या दुकानातला वडापाव किंवा पट्टी सामोसा खायचा आणि छबिलदास शाळेच्या जवळ दादरच्या टिळक ब्रिजच्या खाली असलेल्या रसवंती गृहात उसाचा रस प्यायचा हे अगदी ठरलेलेच असायचे. त्याशिवाय आमची पुस्तक खरेदी पूर्ण व्हायचीच नाही.
माझा नवरा अकरावीच्या सुट्टीत साताऱ्याला रयत शिक्षण संस्थेतर्फे होणाऱ्या बारावीच्या विशेष मार्गदर्शन शिबीरासाठी गेला असताना रोज संध्याकाळी मित्रांबरोबर फिरायला जायचा आणि मोठ्ठा ग्लासभरून उसाचा रस आणि कंदी पेढे खायचा अशी आठवण सांगतो..
पश्चिम महाराष्ट्रात उसाच्या शेतातच गुऱ्हाळ असते. हुरडा पार्टीसारखी उसाचा रस प्यायची देखील पार्टी असते. उसतोडणी झाली की कुटुंब, नातेवाईक, परिचित यांना रस पिण्यासाठी बोलावले जाते.
हा रस मोठाल्या चुलाण्यांवर ठेऊन उकळवून, आटवून त्याचा गूळ बनवला जातो. गूळ आणि रस यामधला टप्पा असतो तो काकवीचा!
पोळी बरोबर किंवा नुसतीच खायला देखील काकवी छानच लागते.
उसाच्या रसात शिजवलेली तांदळाच्या किंवा गव्हाच्या रव्याची खांडवी देखील खूप छान होते.
उसाचा रस म्हणजे तात्काळ तरतरी देणारे पेय.. एखाद्याला कावीळ झाली की उसाचा रस प्यायला देतात. उसाच्या रसात इतर औषधी गुणधर्म पण आहेत. त्यात सत्तर टक्के पाणी, दहा ते पंधरा टक्के फायबर आणि पंधरा ते सतरा टक्के साखर असते. उसाच्या रसात antioxidants भरपूर प्रमाणात असतात.
उसाच्या रसाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो ताजाच प्यायला हवा. शिळ्या रसाची चवही बदलते आणि रंगही. उसाचा रस प्यायला कोणताही ऋतू असला तरी चालतो.
मग जायचं ना उसाचा रस प्यायला ?
- डॉ. समिधा ययाती गांधी
मुख्यसंपादक