विविधतेने नटलेल्या या देशाची
जगाच्या पाठीवर
ओळख आहे गं प्रिये,
तुझा इंडिया तर माझा भारत म्हणून
प्रिये,तुझ्या इंडियातले लोक
चिंतेत राहतात
खेळाच्या मैदानावर
उगवलेल्या गवताकडं बघून
कृषिप्रधान माझ्या भारतातील लोक
पाऊसाची वाट बघतात
भेगाडलेल्या भुईकडं बघून
प्रिये,तुझ्या इंडियातील लोक
करतात कधी बिझनेस टूर
तर कधी मौज मजेसाठी विदेश द्वौरे
माझ्या भारतातील लोकांचा
भुकेनं जातो बळी,
कधी थंडी पाऊसात
तर कधी भर उन्हातही शोधता
रस्त्याच्या कडेला
जिवंत राहण्यासाठी निवारे
प्रिये,तुझ्या इंडियातील लोक
पंचतारांकित हॉटेलमध्ये
एका रात्रीत लाखो रुपये उडवितात
अन् माझ्या भारतातील लोक
टिचभर पोटाच्या खळगीसाठी
अख्खं ऊन डोक्यावर झेलतात
प्रिये,तुझ्या इंडियातील मुलं
ओव्हल्टीन टोस्टचा नाष्टा
अन् युनिफॉर्म घालून
महागड्या शाळेत
इंडियन अभ्यास करण्यासाठी जातात
माझ्या भारतातील मुलं
शिळ्या भाकरीचा चतकोर चघळून
तांब्याभर पाण्यानं भूक भागवून
कोणी जनावरांच्या मागं
तर कोणी कोवळ्या वयात
बालकामगार म्हणून जगतात
प्रिये,तुझ्या इंडियाची ओळख
आधुनिक इंडिया,डिजिटल इंडिया
तर कधी ग्रीन इंडिया
अशी बदलती आहे
माझ्या भारताची ओळख
विविधतेने नटलेला,सर्वधर्म समभाव
अशी स्थिर आहे
प्रिये,तुझ्या इंडियात आहे
उद्योगपती,फिल्मस्टार,क्रिकेटर्स,
राजकारणी,भष्टाचारी अन् बरचं काही…
त्यांची असते नेहमी ऐशो आराम
अन् चैन मौज
माझ्या भारतातही आहे
शेतकरी,सुशिक्षीत बेरोजगार,बालमजुरी,
गरीब जनता अन् बरचं काही…
सुखानं जगण्यासाठी लावतात
मृत्यू संगे ते नेहमीच पैंज…!
- संदीप देविदास पगारे ,
मु.पो.खानगाव थडी ( जि.नाशिक )

मुख्यसंपादक