Homeमुक्त- व्यासपीठ'' कपाळावर बुक्का लावलाय तो पुसून टाका !"..

” कपाळावर बुक्का लावलाय तो पुसून टाका !”..

तिरुपतीच्या देवळात विद्वान ब्राह्मण श्रीनाथशास्त्री नित्यनेमानं रोज विष्णूसहस्त्रनामाचं पठण करीत बसत असत. शास्त्रीबुवा अत्यंत गरीब होते..घरात अठरा विश्व दारिद्र्य नांदत होतं. मुलांच्या अंगावरचे कपडे फाटलेले असत..शास्त्रीबुवांची पतिव्रता पत्नी ठिकठिकाणी विरलेल्या..फाटलेल्या लुगडयाला गाठी मारून नेसायची ! रोजचं दारिद्र्य ते कसंबसं सहन करायचे..पण सणवार आले, दिवाळी आली की दारिद्रयाचे हे कांटे त्याना अधिकच रक्तबंबाळ करू लागायचे !..आस-पास..शेजारी-पाजारी दिवाळीची रोषणाई व्हायची. घरा-घरातली बायका-मुलं को-या कपडयांत वावरायची..पण शास्त्रीबुवांची मात्र फाटक्या कपडयात हिंडायची ! संस्कारित असल्यामुळे ती आपल्या पित्याला दोष देत नसत..पण..त्यांच्या मूक नजरेतील आर्तता श्रीनाथशास्त्रींच्या हृदयाला पिळवटून..भेदून जात असे. त्यांची पत्नीही त्याना एका शब्दानं कधी बोलत नसे..पण आपल्या देहावर असलेल्या लुगडयाच्या गाठीकड़े ती अतीव दयनीयतेनं पहात असे..त्यावेळीही शास्त्रीबुवाना अत्यंत अपराध्यासारखं होई !..
आजचा दिवसही सणाचा..दिवाळीचा होता !
घरातल्या दारिद्र्याच्या दर्शनाला कंटाळून पहाटेपासूनच श्रीनाथशास्त्री तिरुपतीच्या मूर्तीसमोर बसून विष्णूसहस्त्रनामाचं एक एक नाम वाचत होते. वाचता वाचता..हळू हळू त्यांचा कंठ दाटून आला..तिन्हीसांज व्हायला आली तरी पुढयातल्या पाटावर फक्त दोन तीन मूठ तांदूळ जमा झाले होते !..मुलं सकाळपासून उपाशी होती..आणि रात्रीच्या जेवणासाठी हे जमलेले तांदूळ कुणाच्याही दाती-ओठी लागण्यासारखे मुळीच नव्हते !
शास्त्रीबुवांच्या मनात विचार आला..
”..इतकी वर्षं आपण उपाशीपोटीसुद्धा परमेश्वराच्या
नामस्मरणात कधी ना खंड पडू दिला..ना कधीही
आपलं चित्त विचलीत होऊ दिलं ! पण..आज अस्वस्थ का वाटतंय ?…’परमेश्वर दयाळू असतो,’असं म्हणतात..मग त्याला आपली परिस्थिती काकळू नये ?..आपल्यावर दया दाखवावी, असं का वाटू नये ?…की ‘परमेश्वर दयाळू आहे’ ही अफवाच आहे ?…होय..तसंच असलं पाहिजे !..तसं नसतं तर अनेक वर्षं आपणास एवढे हलाखीचे दिवस
पहावे लागले नसते !…”
विचार करता करता शास्त्रीबुवांचे डोळे भरून आले.
पुढ्यातल्या पोथीवर अश्रुंचे थेंब टपटप पडत होते..त्यातला एक अश्रू पोथीतील एका शब्दावर नेमका पडला ! शास्त्रीबुवांनी डोळ्यातील पाण्याच्या पडद्याआडून त्या शब्दाकडे निरखून पाहिलं..
…तो शब्द होता ”दयाघन” !
त्या शब्दाकडे बघून श्रीनाथशास्त्री उपहासानं हसले.
जवळच एक कोळश्याचा तुकडा पडला होता..तो त्यांनी उचलला..आणि त्या ”दयाघन” शब्दावर फुली मारली !
त्याचवेळी श्रीनाथशास्त्रींच्या घरी कोणती घटना घडत होती, याची त्यांना सूतरामही कल्पना नव्हती !..
