Homeसंपादकीयती स्त्री आहे म्हणून…..

ती स्त्री आहे म्हणून…..

हॉल मध्ये पुरुषांची चर्चा
कुंकू आणि टिकली वर रंगलेली
आणि किचनमध्ये ती
स्वयंपाकात रमलेली

खरंतर स्वयंपाकघरातला आक्रोश
हंबरडा होऊन कधी
बाहेर आलाच नाही
उंबरठा ओलांडून ती गेली खरी
पण,
जाताना उंबऱ्यावर श्वास ठेवूनच बाहेर पडली

ती गुदमरली
ती दमली
ती थकली
पण पुन्हा आई होऊन रमली
हे ही तितकंच खरं

कुणी तिला बुरख्यात लपवली
तर कुणी पदराखाली झाकली
पण तिने तिचा गर्भ बदलला नाही
बुरख्यातली ती माँ झाली
पदराखाली आई झाली
पण तिचं बाईपण संपलं नाही

तुमच्या मात्र मिशा वाढल्या
आणि कुणाच्या मिशी विना दाढ्या वाढल्या
या मिशा आणि दाढ्या
तुमचा धर्म घेऊन वाढल्या
आणि तिने मात्र ममतेचा झरा
अजूनही आटू दिला नाही

ती आजवर गुलाम म्हणूनच झिजली
पण,
अजून कुठवर झिजेल
याचा अंदाज नाही

पण एक मात्र लक्षात ठेवा
ती आहे म्हणून मी आहे
तुम्ही आहात
आपण आहोत
आणि हे जग सुद्धा

दंगलकार नितीन चंदनशिवे
मु.पो.कवठेमहांकाळ
जि.सांगली

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular