Homeवैशिष्ट्येराष्ट्रीय पालकत्व दिन विशेष -: नापास ? आईची गोष्ट

राष्ट्रीय पालकत्व दिन विशेष -: नापास ? आईची गोष्ट

“माझ्याशी बोलू नकोस, मला उगीच राजा सोन्या म्हणू नकोस.मला तू अजिबातच आवडत नाहीस. मी आजपासून मोठ्या आईच्या पुढ्यात झोपणार आहे.I hate you.” ऋषीचे गाल नाक लालेलाल झाले होते.त्याच्या गोल डोळ्यात राग मावत नव्हता.
त्याला त्याच्या आईचा राहीचा खूप म्हणजे खूप राग आला होता.
राही म्हणजे माझी लेक ,डॉक्टर राही सरदेशपांडे.शहरातली एक प्रसिद्ध निष्णात न्यूरोसर्जन.
संध्याकाळी अचानक आलेली एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया संपवून ती कशीबशी ऋषीच्या शाळेत त्याच्या बक्षीस समारंभासाठी पोचली होती.पण तोपर्यंत समारंभ संपला होता आणि आम्ही घरी जायला निघालोच होतो.
ऋषीला best boy चे बक्षीस मिळाले होते आणि त्याला ते आईसमोर घ्यायचे होते. मी आणि त्याचे आबा त्या समारंभासाठी गेलो होतो.पण जवळपास सगळ्याच मुलांच्या आया व काही जणांचे दोन्ही पालक आपल्या मुलांचे कौतुक पहायला आले होते. याला अपवाद फक्त ऋषीचा !त्याचे बाबा कार्डियाक सर्जन आणि आई न्यूरोसर्जन .दोघांनाही रात्रंदिवस कधीही तातडीने पेशंट बघायला ,वेळप्रसंगी शस्त्रक्रिया करायला जावे लागे.
तरी राही तिला जमेल तसा ऋषीला वेळ देता यावा म्हणून धडपडायची. एक दोन ठिकाणी तिने कन्सल्टंट म्हणून जाणे बंद केले होते. आपले पेशंट आणि ऋषी सोडून तिला बाकीचे आयुष्यच नव्हते. तिची सतार तर ती विसरूनच गेली होती.कित्येक दिवसात तिने सतारीला हातही लावला नव्हता. तिच्या परीने ती खूप करत होती. तिचा नवरा सृजन सुद्धा ऋषीला जास्त वेळ देता यावा म्हणून प्रयत्न करायचा.पण त्यालाही ते तितकेसे जमायचे नाही.आमच्या शहरात सर्जनचीच संख्या कमी होती.त्यात या दोघांइतके शिकलेले आसपासच्या पंचक्रोशीत कोणीही नव्हते. त्या दोघांची होणारी धावपळ पाहूनच आम्ही दोघांनी लेकीबरोबरराहाण्याचा निर्णय घेतला.रिहान, आमचा मुलगा जर्मनीत सेटल झालाय.त्याची मुले लहान होती तेव्हा काही वर्षे मी जर्मनीत येऊन जाऊन काढली.आता त्याची मुले मोठी झालीत.राहीचे लग्नही उशिरानेच झाले आणि ऋषी झाला तोपर्यंत तर तिची तिशी उलटून गेलेली होती.
तसा ऋषी समजूतदार होता पण आज मात्र तो खूपच रागावला होता.त्याच्या सगळ्या मित्रांच्या आया तिथे होत्या.त्याच्या एका मित्राची आईपण डॉक्टर होती तरीही ती आली होती.त्याला सगळ्यात जास्त बक्षिसे मिळाली होती तरी त्याची आई आली नाही म्हणून काही मित्रांनी त्याला चिडवले. आम्ही दोघेही त्याची समजूत काढायचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात राही आली. मग तर त्याचा पारा आणखी चढला.
घरी येतानाही तो राहीच्या गाडीतून जायलाच तयार होईना.आमच्याबरोबरच तो घरी आला.राहीने त्याच्यासाठी आणलेल्या रिमोटच.या गाडीला त्याने हातही लावला नाही.
आताही न जेवता आमच्या बेडरुममध्ये जाऊन मुसमुसत होता.इथे राहीच्याही डोळ्याला धार लागली होती.राहीच्या बाबांना ऋषीची समजूत काढायला पाठवून मी राहीजवळ बसले.माझा जीव तिच्यासाठी तीळ तीळ तुटत होता.तिची ओढाताण मला दिसत होती. माझ्या कुशीत शिरून ती कितीतरी वेळ रडत होती.”आई मी नापास झाले ग. इतक्या सगळ्या परीक्षा मी उत्तम मार्कांनी पास झाले पण आज मात्र मी नापास झाले ग. आई, मी सोडून देऊ का ग प्रॅक्टिस. सृजन आणि मी धो धो पैसे कमावतोय. पण त्याचा काय उपयोग?मी घरी राहिले तर ऋषी तरी आनंदात राहील. पण मग माझे पेशंटस्, त्यांचे काय होईल ? आजही मी लवकर यायला निघाले होते. तेवढ्यात एक head injury चा पेशंट आला.त्याचे तातडीने ऑपरेशन करणे गरजेचे होते. मला ऋषीकडे यायचे होते पण त्या पेशंटला सोडून कशी येऊ ग?तो पण कोणाचातरी मुलगा आहे नं.त्याच्याही जीवनमरणाचा प्रश्न होता ना.”
मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत शांत बसून होते.तिला मोकळी होऊन देणे गरजेचे होते.
“हे बघ बाळा ,तुझे काहीही चुकलेले नाही. परिस्थितीच तशी आहे.आपण यातून काहीतरी मार्ग नक्कीच काढू.तसा ऋषी पण लहान आहे .त्याला समज येईपर्यंतचाच प्रश्न आहे.होईल सगळे ठीक.आजची रात्र ऋषीला माझ्याच पुढ्यात झोपू देत.आम्ही दोघे बोलतो त्याच्याशी.तू पण आवर. आता सृजन पण येतील.दोघे जेवा.आपण उद्या सकाळी बोलूयात.
“आई , तुमचे जेवण झालेय का?तुम्ही पण काहीही खाल्ले नसेल ना?”
“अग,ऋषीच्या शाळेत फूड फेस्टिव्हल पण होते. आम्ही बरेच खाल्लेय तिथे. आत्ता भूक नाही.रात्री वाटले तर दूध घेऊ.”
राही कपडे बदलायला गेली
तितक्यात सृजन आलेच.मी त्यांना थोडक्यात काय घडले याची कल्पना दिली आणि आमच्या खोलीत गेले.
सृजन आणि राही मध्ये काय बोलणे झाले माहित नाही.इथे आमच्या बेडरुममध्ये आजोबा आणि नातू झोपले होते.ऋषी झोपेतही हुंदके देत होता.मी त्याच्या शेजारी आडवी होऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होते.तो आपसूकच मला बिलगला. सकाळी राहीचे डोळे सुजलेले वाटत होते. थोड्यावेळाने ऋषीही उठला.
अजूनही त्याचा राग गेलेला नव्हता.राही त्याला लाडीगोडी लावत होती पण याचा राग काही कमी होईना. राहीने स्वत: त्याला आवडतो म्हणून त्याच्या आवडीचा ढोकळा केला होता.पण ऋषी ढोकळा खायला अजिबात तयार नव्हता.
सृजन पण ऋषीच्या कलाने घ्यायचा प्रयत्न करत होता.सृजनला खरेतर ऋषीने एवढ्याशा गोष्टीचा इश्यू केलेला अजिबात आवडले नव्हते.त्याच्या मते ऋषी आता मोठा झालाय.त्याने असे हट्ट करायला नकोत.पण केवळ राहीसाठी ते गप्प बसले .आपले खाऊन झाल्यावर ते नाराजीनेच बाहेर पडले.
मी राहीला खूण केली आणि ऋषीच्या खुर्चीजवळ गेले.
“ऋषी आज मी तुला एक गोष्ट सांगणार आहे.”
“येस गोष्ट!” ऋषीचा राग कमी झालासे वाटले.
“पण जर ढोकळा खाल्ला तरच.”
“आधी गोष्ट” ऋषी हट्टाच्या मूड मध्ये होता.
“बरं,खाता खाता गोष्ट ऐक.” ऋषीच्या आबांनी मध्यम मार्ग निवडला.
“ओके डन.” गोष्टवेडा ऋषी लग्गेच तयार झाला.
त्याच्यासमोर ढोकळा आणि चटणीची ताटली ठेवली.त्याने खायला सुरुवात केली आणि मी गोष्ट सांगायला लागले.
“एक होतं गाव.त्या गावात एक जोडपं राहयचं”
“जोडपं म्हणजे कपल ना?”ऋषीनेविचारलेच.
” अगदी बरोबर.तर या जोडप्याला एक बाळ झालं. गोरापान रंग,काळेभोर केस, गोबरे गोबरे गाल, आणि सरळ नाक!एकदम छानच दिसायचं ते बाळ. आई, बाबा ,आजी ,आजोबा सगळे त्याचे खूप लाड करायचे.ते बाळ सगळ्यांसाठी अगदी खूप म्हणजे खूपच स्पेशल होते.”
ऋषीच्या ताटलीतला ढोकळा संपला .त्याच्यापुढे आलेल्या सफरचंदाच्या फोडी तो खाऊ लागला. मी क्षणभर थांबले तर लग्गेच “मोठी आई,पुढे काय झाले?सांग ना?” ऋषी पुढची गोष्ट ऐकायला उताविळ झाला होता.
“अरे सांगते,किती घाई!तर हे बाळ हळू हळू मोठे व्हायला लागले.रांगायला लागले.दुडूदुडू धावयला लागले.खूप मस्ती करायचे.जरा म्हणून शांत बसायचे नाही.आपला ऋषी एवढी मस्ती मुळीच करत नाही.नाही का हो?” मी त्याच्या आबांना विचारले.
“छे!एकदम शहाणा मुलगा आहे तो.वेडीवाकडी मस्ती मुळीच करत नाही.” आबांनी माझ्या म्हणण्याला पुस्ती जोडली.
“तर हा आपला गोष्टीतला बाळ होता ना, तो सायकल चालवायला शिकला.त्याला सायकल चालवायला खूप आवडायचे. त्याच्या मित्राने एकदा त्याला हैंडल वरचा हात सोडून सायकल चालवून दाखवली. आणि याला म्हणाला तू पण अशी चालवून दाखव. बाळाला वाटले की आपण पण चालवावी अशी सायकल ,नाहीतर आपल्याला मित्र चिडवेल.बाळ हात सोडून सायकल चालवायला गेला आणि त्याचा तोलच गेला.तो दाणकन् रस्त्यावर आपटला.त्याचे डोके एका दगडावर आपटले.बाळ एकदम निपचित पडला.त्याचा मित्र घाबरला.त्याने बाळाच्या आईबाबांना बोलावले. आईबाबा धावतपळत तिथे आले.बाळाला जवळच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले.बाळ अजूनही डोळे उघडत नव्हता.आईबाबा रडायलाच लागले.तिथल्या डॉक्टर काकांनी सांगितले की बाळाचे लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल.मी मोठ्या डॉक्टर मॅडमना फोन करून बोलावतो.
डॉक्टर काकांनी मॅडमना फोन केला तेव्हा त्या घरी जायला निघाल्या होत्या .त्यांच्या मुलाचा बर्थ डे होता.त्यांच्या घरी मुलाचे मित्र येणार होते.त्या वेळेत घरी पोचल्या नाहीत तर बाळ रुसला असता.डॉक्टर मॅडमनी क्षणभर विचार केला .त्यांना एकदा वाटले की सांगावे मला यायला जमणार नाही. त्या काही बोलणार एवढ्यात आपल्या बाळाच्या आईने डॉक्टर काकांकडून फोन घेतला आणि म्हणाल्या,” मॅडम तुम्ही प्लीज या.तुमच्याशिवाय कोणीही माझ्या बाळाला बरं करू शकणार आही.माझ्या बाळाला वाचवा .लवकर या प्लीज.असे समजा की माझा बाळ पण तुमचाच मुलगा आहे.”
मॅडमनी विचार केला की माझ्या बाळाला मी समजावेन.तो शहाणा मुलगा आहे आणि त्याचे मोठी आई,आबा आहेत ना त्याच्याबरोबर, ते मिळून छानपैकी वाढदिवस साजरा करतील. आणि त्या मॅडमनी आपल्या मुलाला फोन केला.त्याला सगळे सांगितले.मॅडमचा मुलगा एकदम शहाणा होता.तो म्हणाला,”डोन्ट वरी मम्मा .तू पटकन बाळाला बरं करायला जा.मी आत्ता मित्रांबरोबर बर्थडे सेलिब्रेट करतो मग तू घरी आलीस की आपण पुन्हा सेलिब्रेट करू. “
मॅडम मग त्या बाळाला बरं करून रात्री उशीरा घरी आल्या.इतक्या दमून आल्यावरही त्या त्यांच्या मुलाबरोबर खेळल्या .मुलाचे खूप लाड केले.
आई,बाबा आणि बाळ सगळेच हॅप्पी झाले.
ऋषी तुला काय वाटतं त्या मॅडमनी काय करायला हवं होतं?
तू त्या मॅडमचा मुलगा असतास तर तू तुझ्या मम्माला जाऊन दिले असतेस?”
ऋषीला आत्ता कुठे उलगडा झाला.
“मोठी आई,यातल्या मॅडम म्हणजे माझी मम्मा आणि तिचा मुलगा म्हणजे मी !हो ना?”
“हुशार आहे हो आपला नातू!” ऋषीच्या आबांना म्हणाले.
“आहेच मुळी !माझ्या वळणावर गेलाय” आबांनी संधी सोडली नाही.
“बरं का ऋषी बाळा .डॉक्टर म्हणजे सोल्जरच असतात.सोल्जरला कसे कधीही लढाईसाठी जायला लागते तसेच डॉक्टरांचे असते.सिरियस पेशंट आला की त्यांना पण लगेच जावे लागते.
म्हणतात ना!duty first.
आणि तुला तर इतरांना एवढ्या मोठ्या आजारातून बरे करणाऱ्या‌ आईचा अभिमान वाटायला हवा. हो ना! तुझ्या आईला वाटतय ती नापास मम्मा आहे.नापास म्हणजे फेल बरं का!आता तूच सांग ममा
पास का फेल ते!”
आबांनी ऋषीला समजावले.
“मम्मा फेल नाही काही झाली ती तर फर्स्ट आलीय.मम्मा व्हेअर आर यू?”ऋषी धावत आपल्या आईकडे गेला आणि “my mumma is the best mumma in the world “असे म्हणत तिच्या गालाच्या खूप साऱ्या पप्प्या घेऊ लागला.

(मुले आणि आपले काम या द्वंद्वात अडकलेल्या समस्त आयांना समर्पित)

  • डॉ. समिधा गांधी
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular