प्रश्नांचं काहूर तुंबलेल्या मनाला संगिताच्या तालावर डुलवत होतो।
दुभंगलेल्या हृदयावरची धूळ विरुंगळ्याने बाजूला सारत होतो।।
मोकळा होतो असल्याने त्या दिवशी संगणकावर आठवणीतली जुनी गाणी हळू आवाजात शब्दांचा अर्थसंबंध जुळवत रविवारच्या सुट्टीचा मनसोक्त आनंद घेत ऐकत बसलो होतो.”तुला मी सहज पाहिले गेलो हरवूनी” हे गाणं ऐकल्यावर “सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला” हे गाणं संगणक पटलावर चाळताना कशी काय कोणास ठाऊक त्याची फोटो प्रतिमा दृष्टीला पडली. क्षणार्धात डोळे दिपले. सर्वांगात विजेचा लोळ घुसावा ना तसं झालं.दोन मिनिटे गच्च डोळे आवळून फथकाल घालून मटकन खाली बसलो.तरी पण घट्ट मिटलेल्या डोळ्यापुढं त्याची निरागस भोळी भाबडी प्रतिकृती भिंगरी सारखी फेर धरून नाचू लागली.मग काय दीर्घश्वास घेऊन पुन्हा एकदा बंद डोळे सताड उघडे करून पाहीले तर नयन रथावर आरूढ झालेली त्याची वामनमूर्ती काही केल्या नजरे समोरून हालायचं नाव घेईना.डोक्याच भदं व्हायची वेळ आली राव.थांबायचं नाव घेत नसलेला तो नाजूक विषय काही करून तिथंच थांबावा,गतकाळाच्या गर्तेत रुतू पाहत असलेलं मन भासकण रितं करावं म्हणून समोरच्या सोप्यात आडव्या तिडव्या येरझाऱ्या मारायला सुरू केल्या.तरी ही परिस्थिती जैसे थे.
समवयस्क नसताना ही आम्ही दोघे एकदम जवळचे खाजगल दोस्त होतो असल्या कारणाने कदाचित मनातला त्याचा विषय जाता जात नव्हता की काय कोणास ठाऊक.दगडू हो दगडू बद्दल बोलतोय दगडू अ!हं!दगडू नाय काय?शर्टाच्या बाहीला शेंबूड पुसणाऱ्या लहानग्या पोरापासनं जाणत्यासवरत्या थोरामोठ्या पर्यन्त सारेच,’ये दगड्या’असं शेलक्या भाषेतचं त्याला बोलवायचे. चुकूनही त्याला कोणी दगडू म्हटल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही.पण त्याने मात्र सर्वांना मानाने बोलवावे, कोण काय म्हणेल,सांगेल, बोलेल त्याचे मुक्कार ऐकून घ्यावे.कुणा कुणापुढं अवाक्षर काढू नये.नव्हे नव्हे डोळे वर करून ही बघू नये.असा सर्वांचा अलिखित नियम होता म्हणा ना!रंगाने काळा, उंचीने मध्यम कुरळ्या केसांचा,नाकीडोळी बरा असणारा दगडू एका सर्वसामान्य कुटुंबाचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे की काय त्याला म्हणावी तशी किंमत द्यावी असं बहुदा कोणाला वाटत नसावं.हे असं सर्वांच्याच देहबोलीतून स्पष्ट दिसायचं. म्हणून तर माझ्या डोळ्यादेखत त्याच्या सोबत घडलेले शेकडो कडवट जिवंत किस्से एकाच विचार खलबत्त्यात कुटून मी एका अशा विशिष्ट निष्कर्षाप्रत पोहचलो होतो की,प्रेम वगैरे सारख्या सरळ साध्य नसणाऱ्या भयंकर भानगडीत गरिबानं अजिबात पडू नये.नाही नाही प्रेम वगैरे करणं हा नैतिक अधिकार गरिबाला तर मुळीच नाही. आता माझे हे अनमोल, तत्वज्ञानी,सखोल विचार वाचून तुम्ही माझी किव कराल.पण हे जळजळीत प्रांजळ सत्य लेखणीतून मांडताना दगडू सोबत घडलेल्या असंख्य घटना प्रसंगांची माळचं उदारण दाखल माझ्या नेत्र पटलावर थैमान घालत असल्याचे मी त्यावेळी अनुभवले होते. आठवणीतले दगडू पुराण मारुतीच्या शेपटीसारखं थांबायचं नावचं घेईना म्हटल्यावर नाईलाजास्तव सदर विषय तसाच डोक्यात घोळत ओढून ताणून घडी जुळवून आणलेल्या फाटक्या चटईवर छताकडे डोळे लावून विचार पुष्पांची जुळवाजुळवं करत आडवा पडलो.तरी पण असं नको असं झालं असतं तर बरं झालं असतं सारखा आशय पुन्हपुन्हा मनमंदिरी मयुरासम थुईथुई नाचतचं होता.
अखेर शून्य बिंदूत नजर एकटवून अनावधानाने अडकलेल्या भूतकाळाच्या विषयचक्रात अधिक वेगाने गुरफटत गेलो.च्यामायला गरीबी निखळ,निर्मळ,अपेक्षा विरहित प्रेमाआड सुद्धा का लुडबुड करत असेल?अठराविश्व दारिद्र्य घेऊनचं दगडू सारखी पात्रं का जन्माला येत असतील? श्रीमंती नाय तर नाय निदान त्यांना भरभरून सौंदर्य द्यायला तरी तो करंटा परमेश्वर कसा बरं विसरत असेल!बरं ते सारं ठीक आहे. ते ही जाऊ द्या.पण असं कुठं असतंय व्हय!जगी जे चांगलं ते सारं जन्मतः श्रीमंताच्या माथी आपसूक तर गरीब म्हणून जन्मास येणाऱ्याच्या कपाळी काय बी नाय नुसता गोटा!हा कसला न्याय! हा तर त्या देवाघरचा अन्याय नाही का? मग मला सांगा हा असा सरळ सरळ अन्याय करणाऱ्या त्या देवाला कुठल्या माप दंडानं मापायचं बरं!असे ठेवणीतले वैचारिक प्रश्न माझ्या हृदय कोपऱ्याला मुसंडी देत योग्य उत्तर वदवून घेण्या अंतर्मनात खळबळ माजवायचे.या सर्वाचं मूळ होती ती दिशा!!हो दिशा सरनाईक हो$हो तिच.
साधा,सरळ,सालस,
भोळाभाबडा कोणाच्या
एका ना दोनात नसणारा दगडू दिशासाठी तिळतीळ तुटत होता.तिला आपलसं करण्यासाठी,तिच्या नजरेची मेहरबानी मिळवण्यासाठी, नको नको ते आयाससायास करत होता.एवढंच काय तिच्या सावलीचा ही पाठलाग सोडत नव्हता.उठता बसता मानेवर भूत बसल्यासारखा त्या एका व्यक्तिमत्वामागं तो बेभान होऊन धावत होता. तिच्या अनाठायी ओढीपायी त्याला फक्त एकच दिसत होतं.दिशा,दिशा आणि फक्त दिशा!परंतू त्या दोघांमध्ये असलेल्या भल्यादांडग्या तफावत भगदाडामुळे त्याची ही नसती उठाठेव मूळ मुक्कामी पोहचण्या कामी येऊ घालत असलेले कित्येक अडथळे मनाला हुरहूरीच्या शिखरावर नेत होते.दिशाला लाभलेल्या वारेमाप सौंदर्यानं दगडूला भुरळ घातली होती. म्हणून की काय कुठं ही ध्यानी मनी नसताना तो अनावधानाने तिच्या प्रेम रसात पुरता बुडाला होता. त्यामुळे तिला चोरून न्याहाळणे,पाठमोरी पाहणे, ती ये-जा करणाऱ्या वाटेवर रेंगाळणे,तिच्या घरासमोर रुंजी घालणे,तिच्या नजर पट्ट्यात बसणे या सारखे नाना प्रकार तो सातत्याने करत असायचा.ती दिसते का? आपल्याकडे पाहते का?सारखे त्याचे कडीकाठ उद्योग सतत सुरू असायचे. पण त्याच्या प्रेम अंकुराला दिशा ना खुलण्या ना खुडण्या हातभार लावत होती.जरी समोर हे असं विरोधाभासाचे विदारक चित्र दिसत होतं असलं तरी प्रेमवीर दगडू दिशामध्ये पार तळागाळा पर्यन्त बुडाला होता.यामुळे दोस्त मंडळी,सगेसोयरे, वडीलधारे अथवा त्याची जन्मदाती जेव्हा त्याला बजावत होते की,बाबा रे शहाणा हो,शिक्षणात लक्ष घाल,जमल तसं कामाधंद्याचं बघ,कानात वारं गेल्यावाणी उनाड पोरांसारखं चौखूर उधळू नको,परिस्थिती काय तुला करायचंय काय याचा सांगोपांग विचार कर. स्वतःच्या पायावर उभा रहा, आईची सोबत काय शेवट पर्यन्त येत नाही,गेलेली वेळ परतून मिळत नाही.या सारखे सुयोग्य मतप्रवाह ही त्याला हिमालच्या उंचीचे विरोधातले व निरुपयोगी वाटू लागले होते.त्याने जणू एकच ध्येय निश्चित केलं होतं.दिशा अन त्या एकमार्गी ध्येयापाठी तो शेंडी तुटो की पारंबी या उक्तीन्वये सुदबूध सांडलेल्या वळू सारखा मागची धूळ ही न पाहता नुसता सरळसोट पळत होता एकमार्गी पळत होता.एकीकडे सर्व बाजुंनी गांजलेली आर्थिक स्थिती, खानपान व कापडलत्ता यांची चणचण गोचिडा सारखी चिकटलेली असताना.म्हणावे तसे नव्हे अंगभर कपड्यांची ही वानवा होती.जे मोजके कपडे होते ना ते ही थोडे थोडेके नव्हे जरा जास्तच विटलेले असायचे.त्यावर फिरून फिरून येणारा फेरचं तसा भडिमार करत होता म्हटल्यावर ते कपडे तरी बिचारे काय करतील म्हणा. आधीचं रंग गेला तर पैसे परत असा शरीर व्रण आणि वर जीर्ण कपड्यांवर घड्यावर घड्या पडून निसर्गात नसलेला किंबहुना स्वयंभू प्राप्त झालेले ते नव्या रंगाचे कपडे यांमुळे चारचौघात दगडू उठून असा कधी दिसायचाच नाही.आता हे सारं त्याला ही पक्कं ठाऊक होतं म्हणा.पण प्रेम हे काही कपडे,रंग,रूप किंबहूना आर्थिक परिस्थितीवर अवलंबून नसतं काही!असं म्हणून प्रेमाच्या अनेक ऐकत राहाव्या अशा व्याख्या दगडू सांगायचा.तो म्हणायचा दोन जीवांच्या हृदयाचा मेळ म्हणजे प्रेम!एकरूप नयनांच्या नैसर्गिक लकबीतून मन मंदिरात अलगत डोकावण्याचा भुयारी मार्ग म्हणजे प्रेम!दोन नवख्या जीवांच्या हृदय कप्प्यात ओढ नावाचं केंद्र उदयाला येऊन आकर्षणाचे सौम्य भूकंपरूपी धक्के बसल्यावर भावनांचा उद्रेकरूपी लाव्हारस बाहेर पडतो ना ते म्हणजे प्रेम!अपेक्षांच्या पल्याड निव्वळ उदात्त निर्मळ भावना व्यक्त होण्याचा सर्वोत्तम महामार्ग म्हणजे प्रेम!हृदयाला जाळून तावून सुलाखून नवागत जन्म घेतं ते म्हणजे प्रेम!नाही नाही दोन आत्मे निःस्वार्थी वृत्तीने एकमेकांत समर्पित होण्यास जेव्हा तयार होतात ना त्याला प्रेम म्हणतात.दगडूच्या प्रेम संकल्पना या अशा मोठाल्या अवजड विचारांच्या होत्या असल्याने तो तिच्यावर प्रेम व्यक्त करण्याचा त्याच्या परीने जीव ओतून खटाटोप करत असायचा.त्यामध्ये किंचितसा ही खंड पडू देत नव्हता.पण माझ्या स्वयंभू निरीक्षणान्वये दिशाची वैयक्तिक दिशा कोणत्या ही दिशेने ढुंकूनही दगडूला लक्ष्य करत नव्हती.हे सरळ सरळ दिसत होतं.कदाचित दगड्याच्या मनातील या अवजड पुस्तकी महाप्रतापी प्रेम विचारांना वा बेंबीच्या देठापासून तो करत असलेल्या एकतर्फी प्रेमाला तिच्या लेखी काडीची किंमत नव्हती अस वरवर तरी दिसत होतं.बरं हे सारं इथंपर्यन्तचं न थांबता भविष्यात ही त्यास स्वप्नवत देखिल नवी पालवी फुटेल असं पुसटस ही चिन्ह लांबरुंद कुठं कुठचं दिसत नव्हतं.दगडूकडे चुकूनही ती जवळीक करण्याच्या दृष्टीने बघत नव्हती.व बघेल का ही आशा मावळतीकडे झुकत होती.तिचं विश्वचं वेगळं होतं. तिच्या विचार खोलीच्या तळाचा अंदाज लागणारं मुश्किल कोडं उलगडणं दगडूला जेव्हा डोईजड व्हायचं तेव्हा अधिक जोमानं प्रेम करण्याची त्याची उर्मी शेअर बाजारासारखी शेकडो अंकांनी धाडकन खाली कोसळायची.तरी ही हा आशावादी प्रेम योद्धा भविष्याच्या आशेवर कसाबसा तग धरून होता.
ती ना!होतीच तशी शंभर नंबरी चोख सोन्यासारखी परमेश्वराने योग्य वेळ साधून बनवली असावी अशी लाखात एक.सडसडीत बांधा,गोरागोरा रंग,मऊ मुलायम अंग,पाणीदार डोळे, चाफेकळी नाक,गुलाबी ओठ, लांब सडक केस,कोरीव भुवया,साजेशी उंची किती वर्णन करावं तेवढं थोडं एवढं सारं तिच्या त्या देखण्या रुपात सौंदर्य ठासून ठासून भरलं होतं.कॉलेजला येताना केलेली ती नवनवीन केस रचना,आणि एका बाजूला वाऱ्यासोबत झुलत सोडलेली ती सोनेरी बट,व परिधान केलेले ते विविध रंगबेरंगी वस्त्र पाहून अस वाटायचं कोणी स्वर्गपरीचं जमिनीवर अवतरली आहे.सारं काही जणू निसर्गदत्त तिला लाभलं होतं.नावं ठेवावं किंवा खोट काढावं असं तिच्यात काय नव्हतंच मुळी म्हणून तर ती लाखात काय करोडोत ही उठून दिसावी अशी गोंडस होती.गोड हसताना तिच्या गुबऱ्या गालावर पडणारी खळी तिच्या सौंदर्यात ढीगभर भर टाकत होती.अरे बापरे बाप!पाहणाऱ्याचं हृदय हेलावून टाकणारं सौंदर्य होतं ते!”तासनतास तिच्याकडे नुसतं बघत बसावं ना अशी सुंदरी होती ती.अशी लावण्याची खाण आमच्या दगडूला एकतर्फी आवडत होती.लांबून पाहिलं तर फक्त दात पांढरे दिसणारा दगडू व दिशाच्या सौंदर्याची तुलना करता तो तिच्या सौंदर्य छबीच्या जवळपास ही पोहचू शकत नव्हता हे निर्विवाद सत्य होतं.म्हणून की काय या एकतर्फी चाललेल्या प्रेम धडपडीला दिशा काडीचा ही प्रतिसाद देत नव्हती.त्यामुळे त्याची मनस्थिती विचलित होऊन अंतर्मन अक्षरशः सुई सारखं सलत असल्याचं तो बोलता बोलता बोलायचा व ओझ्याने भरलेलं मन मोकळं करण्यासाठी माझ्याशी व्यक्त होऊन मनसोक्त रडायचा. एकदा एकदा मला त्याचं इतकं वाईट वाटायचं ना! तेव्हा मी ही मग त्याचा हतबल रडवेला चेहरा पाहून त्याच्या बरोबरीने रडण्यात सहभागी व्हायचो.
एक एक दिवस ये-जा करत पुढेमागे ढकलत होता. पण दगडूच्या प्रेमाचा प्रवाह काही जागचा हालायचं नाव घेत नव्हता.एखाद्या डबक्यात निव्वळ डासांचे साम्राज्य असावे ना!तसा त्याचा प्रेम प्रवाह मध्येच डबके करून साचला होता की काय अशी मला शंका यायची. दिवसागणिक दिशा दगडूच्या हृदयाला अधिकाधिक चिकटू लागली होती पण दुसऱ्या बाजूने बोलायचे राहू दे.ती साधं त्याच्याकडे ढुंकून बघत ही नव्हती.त्यामुळे माझी तरी अशी धारणा झाली होती की,दिशा दगडूसाठी किंवा दगडू दिशासाठी नव्हतेचं. त्याचं सुमारास नव्या सत्राच्या सुरवातीला देवेश नावाच्या एका सरकारी बाबूच्या मुलाने त्यांच्या वर्गात प्रवेश घेतला. मोजके दिवस सरले असतील नसतील पण देवेश व दिशा निकटवर्तीय असल्यासारखे जवळ येऊ लागले होते. एकमेकांच्या वह्या,डब्यातल्या भाज्या देणेघेणे,टक लावून बघणे,हसणे काय खिदळणे काय नुसता वर्षाव सुरू झाला होता.दगडू त्यांच्या सर्व गोष्टी कान टवकारून ऐकत होता.उघड्या डोळ्यांनी हताशपणे पाहत होता. अनाहूतपणे उदया आलेल्या या नव्या प्रकारामुळे माझ्याशी झुरून वावरत होता.अढी ठेऊन बोलत होता.त्या दोघांच्या वाढत्या सलगीने वैतागायचा. चिडचिड करायचा.देवेशचा तर राग राग करायचा नव्हे त्याला पाण्यातच बघायचा. कधी जमिनीवर जोराची मूठं आपटायचा तर कधी डोक्यावर हाताचा दणका देत मला म्हणायचा,काय रे दाद्या माझ्या वाट्याचं असं या देवानं काय ठेवलचं नसेल का? एवढा नालायक बदमाश संकुचित आहे का हा देव! एकतर साल्यानं जन्मतः गरीबी पाचवीला पूजलीय. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत कपड्यांची वानवा.राहायला पडकं घर,पांघरायला फाटकं पांघरून हे हे इतकं सारं एकाच वेळी झोळीत टाकलं असताना मला आवडणारी ही एक मुलगी ती ही माझ्या पासून दूर घेऊन जाऊ पाहतोय.कमनशिबी,करंट्या कपाळाचा जन्म मिळाल्याचं दुःख होतंय रे!असं तोंडाला येईल ते बरळायचा,दिसेल त्याच्यावर दाणदिशी डोकं आपटायचा आणि मोठं मोठ्याने हंबरडा फोडायचा. ह्यो मोठा टेंगुळ यायचा. आपटलेली जागा लालबुंद व्हायची.त्या वेदना मला जाणवायच्या.त्याच्या जळणाऱ्यां शरीराचा दाह मला नकोसा करायचा.एवढी त्या झळीतची तीव्रता शिगेला पोहचलेली होती.सांत्वन करण्यासाठी उसन्या अवसानाने मी असं करू नको.असं का करतोस असं म्हटलं की म्हणायचा या बाहेरच्या वेदना तुला दिसतात रे!पण आत धुमाकूळ घालणाऱ्या असह्य वेदनांच्या वादळाचं काय करू!त्याला कसं शांत करू सांग ना काय करू?मी काय उत्तर देणार.त्या वैराण सपाट डोंगर माथ्यावर त्याचा जिवलग मित्र म्हणून मी त्याच्यासाठी काही ही करू शकत नसल्याची मला मनोमन खंत वाटायची.त्याने शिव्यांची लाखोली वाहिलेला तो देव काही तरी करेल असा भाबडा विचार करत त्याच्या डोळे पुसून भिजलेल्या खांद्यावर डोकं ठेऊन फक्त तसूभर ही किंमत नसलेला धीर द्यायचो.तुझे ही दिवस येतील अशी पोकळ आशा दाखवायचो.तेवढंच तर माझ्या हातात होतं ना !
पण तो दैवी चमत्कार म्हणा अथवा कर्मधर्म संयोग म्हणा चमत्कारीक रित्या देवेशच्या बाबांची अचानक बदली झाली.आणि पायात रुतलेला एखादा निबर काटा खळकन आपसूक निघून पडावा ना तसा देवेशचा अडसर दूर झाला.दगडूने तर सुटकेचा मोठाला सुस्कारा सोडला.पुढच्या दोन एक महिन्यात महाविद्यालयाच्या संमेलन कार्यक्रमाची गडबडघाई सुरू झाली.जो तो जीव ओतून तयारी करण्याच्या मागे लागला होता.दगडू ही काही मागे नव्हता.त्याने “जीवनात ही घडी अशीच राहू दे “हे गाणं एवढ्या अप्रतिम म्हटले होते की सारे श्रोते उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याला उस्फुर्त दाद देऊन गेले होते.तर दिशाचा सहभाग असलेल्या ‘प्रेमाचा बेरंग’ या लघु नाटकातील दगडूची विनोदी भूमिका मुखावर हास्याचे फवारे उडवून गेले होते.त्या नाटिकेमध्ये एका मिनिटात प्रेमाचे महत्व पटवून देण्याचा जबाबदारी दगडूवर असते तेव्हा तो त्या नाटकातील संगीताला तो म्हणतो कसा.संगा अग ये संगा प्रेमा संग राहा ग !काढू नको अंग,होईल वातावरण तंग,उडेल जीवनाचा रंग नको करू प्रेमाचा बेरंग.म्हणून तर सांगतोय ते ऐक तुम्ही दोघांनी एकमेकाला जीव लावण्याचा बांधा आता चंग! त्याचं ते यमक बोलणं ऐकून संगीता हसते आणि संगम संगीता एक होतात.तेव्हा देखील दगडूच्या त्या विनोदी भूमिकेला उभे राहून टाळ्यांच्या गजरात सारे दाद देतात.नाटिकेच्या समारोपाला दगडू सर्वांना विविध तऱ्हेचे हातवारे करत पडदा पडतो.पुढच्या महिना दोन महिने साऱ्या महाविद्यालयात दगडू चर्चेच्या शिखरावर होता. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी तर चक्क दिशाने दगडूच्या हातात हात घालत तू खूप छान अभिनय करतोस आणि तुझा आवाज तर अतिशय गोड आहे असा त्याच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला होता.दिशाचं ते प्रेमळ बोलणं आणि हातात हात घातलेला तो विचाराधीन नसलेला क्षण दगडूला आभाळभर आनंद बहाल करून गेला होता. कित्येक दिवस तो आपल्या हाताकडे व झाल्या आठवणींच्या विश्वात मशगुल झालेला दिसत होता. आनंदाच्या भरल्या सुगीत महाविद्यालयाचे उरले सुरले दिवस भरारा संपले.परंतू त्यामुळे निमित्ताने होणारी दोघांची दरदिवसाची भेट आता लांबू लागली होती.पण पर्यायी व्यवस्था साधली होती की काय मला सांगता येणार नाही व्यायामाच्या बहाण्याने दगडू आमच्या गच्चीवर न चुकता यायचा.तास दोन तास ती कधी बाहेर येते,केव्हा नजरेस पडते याचा माग घेत रेंगाळायचा.तेव्हा दिशा सुद्धा बाहेर आलेली,दगडूकडे पाहत असलेली मी अनेकदा पाहिले होते.पण गाडी जागा सोडून लांबरुंद गेली नव्हती. तिथंच घुटमळत होती. आगामी दोन तीन महिन्याच्या अंतरात दिशाच्या घरी कसली तरी तारांबळ चालू असल्याचे दगडूच्या निदर्शनास आले.त्याने ताबडतोब मला गच्चीवर बोलावले.बराच वेळ आम्ही कानोसा घेण्याची धडपड करत होतो पण ती वाया जात असताना कोणाच्या तरी त्रयस्थ व्यक्तीच्या तोंडून अचूक वार्ता कानावर आली की,तो दिशाचा साखरपुडा समारंभ होता.तर जास्तीची न विचारलेली आतल्या गोटातील अशी बातमी समजली की,तिचा होणारा नवरा म्हणे कोणीतरी सुप्रसिद्ध डॉक्टर होता.त्या दिवशी दिशा नखशिखान्त सजली होती.भरभरून नटली होती.त्यामुळे एवढ्या लांबून ही दगडूची तिच्यावर एकटक रोखलेली नजर काही केल्या हटता हटत नव्हती.माझं पहिलं प्रेम कोणी का हिरावून घेत आहे.ही अशी सौंदर्यवती, लावण्य सम्राज्ञी सोडून मी कसा जगू हे असे बरेच काय बाय तो बरळत होता.त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते.पुढचे दोनतीन दिवस माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन तो खूपदा ओक्साबोक्शी रडला होता.रडून रडून त्याचे डोळे लालबुंद सुजून टम्म असे एखाद्या चिनी माणसासारखे झाले होते. जेवण,अंघोळ,पाणी कशा कशाची त्याला सूद राहिली नव्हती.नुसतं माझी दिशा नावाची एकच रट त्याने एकसारखी सुरू केली होता. मला तर असं वाटत होतं की,दिशा हे फक्त नाव घेऊनच त्याचं पोट भरत होत की काय कोणास ठाऊक. त्याची ती दुरावस्था पाहून प्रेमात भूक पण लागत नसेल का?हा प्रश्न माझ्या मनाला ढुसण्या देऊ पाहत होता.ज्या विधात्याने दगडूला कशातच आबाद ठेवलं नव्हतं त्याच्याकडे तो फक्त एक दिशा मागत होता तर ती ही जवळ जवळ आता अलिप्त झाल्यात जमा होती.अद्यापि जवळ तरी कधी होती म्हणा. पण तो तन मन धनाने तिला मिळवण्याची खटपट करत होता.काहीच दिवसात लग्न मंडप सजला,सनई चौघडे वाजले,रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी झाली,मोठाली गाव पंगत बसली.अत्तर राशीच्या सुगंधी मंगल वातावरणात दिशाचे दोनाचे चार हात झाले.जरी दिशा आता दगडूपासून अंतराने दूर गेली असली तरी त्याच्या मन गाभाऱ्यातून ती अद्यापि हालायचे नाव घेणार नव्हती. की हलणार ही नव्हती.दगडू कोणत्याही मर्यादेपलिकडे दिशाला आपली मानत होता. त्याच्यासाठी ती सर्वस्व होती. तिच्या नजरेची फक्त एक झलक त्याला बारा हत्तीचं बळ द्यायची.ती फक्त आणि फक्त माझ्यासाठीचं बनली आहे अशी स्वधारणा तो केव्हाच करून बसला होता. दुसऱ्या कोणी ही तिच्याकडे साधं बघितलेलं त्याला रुचत नव्हतं.तिच्या चेहऱ्यावरील हास्याने त्याला कोण आनंद व्हायचा.त्याच्या तोंडात निव्वळ ती ती आणि तीचं सामावलेली होती.ज्या दिशाला त्याने स्वप्न व वास्तव जगात स्वयं मनाने आपली मानली होती ती चक्क दुसऱ्याची पत्नी होणं हे स्वीकारायला तो कोणत्याचं पातळीवर तयार नव्हता.सात आठ दिवस मला तो वारंवार सांगत होता माझं कशातच मन रमेना,कुठेच लक्ष लागेना,धड भूक लागेना की झोप येईना.मग जगावं तरी का?कोणासाठी?मग इथंच संपवावं का हे जीवन काहीच कळेना!असं माशासारखं तडफडत होता.कायबाय बरळायचा आणि ढसाढसा रडायचा.मी त्याच्याकडे बघत राहायचो मनात यायचं अरेच्चा!गेली आठ दिवस हा एकसारखा रडत आहे.याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत आहे.जेव्हा जेव्हा तो रडत होता तेव्हा तेव्हा त्याच्या डोळ्याला पाण्याची धार लागत होती.मनात यायचं अरेच्चा!एवढं पाणी वाहून न ही याच्या डोळ्यातलं पाणी संपत कसं नसेल?तर गहिवरून धायमोकलून रडणाऱ्या माझ्या सख्याला थांबवायचं कसं हा पेच प्रसंग माझ्या पुढ्यात पहाडासारखा उभा राहयचा तो वेगळाच. धीर द्यावा म्हटलं तर काय म्हणून द्यायचा काहीच कळायचं नाही.दगडूच्या रडण्याचा तो निराशमय काळ कसाबसा जाता जात नसताना आठ एक दिवसांनी सणवारासाठी म्हणून दिशा पुन्हा एकदा गावी परतली. तेव्हा तिचं साडीत आवरत सावरत वावरणं,हळदीनं नितळलेलं गोरंपान खुललेलं अंग बघून दगडू रडायचं थांबला पण तहान भूक हरवला.त्याच्या या एकतर्फी प्रेम उड्या दिशाच्या गावी कुठं कुठचं नव्हत्या.नाही तर एव्हाना एखादी देवी प्रसन्न व्हावी ना तशी त्याची प्रेमआराधना पाहून दिशादेवी पावल्याविना राहिली नसती. एवढी त्याची टोकाची प्रेम तपश्चर्या चालू होती.खरं तर कित्येकदा अप्रत्यक्ष का असेना आपले प्रेम त्याने दाखवले होते म्हणा.पण दगडू आणि दिशा मधलं जे लांब पल्याचं अंतर होतं.ते कोणत्याच वळणावर जुळलं नसल्याने की काय त्याची जी तळमळ चालली होती,जी धडपड चालली होती.चारी बाजूंनी आग लागल्यासारखं अंतर्मन जळत होतं ते फक्त आणि फक्त एका आणि एकाचं बाजूनं होतं.त्यामुळे दिशाला त्याचं सोयर सुतक नसावं.वर्तमान चार दिवसात दगडू अतिशय आनंदी दिसत होता.पण जशी दिशा पुन्हा तिच्या सासरी परतली तसा दगडू ही परतीच्या वाटेने निराश्येच्या खाईत लोटला. दरम्यानच्या काळात त्याच्या आईची तब्येत खालावली. दोन माणसांचं घर त्यात चालकचं घरात म्हटल्यावर चालणार कसं.पर्याय उरला नसल्याने शिकला सवरलेला दगडू जिवाच्या करारावर लांबच्या एका मामाच्या शब्दावर रस्त्याच्या कामाला जाऊ लागला.अंथरुणावर पडलेली आई लग्नासाठी हट्ट धरत होती.पण दोन खोलीचं अर्ध पडकं घर,दोन वेळच्या जेवणाची भ्रांत.कोणाचा आधार ना पाधार अशी बिकट परिस्थिती असताना पोरगी कोण आणि कशी देणार.आईची तळमळ होत होती.आपल्या डोळ्या- माघारी पोरग्याला कोण तरी जोडीला असावं,बघणार असावं,सांभाळून घेणारं असावं,वाट बघणारं असावं म्हणून प्रत्येकाला सांगत होती,दुम काढत होती.पण गाडी काही थांबा सोडत नव्हती.इकडं दगडू घडलेल्या घटनेपासून अजून स्थिर स्थावर झालेला नव्हता.एक दिवस विषय काढायचा म्हणून मी सहजचं म्हटलं काय दादा लग्नाचं कुठं पर्यन्त आलंय.तेव्हा पाण्याने तुंबलेल्या डोळ्यांनी मान खाली घालून मला म्हणाला, अरे लग्न तर मी दिशा सोबत कधीच केलं आहे.आता तर फक्त तडजोड करायची शिल्लक आहे.ती तर आता करतो आहे.पण तो आनंद,ती व्यक्ती अन ते निस्सीम प्रेम या तीन बाबी माझ्या विसंगत आहेत त्याला मी काय करू असे म्हणत थरथरते ओठ, अश्रूंच्या धारा वाहत असलेले लालबुंद डोळे आकाशाला दाखवत हमसून हमसून रडू लागला.माझा बराच वेळ त्याला गप्प करण्यात गेला. छातीला कवटाळून किती तरी वेळ मी त्याचा हुंदका आवरण्याचं कष्ट घेत होतो. पण का कोणास ठाऊक किती तरी वेळ तो कोणा न ऐकून घेणाऱ्या व अदृश्य असणाऱ्यास आर्त साद घालत होता.झोपेचं सोंग घेतलेल्यास जागं करण्याचा
निष्फळ प्रयत्न करत होता.ते सारं न बघण्यासारखं होत. बोटावर मोजण्या इकडे तिकडे झाले असतील नसतील.आमच्या साके गाव सिमेनजिक झालेला दिशाचा अपघात प्रसंग लोक चवीने चघळत असताना तो माझ्याकडे येऊन मला म्हणाला चल,नेहमीच्या जागी जाऊया.तो असं म्हटल्या म्हटल्या माझ्या डोक्यात एकच विचारचक्र सुरू झाले. जर दगडू रडायला लागला तर त्याला थांबवायचा कसा. ज्या दिशाची तो आजतागायत आस लावून बसला होता.तिने तर आता जागाच बदलली होती.मग आता याचं कस.आज हा कशी प्रतिक्रिया देईल.पण त्या दिवशी तो मी अनुभवलेला दगडू नव्हताच असं राहून राहून मला वाटत होतं.त्याचे डोळे,त्याचा चेहरा मला काय तरी वेगळं सूचित करत होता.जे मला ज्ञात नव्हतं.माझ्याशी व्यक्त व्हायचं असलं की मला तो कायम असाच त्या निर्जन वैराण अशा नेहमीच्या सपाट डोंगर माथ्यावर अबोल वाणीने घेऊन जायचा.तिथं रडरड रडायचा,सारी गरळ ओकायचा,मोकळं व्हायचा आणि येताना जगात सुखी असलेल्या माणसासारखं मोठं मोठ्याने हसत खांद्यावर हात टाकून घेऊन यायचा. त्यामुळे पंचक्रोशीत दगडूचा खराखुरा अभिनय ओळखणारा फक्त मी होतो. सुरुवातीला मला वाटलं नेहमी सारखं असेल पण आज त्याचा नूर वेगळाच दिसत होता.पाच दहा मिनिटे शांत बसल्यावर त्याने दिशाबद्दल सांगितलेला वृत्तांत जो मी ऐकला तो अनाकलनीय व नियतीच्या पलीकडचा होता.
तो सांगू लागला. त्या दिवशी नेहमीप्रमाणे मी रस्त्याच्या कामावर गेलो होतो.भर दुपारची वेळ
होती.अंगाची लाही लाही करणारं ऊन मी म्हणत होतं. सारे कामकरी जेवणाच्या सुट्टीला घरी गेले होते.दिशा शिवाय माझं जीवन मला अगदीचं निरस,बेचव,अर्थहीन बोचत असल्यासारखं वाटत होतं.ना तहान लागत होती ना भूक!म्हणून तर दुपारच्या जेवणाला घरी न जाता त्या कडकडीत उन्हात चटके अंगावर घेत मनःशांती मिळवण्याची नुसती उठाठेव करत होतो.पण रिकाम्या हाताने बसलो असता नाना तऱ्हेचे विचार डोक्याला शांत बसू देईनात.म्हणून कशात तरी लक्ष घालून मन गुंतवावे या हेतूने दगडाने दगड टिपण्याचा जुना खेळ नवा करून खेळू लागलो.कसेबसे दोन तीन दगड अचूक टिपले असतील नसतील तोच नुसत्या कानठळ्या नव्हे तर विरान शांततेचा कोणी तरी भंग करावा ना तसा मोठाला आवाज झाला.खेळातली नजर बिथरली.नैसर्गिकरित्या मान आपोआप मागे वळली. तर एका बारा चाकी मालगाडीने एका अलिशान मोटारकारला जोराची धडक देऊन मागची धूळ ही न पाहता भरधाव वेगाने रस्ता कापत डोळेआड होत होती. इकडे धडक खालेली मोटारकार गोलाकार कोलांट्या उड्या खात होती. जवळ्पास दहा ते पंधराहून अधिक कोलांट्या पूर्ण झाल्यावर कुठं ती मोटारकार झोलखात कशीबशी एका जागी स्थिरावली.एवढी जोराची धडक होती ती. अनाहूतपणे निर्माण झालेलं ते समोरचं दृष्य पाहून मी पुरता गांगरून गेलो.पुढचे काही क्षण हालचाल न करता निव्वळ बघ्याचं काम केलं. दिवसा उजेडा डोळ्यापुढं काळोख दाटून आला होता. दोन्ही डोळे एकाच वेळी बोटांनी चोळून डोळे मोठे करून वास्तव चित्र पाहिलं. तर चारी बाजूंनी एकाजागी गोळा झालेल्या मोटारकार मधून रक्ताच्या थारोळ्यात माखलेला एक नाजूक मुलायम हात मला खुणावत असल्याचं दिसलं.पुढं जावं की मागं धूम ठोकावी काहीच कळेना.रणरणतं ऊन आग ओकत होतं.तर स्मशान शांतता आणि वाहनांनी ओस पडलेला रस्ता भीतीचं सावट अधिक वृंध्दीगत करत होता. हाडं म्हणायला कुत्र नव्हतं की शुक करायला एखादं चिटपाखरू.अशा सुनसान स्थितीत कोणीतरी ओढत नेल्यासारखं पडत धडपडत स्वतःला सावरत मी त्या हाताच्या दिशेला आपोआप उध्वस्त झालेल्या गाडीकडे खेचलो गेलो.पाहतो तर काय माझा माझ्याचं डोळ्यावर विश्वासचं बसेना.स्वतःला चिमटा काढून घेतला.त्या गाडीत कोण होती माहीत आहे दिशा होती दिशा.आणि दिशाला ज्या अवस्थेत मी पाहत होतो ना ते मी स्वप्नात ही कधी विचाराधीन घेतलं नव्हतं.चालकाच्या जागेवर तिचा पती गतप्राण होऊन अर्धवट धड घेऊन पडलेल्या अवस्थेत दिसत होता.त्याचे बहुतेकसे अवयव कुठल्या कुठं फेकले गेले होते.दिशा बरोबर असल्याने तो तिचा पती असावा हा मी तर्क केला होता.अन्यथा तो कोण होता हे सांगणे मुश्किल होत.त्यांची गाडी तर कोणत्याच बाजूने ती मोटारकार होती हा तर्क लावण्यापल्याड बेचिराख झालेली दिसत होती.दिशाचं नशीब बलवत्तर म्हणून की काय एका बाजूवर गाडी कशीबशी डळमळीत स्थितीत झोल खात तुटलेल्या कठड्याला टेकली होती. त्याच्या वरच्या बाजूचा कंबर पट्टा तुटला नसल्याने दिशा रक्तबंबाळ होती पण जिवंत होती.त्यामुळे पाठीमागे रेलून उसनं अवसान आणून ती मदतीची याचना करत होती. गाडीचा आतील सर्व भाग रक्ताने न्हावून गेला होता. भयाण अपघातामुळे दिशाच्या तोंडून शब्द फुटत नव्हते.पण तिचे खुणावणारे किलकिले डोळे सर्वकाही सांगत होते.सोबतीला तर कोणीच नाही.मग करायचं तर काय करायचं.पुरेशा विचार करायला वेळ नव्हता. दिशाला बाहेर काढायचं तर मला एकट्याला अशक्य कोटीचं काम वाटत होतं.पण मी दिशाच्या डोळ्यात डोळे घातल्यावर दैवी चमत्कार व्हावा ना तशी संचारलेली गुढ शक्ती सर्वांगात वाहू लागल्याची चाहूल लागली. मग मोठ्या शिकस्तीने कसेबसे बाहेर काढून मी तिला माझ्या मांडीवर घेतले. कमरेचा मळका रुमाल सोडला,कसाबसा झाडाला व होता होईल तेवढं तिला स्वच्छ पुसले.आणि त्याच रूमालने तिला वारा घालू लागलो.क्षणभर मनात आलं दिशाकडे माझ्या रुमालपेक्षा किती तरी किंमती रुमाल असतील जे आता जेवढं उपयोगाला आले नाहीत.पण त्याच्या अधिक पटीने महत्वाचं काम माझ्या या मळक्या फाटक्या रुमालने केले.म्हणजे कोणत्याही गोष्टीचं महत्व अन किंमत ते कसं उपयोगाला येत यावरून ठरते तर.चटकन मी रक्ताने माखलेल्या रुमालाचा पापा घेतला.तोच गाढ झोपेतून खडबडून जाग व्हावं ना तसं पुन्हा दिशाकडे वळलो.तिला साद घालण्याचा,ओळख पटवण्याचा आटोकाठ खटाटोप करू लागलो.पण खूप वेळ ती बेशुद्ध गेल्याच्या अवस्थेत होती.माझ्या मांडीवर डोळे भरून गाढ झोपेत असल्यासारखी निपचित पडली होती.मी सैरभैर झालो,काय करावं, कोणाला सांगावं,कुठं जावं, कोणाला बोलवावं काहीच सुचेना.डोक्याचे केस उपटून घ्यायची वेळ आली,काहीच पर्याय समोर दिसेना तेव्हा दिशाचा हात हातात घेऊन कुरवाळला.तिच्या कानाजवळ तोंड नेवून मोठं मोठ्याने दिशा$दिशा$ दिशा अशा आरडून ओरडून जवळपास पन्नास एक हाका मारल्या.मस्तकाच्या अंतिम टोकापासून नखाच्या शेवटच्या शेंड्यापर्यंत पापे घेतले.छातीशी घट्ट कवटाळलं आजारलं गोंजारलं तरी ही ती कणभरही हालेना.मग शेवटचा पर्याय म्हणून तोंडावाटे श्वास दिला तेव्हा कुठं तिचे नाजूक पाणीदार डोळे अर्धवट हालले तर उजवा हात थोडाफार वर उचलल्याचे जाणवलं.मग काय क्षणाची ही उसंत न घेता पुढचे किती तरी वेळ मी तिला सलग हाका मारत होतो.जागं करण्याची, शुद्धीवर आणण्याची उठाठेव करत होतो.इतके दिवस मनात साठा करून ठेवलेल्या एकतर्फी प्रेम पाढ्याचं तिच्या समोर पारायण करत होतो.हे सारं करण्यामागे उद्देश एकच होता.स्वतःला मोकळं करता करता दिशाला मरणाच्या दारातून पाठी खेचून दुसरा सत्यवान बनणं.पेंगुळलेले डोळे पूर्ण उघडण्याची ताकत नसलेली दिशा माझं निरंतन चाललेलं बडबडणे कान टवकारून ऐकत होती तर जमिनीला पाय न लावता चाललेल्या धडपडीचा लक्षपूर्वक कानोसा घेत होती. आश्चर्याची बाब म्हणजे या दरम्यान त्या तासाभराच्या काळात रस्ता बंद असल्यागत दुतर्फा वाहनं ठप्प झाली होती.मरणाच्या अंतिम घटका मोजणाऱ्या दिशाने सरतेक्षणी माझा धुळीने अन रक्ताने माखलेला हात आपल्या थरथरत्या हातात घेऊन आपल्या नाजूक ओठांनी त्याची अलगत पापी घेतली.माझ्या सर्वांगाला शहाऱ्याचे धुमारे फुटले हातापायावरची बारीक लव सावधान आदेशाची
अंमलबजावणी करत असल्यावाणी ताठ उभी राहिली.मन बेभान होऊन नाचू लागलं.जरा ही नजर न हलवता प्रसंग विसरून मी माझी नजर दिशाच्या नजरेत खुपसली.तिच्या डोळ्यांना पाण्याची धार लागली होती. असं असताना आपलं सारं बळं एका ठिकाणी एकटवत ती मला म्हणाली,दगडू ये दगडू हे बघ प्रसंग बाका आहे.गांभीर्य ओळख.चुकून कोण तरी तुला इथं बघतील आणि विनाकारण यात गोवतील.व कसला ही दोष नसलेला तू नाहक यामध्ये अडकून पडशील.तेव्हा असं कर होता होईल तेवढं लवकरात लवकर येथून पळ काढ.आणि हे बघ दगडू तू माझ्यावर केलेलं निर्व्याज प्रेम मी ओळखू शकले नाही मला माफ कर.वाईट वाटून घेऊ नको पण जरी या जन्मी मी तुझी नाही होऊ शकले तरी पुढील जन्मी तुझीच होण्याचा नक्की प्रयत्न करेन एवढं अभिवचन देते.शेवटचा शब्द संपतो न संपतो तोच दिर्घ सुस्कारा सोडून तिने मान खाली टाकली.ती पुढे काही तरी बोलेल म्हणून मी तिच्या तोंडाकडे,ओठाकडे,
डोळ्याकडे निरखून पाहत होतो.उघडे पडलेले ते अचल डोळे,न हलणारे ओठ आणि अचानक मुके पडलेले तोंड बघून मी डोक्याला हात लावला.मला हे गुढ अद्यापि समजेना की,आता आता माझ्याशी एवढं गर्भित बोलणारी दिशा एकाएकी शांत कशी झाली मग थोड्या वेळा पुरतीची ताकत तिच्यात कोठून आली होती.क्षणभर मला ती देवादिकांची नभातून आकाशवाणी व्हावी ना तशी ती निर्वाणीची उपदेशवाणी वाटली.दिशाच्या त्या अमूल्य विचारवाणीने मी भानावर आलो.रक्ताच्या थारोळ्यात निपचित पहुडलेल्या दिशाला चटकन खांद्यावर टाकलं.व कोणी बघायच्या आत तेथून पोबारा केला.पुढे मागे पाहत लगबगीने थेट हा डोंगरमाथा गाठला.भीतीने अंगाचा थरकाप चालू होता. धावतपळत डोंगरमाथा चढल्याने शरीरभर घामाच्या एकसारख्या धारा लागल्या होत्या.इथं पोहोचल्यावर खाली ठेऊन नव्यानं दिशाला डोळे भरून पाहिले.त्या जीव नसलेल्या लावण्य सम्राज्ञीला पोटभर पोटाशी कवटाळले. अंबराकडे तोंड करून त्या निर्विकार विधात्याला सारं बळ एका जागी करून पोटभर शिव्या हासडल्या. आणि बराच वेळ मनाची समजूत काढण्यात गेल्यावर काही तासाच्या माझ्या एकरूप प्रेमाला इच्छा नसताना शेवटची शवरूपी आहुती दिली.माझ्या जवळ कोणताच पर्याय नव्हता रे!जिवंतपणी तिच्यासाठी सर्वस्व वाहिलं.त्यावेळी तिला माझ्यासाठी वेळ नव्हता.पण आज मरण शयेवर पहुडली असता माझी प्रेम कहाणी तिने शांतपणे ऐकून घेतली होती.माझ्या फाटक्या, मळकट कळकट रुमालने तोंड पुसून घेतलं होतं.आणि विशेष म्हणजे स्वतःवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना माझं पोट भरून उरेल असे दुःखाश्रू माझ्यासाठी सांडले होते.यात मी जिंकलो रे.पण माझ्या या प्रेमाला मेल्या नंतरही मी जवळ घ्यायला तिच्या घरातील मंडळी असो अथवा समाज असो कोणत्या ही परिस्थितीत तयार झाले नसते.हे मला पक्क ठाऊक होतं असल्याने विचारांती मी त्या निर्मनुष्य परिस्थितीचा फायदा घेत इथं इथं आणून माझ्या प्रेमाला शेवटची मूठमाती दिली.आता तूच सांग मी दुसरं काय करू शकत होतो का?खरं खरं सांग मी योग्य होतो की अयोग्य?समजल्या सत्य प्रकाराने मी आवाक झालो. अरे बापरे!असे उद् गार आपसूक बाहेर पडले.पंधरा दिवसामागे गावसीमेनजीक झालेल्या त्या भीषण अपघाताचं जिवंत चित्रण ऐकून मी हादरलो.आपोआप हातपाय लटपटायला लागले. सतत पंधरा दिवस कानावर धडकलेल्या त्या जुन्या अपघात बातम्या नव्याने जाग्या झाल्या.त्यावेळी अपघातग्रत छिन्नविच्छिन्न अवस्थेतील त्यांची गाडी,धडा वेगवेगळे अवयव झालेला दिशाचा पती,त्यांचं गाडीतील विखुरलेलं सामानसुमान ही कमीजास्त प्रमाणात हाती लागलेलं पाहिलं होतं.पण दिशा ती कुठंच नव्हती.कुठं होती.कोणत्या अवस्थेत होती.मृत्युमुखी पडली होती का सुखरूप होती.काहीच समजायला मार्ग नव्हता.ती जशी होती ना त्या अवस्थेत हाती लागावी यासाठी सारा गाव,पोलीस पथकं,हेर गुप्तहेर यांनी तब्बल पंधरा दिवस उसंत न घेता सारा रानमाळ पालथी घातला होता.विहिरी,तलाव,डोंगर, दऱ्या माथा ते पायथ्या दरम्यान बारीक डोळ्यांनी तुडवले होते.दहा ते बारा कोसाचा भू-भाग किस काढल्यावाणी पिंजून काढला होता.पण हाती काय धुपाटण अशी गत झाली होती.अथक प्रयासास गतीरोधक आडवा यावा ना तशी प्रसार यंत्रणा, पोलीस पथकं मूग गिळून गप्प होती.मागावून घेतलेले नावाजलेले श्वान पथक आम्ही दोघे जाणाऱ्या डोंगर माथ्यावर पोहचले खरे पण ते ही तिथं ठराविक जागा आपल्या धारदार नखांनी उखरून माघारी परतले होते.मग दिशा गेली कुठं!ती कुठेच का सापडू नये!का तिला जमिनेने गिळली?का आकाशाने कवेत घेतली.की ती हवेत विरून गेली हे असे अनेक प्रश्न अनुत्तरीत होते.पण दबक्या आवाजात लोकांची चाललेली कुजबुज आणि दोन्ही घरचा वाढता दबाव थोपवावा म्हणून की काय एक दिवशी अचानक वर्तमानपत्रात मोठया ठळक अक्षरात छापून आलं.दिशाचं गायब प्रेत रानटी जनावराने ओढून नेल्याचे धागेदोरे अखेर हाती लागले!झालं जाता जाता सदर विषयावर पडदा पाडून तप्त वातावरण चुटकी सरशी शांत केलं गेलं होतं.पण हे सारं लोकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास अबाधित राहावा याकरिता मांडवली करून पत्रकारांना हाताशी धरून निव्वळ अफवेद्वारे केलं गेलं होतं तर. याचा खरा खुलासा मला आताचं तो रानटी प्राणी दगडू होता तर हे कळल्यावर कळलं.निःस्तब्ध होत मी ताडकन जागेवर उभा राहिलो.पुढं काय बोलावं, काहीच कळेना डोकं सुन्न व बधीर झालं होतं.विचार कक्षेच्या आवाक्या बाहेरचं होतं ते सारं.पण अद्यापि चालू असलेली कान कुजबूज सत्य होती तर.यावर खडानखडा उमगलेल्या इतिवृत्ताने शिक्कामोर्तब झालं होतं.इथं दगडू योग्य की अयोग्य याची कारणमीमांसा करण्यात मी निश्चितचं कमी पडलो असतो एवढं सागराच्या खोली इतकं ते गहन असल्याची निश्चिती पटल्याने निश्चल विचारमग्न मुद्रेने मी फक्त त्याचा चेहरा न्याहाळू लागलो.अल्पकाळ का असेना त्याला जे मिळालं होतं ना!ते आयुष्यभर पुरून उरेल इतकं होतं.नव्हे नव्हे कल्पनेच्या दहापट चक्रव्याढ व्याजासह मिळालं होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणारं नव्हतं.याने माझं मन मनोमन सुखावलं होतं.मला अबोल, थरथरत्या ओठांनी,भरून आलेले डोळे आवरत उभा असल्याचे पाहून माझी मूक समीक्षा दगडू समजून गेला होता.तरी ही जीव राहिना म्हणून न राहून तोंडावर ओघळणाऱ्या अश्रुधारा अर्धवट पुसत,नाकातुन खाली आलेलं पाणी तसंच वर ओढत,थेट भिडणाऱ्या नजरेला चोर बगल देत पाण्याने डबडबलेले लाल भडक रसरशीत डोळे आभाळाला दाखवत मला म्हणाला,काय रे दाद्या!माझ्या मांडीवर जीव सोडता समयी माझा हात आपल्या कोमल हातात धरत दिशा म्हणाली होती,दगडू पुढील जन्मी मी तुझीचं होईन!याबद्दल तुला काय वाटतंय दाद्या!तिचं ते भाष्य वाया तर जाणार नाही ना!नव्हे नव्हे ते भाकीत पुढच्या जन्मात तरी शंभर टक्के खरं होईल का रे!का?ये रे माझ्या मागल्या सारखं! माझं प्रेम क्षितिज पुन्हा एकदा मला हुलकावणी देऊन नैसर्गिक क्षितिजासम दुरूनच पाहून मला आभासी समाधान मानावं लागेल?सांग ना!तू तरी सांग!एका हाताने डोकं धरून,डोळ्यात दाटीवाटी केलेले आशेचे झुंबड किरण सांभाळत, चिमणीवाणी बारीक तोंड करून तो मला खोदून खोदून विचारत होता.त्याचा धीर अधीर झाला होता.गुडघ्याला बाशिंग बांधून तो उतावीळ प्रेमवीर हताशपणे माझ्याकडे रोखून पाहत होता. खांबावाणी उभा दगडू लगेचच पुढचा जन्म मिळावा व साथीला दिशा असावी या स्व-विश्वात पुरता मश्गुल झालेला दिसत होता.यामुळे माझ्या तोंडून काय बाहेर पडतंय याची चातकासारखी वाट पाहत होता.जणू
भविष्याचं भीती सावट नितळ होण्याची आशा दाटली त्याच्या मनात।
वर्तमानात राहिलं भविष्यात वाटत होतं यावी आपल्या जीवनात ।।
उत्तर काय द्यायचं म्हणून मी त्याच्या मुख कमलाकडे तर उत्तर काय देतोय म्हणून तो तोंडाची गुहा करून माझ्या मुखाला लक्ष्य करत होता.पण मी आळीमिळी गुपचिळीचा खेळ खेळत असल्यावाणी पुतळ्यागत चिडीचूप.कारण माझ्या समोर यक्ष प्रश्न लोंबकळत होता की बोलावं तर काय बोलावं.जिभेवर रेंगाळणारे शब्द घोळून घोळून न बाहेर पडता तसेच माघारी परतू लागले होते. त्यामुळे दोघांजवळ आता मृगजळा परी अर्धगीर्ध ही इलाज दिसेना झाल्याने दोघे न व्यक्त होता आलबेल शामियाना उभारत,चोरट्या कटाक्षाला झुकांडी देत, भविष्याला नवसाचे साकडं घालून,निसर्गाचं अथांग क्षितिज डोळ्यांत साठवत, दिशाच्या प्रेमाचं क्षितिज पुढल्या जन्मी नक्की मिळू दे रे बाबा!ही आकांक्षा उराशी जपत अबोल साथीने नभाला टक लावून,हृदयाच्या ठोक्याचे मोजमाप करत, पायाच्या अंगठ्याने भुईला टोकरत,अंधाराचं गडद वलय होईस्तोवर बसून होतो जणू खोलात पाय रुतवून बसलेल्या दोन अचल अवजड शिळाचं!!!!
- कृष्णा शिलवंत
साके,कागल कोल्हापूर
मुख्यसंपादक