पाऊस

काल रात्री तो आला..
घेणेकऱ्यासारखा
थाड थाड दरवाजा
वाजवत राहिला.
मी खिट्टी जोर लावून
बंद केली होती.
दरवाजा उघडत नाही
म्हणून मग त्याने
छतावर दणादणा
आवाज सुरु केला.
महिना अखेरीला
माझा नवरा दारूसाठी
सगळे कानेकोपरे
हुडकून दोनपाच रुपये
कसेही मिळवतोच.
तस्साच हा…
त्याला तर जास्त
हुडकायला लागलेच नाही.
छतातून सरळ
घरातच घुसला.
भांड्यांवर कपड्यांवर
सापडेल ती जागा
बळकावून बसला.
मी नि पोरं गपगार..
एका कोपऱ्यात
जीव मुठीत घेऊन
कुडकुडत अख्खी
रात्र जागलो..
आमची अशी
भंबेरी उडवून
हा गेला सगळे
उलटेपालटे करून

माझा लेक विचारू लागला
आये, माझ्या पुस्तकातल्या
कवितेतल्या सारखा
श्रावणातला
पाऊस आपल्याकडं
कधी पडणार?

समिधा गांधी

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular