तमाम पत्नी, माता, भगिनी, मुली व संपूर्ण महिला वर्गास मानाचा मुजरा, नुसत्या महिला दिनीच नव्हे तर दररोजच! या सुंदर व्हिडिओत भले गोविंद दूध, दह्याची जाहिरात आहे पण त्यातील सत्य हे अधोरेखीत आहे. मला सुद्धा गॕस पेटवून चहा बनवायचा भयंकर कंटाळा मग कुकरमध्ये भात शिजवणे, त्या शिट्या मोजणे, मुलीला शाळेत सोडणे हे तर दूरच! पण १९८५ साली लग्न झाल्यापासून व पुढे १९८६ साली आम्हाला मुलगी झाल्यापासून माझी पत्नी या सर्व गोष्टी संसारात पूर्ण समरस होऊन अगदी आनंदाने करीत आलीय. सुरूवातीला तिच्या या गृहिणी कामाचे विशेष कौतुक वाटत नव्हते. मी स्वतःला उगाच मोठा समजून स्वतःतच गर्क होतो. पण हळूहळू वय वाढत गेले तसतसे पत्नीचे माझ्या आयुष्यातील महत्व वाढत गेले. मला बाहेरून घरी येताना थोडा उशीर झाला तरी काळजी करून फोन करणारी, माझ्या येण्याकडे डोळे लावून बसलेली माझ्या आई नंतरची एकमेव स्त्री या जगात असेल तर फक्त ती माझी पत्नीच! वर्षापूर्वीच आमची एकुलती एक मुलगी लग्न होऊन सासरी गेल्यावर तर आता आयुष्यात शेवटपर्यंत मला साथ देणारी पत्नी नसेल तर जीवन नाही या मताशी मी ठाम झालो आहे. खरंच, नो लाईफ विदाऊट वाईफ! आईच्या मृत्यूनंतर आणि मुलीच्या लग्नानंतर आता माझी जवळून काळजी घेणारी कोण तर बायकोच! आई ही तर आपल्याला जन्मतःच मिळते. पण आयुष्यात कायम साथ देणारी बायको ही मिळावी लागते. म्हणून नंतरच्या आयुष्यात बायकोचे महत्व हे खूप असते. याचा अर्थ असा नव्हे की मुलगी, बहीण, पुतणी, मावशी, आत्या, मामी, मैत्रीण वगैरे स्त्री नात्यांचे स्थान पुरूषांच्या आयुष्यात क्षुल्लक आहे. त्यांचेही पुरूषाच्या आयुष्यात महत्व आहे. पण माझ्या आयुष्यात मात्र पहिल्या स्थानावर आई, दुसऱ्या स्थानावर माझी पत्नी व तिसऱ्या स्थानावर माझी एकुलती एक मुलगी हाच प्राधान्यक्रम आहे. तमाम महिलांना जागतिक महिला दिनाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा!
- ॲड.बी.एस.मोरे
मुख्यसंपादक
Very Nice
Very respectful thoughts towards Ladies. Lot of thanks sir