प्रिय ताईस,
कशी आहेस ग?आणि आई…
बरी आहे न? अजून सारखी रडतेय की झाली जरा शांत?
तिला म्हणावं नको इतका त्रास करून घेऊस. घडून गेलेल्या घटना बदलता येत नाहीत ना…
तू तिला समजावशील ना? जे झाल त्यात तिचा काहीही दोष नव्हता. तिने आजी आणि बाबांवर विश्वास ठेवला ही काय तिची चूक नाही.
ताई तुझ्याशी तरी नीट वागतात का ग? का तुझी खाण्याची आबाळ करतायत? मारतात का ग अजूनही छोट्या छोट्या कारणावरुन?
तू मुळीच घाबरु नकोस हं ताई. भरपूर अभ्यास कर. शहाण्यासारखी वाग. एक मात्र लक्षात ठेव. या जगात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नकोस.तुम्हा दोघींशी सगळे कसे वागतात ते पाहिले की मला माझी अवस्था बरी असेच वाटते.
तू म्हणशील जन्माला आलीच नाहीस तरी मोठ्या माणसासारखे उपदेश काय करतेस
काय करणार ग. मी आहे शापित. मुलगी आहे ना…. त्यातून तिसरी, मला जन्माला घालण्यापेक्षा जगातून घालवून देणे बाबांना सोईचे वाटले.
“आपण भेटणार नव्हतोच कधीही”
मग म्हटले तुझ्या स्वप्नात तरी भेटावे.
येते ग.!
माईची आणि आईची काळजी घे. आईला म्हणाव पुढल्या जन्मी मी पहिली म्हणून जन्माला येईन.
तुझीच
अभागी की भाग्यवान?
अजन्मा
डॉ. समिधा गांधी

मुख्यसंपादक