त्या तिन्हीसांजेला श्रीनाथशास्त्रींच्या घरासमोर डोक्यास काठेवाडी पद्धतीची पगडी बांधलेला..सतेज चेह-याचा तरूण येऊन उभा राहिला होता. त्यांनं आपल्यासमवेत आठ-दहा बैलगाड्या भरभरून सामान आणलं होतं. ते सर्वं सामान त्यानं शास्त्रीबुवांच्या घरासमोर उतरवलं. शास्त्रीबुवांच्या पत्नीजवळ त्यानं एक मखमली कापडाची थैली दिली..त्या थैलीत सुवर्णमुद्रा होत्या !..निघताना त्या तरुणानं शास्त्रीबुवांच्या पत्नीजवळ कसलासा निरोप दिला.
श्रीनाथशास्त्री अजून तिरुपतीच्या देवळातच बसलेले होते. अश्रूंनी पुढ्यातील पोथी भिजत होती..
इतक्यात त्यांच्या डोळ्यांसमोर नव्या-को-या कपड्यांतील त्यांची मुलं येऊन उभी राहिलेली दिसली..शास्त्रीबुवांना आश्चर्यच वाटलं. आपल्या मुलांनी हे नवे..कोरे कपडे कुठून आणले असतील ? ह्या प्रश्नानं ते साशंक होत..
मुलांच्या अंगावर ओरडले..
” काय रे !..कोणी दिले हे कपडे ? कुठून चोरून-बिरून आणलेत की काय ?”
दरिद्री माणसाला वैभव नेहमी पाप केल्याशिवाय मिळत नाही..असंच वाटत असतं ; त्यामुळे चोरी केल्याशिवाय आपली मुलं नवे कपडे घालणारच नाहीत..असं क्षणभर का होईना..पण गृहीत धरल्यामुळं श्रीनाथशास्त्री ओरडले होते. पण मुलं खुशीत असल्यामुळे पित्याच्या ओरडण्याला न घाबरता ती उत्तरली,
” बाबा,..इथे काय बसून राहिलात ? लवकर घरी चला !
आपल्या घरी खूप मज्जा मज्जा झालीयं !”
श्रीनाथशास्त्री घाईघाईनं निघाले.
घरी येऊन पहातात तर काय…घरभर दिवे तेजाळत होते..सर्वत्र उदबत्ती-धुपाचा सुवास दरवळत होता..एवढे दिवे लावायला तेल आलं कुठून ?..विचार करत असतानाच, नवं कोरं रेशमी लुगडं नेसलेली त्यांची पत्नी त्यांच्या स्वागताला आली..सुवर्णालंकारांनी ती सजली होती..शास्त्रीबुवा तिच्याकडे पहातच राहिले. त्यांनी विस्फारित नजरेनंच तिला विचारलं..
” एवढं सगळं वैभव अचानक आलं कोठून ?”
” काठेवाडहून बाराबंदी घातलेला एक व्यापारी आला होता.त्यानं आपल्या घराचा पत्ता विचारला..आणि आपल्याबरोबर आणलेलं हे सगळं सामान तो ठेवून गेला !..जाताना तुम्हाला एक निरोप देऊन गेलाय !”
शास्त्रीबुवांच्या पत्नीनं जे घडलं ते सांगितलं.
” काय निरोप दिलाय ?”
श्रीनाथशास्त्रींनी अत्यंत उत्कंठतेनं विचारलं.
” त्यानं निरोप दिलाय की..
‘शास्त्रीबुवांना म्हणावं पोथी वाचता वाचता कोळशानं माझ्या कपाळावर त्यांनी जो बुक्का लावलाय तो पुसून टाका !’…
कुणाला बुक्का लावलाय तुम्ही ?”
पत्नीनं गोंधळून विचारलं.
क्षणार्धात श्रीनाथशास्त्री सदगदीत झाले.
पत्नीच्या प्रश्नाचं उत्तर न देता..कमालीच्या घाईघाईनं ते देवळात परत आले. त्यांनी पाटावरची पोथी उचलून घट्ट हृदयाशी धरली..हळूवार उघडली..आणि पानावरच्या ”दयाघन” या शब्दावर मारलेली कोळशाची फुली त्यांनी अलगद पुसून टाकली !..
पुढच्याच क्षणी पोथी हृदयाशी कवटाळलेल्या श्रीनाथशास्त्रींची पावलं घराच्या दिशेनं सावकाश पडू लागली…

श्रद्धा !
श्रद्धा असली म्हणजे जगात कोणतीही गोष्ट अशक्य नसते.

।।जयजय रामकृष्ण हरि।।

  • लेखक – अज्ञात
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular