तुझ्या जाण्याने किती वेदना
काळजास त्या झाल्या,
परी कुरवाळणार नाही आता
मी जखमा उरातल्या ओल्या.
संसार आपला गोजिरवाणा
अर्ध्यावरती मोडूनी गेला,
तुझ्यासोबत रंगवलेला रंगमंच तो
आता पडद्याआड गेला.
गोड गोजिरी फुले ती आपली
सुकुनी पार गेली,
तुझ्या जाण्याने मुले ग आपली
अबोल फार झाली.
तू असताना बालपणात रमलेली मुले
आता शहाणी ग फार झाली,
डोळ्यात त्यांच्या अवेळीच
प्रौढत्वाची झाक ती आली.
घराचं घरपण हरुवून गेले
त्याला गोडी ती उरली नाही,
मायेने लावलेला तो पारिजातक
पुन्हा बहरलाच नाही.
भरल गोकुळ होत आपलं
जगास वाटे हेवा,
मनात माझ्या जपून आहे
आठवणींचा तो ठेवा.
उठेन परत नव्याने
पुन्हा लढणार आहे
बाबा सोबत आई
पिल्लांची मी होणार आहे.
घेतली शपथ सात जन्माची
साथ मी देणार आहे,
पुढल्या जन्मी पुन्हा
तुलाच मागणार आहे.
पुढल्या जन्मी गे पुन्हा
तुलाच मागणार आहे.
देवाघरी गेलेल्या पत्नीला एक पती आपल्या मनातील भावना बोलून दाखवत आहे.
जेंव्हा पत्नी अर्ध्यावरती डाव मोडून जाते तेंव्हा पतीची अवस्था शीड नसलेल्या जहाजासारखीच होऊन जाते. मुलं आणि काम यात त्याची खूपच मानसिक ओढाताण होऊन जाते. अशा सर्व मित्रांसाठी ही कविता समर्पित
- भूषण कौशल्या लक्ष्मण मडके

मुख्यसंपादक