Homeसंपादकीयबच्चुभाऊ , शेतकर्‍यांचा आवाज भवनात घुमू द्या शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द...

बच्चुभाऊ , शेतकर्‍यांचा आवाज भवनात घुमू द्या शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करीन अशी वाढदिवसानिमित्त शपथ घ्या


आज 5 जुलै म्हणजे आदरणीय, वंदनीय, शेतकरी पुत्र, दीनदुबळे, दिव्यांग, व कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करणारे बच्चु भाऊ यांचा वाढदिवस. वाढदिवसानिमित्ताने माननीय भाऊंना वावर भरून शुभेच्छा..
मातकटलेले पाऊले विधानसभेत घेऊन जाणारा, मातीशी इमान राखणारा, दीनदुबळ्या गरीब शेतकऱ्यांचा कैवारी, शेतशिवारातून मंत्रिमंडळापर्यंत पोहोचणारा एक दमदार व शाश्वत असा आवाज म्हणजेच बच्चुभाऊ कडू, राजकारणामध्ये गट- तट समज- गैरसमज विश्वास- अविश्वास कधी यांच्यासोबत कधी त्यांच्यासोबत या गोष्टी सुरूच असतात, एखादा घराणेशाहीतून पुढे आलेला नेता जर दलबदलू पणा करत असेल तर आपल्याला काहीच वाटत नाही, मात्र सर्व सामान्य जनतेतून पुढे आलेले नेतृत्व जर काही राजनैतिक परिस्थितीमुळे थोडं चुकत असेल किंवा थोडी दिशा बदलत असेल तर आपण लगेच गैरसमज करून घेतो, मात्र त्या परिस्थितीत नेमकं कारण आपण शोधत नाही या महाराष्ट्रामध्ये घराणेशाहीतून निर्माण झालेले अनेक नेते वर्षानुवर्ष राज्य करत आहेत, त्यांनी घेतलेले निर्णय आपल्यावर लादलेले काळे कायदे ध्येयधोरण आपण निमूटपणे सहन करत असतो, बच्चु भाऊंनी घेतलेला निर्णय परिस्थिती पाहता घेतलेला असेल माननीय बच्चुभाऊ आपण आता नव्या सरकारमध्ये सामील आहात, आपल्या आवाजाची धार थोडीशीही कमी झालेली नाही हे कालच्या भाषणावरून कळते, कालच्या अभिनंदनच्या ठरावाबाबत बोलताना आपण 353 चा मुद्दा मांडला तो खूप महत्त्वाचा होता आपण चुकून एखाद्या ऑफिसमध्ये जरा मोठ्याने बोललो तरी हे आपले नोकर असलेले लोक आपल्यावर 353 प्रमाणे गुन्हा नोंदवून कारवाई करतात, मात्र सेवा हमी कायद्याच्या अंतर्गत (Right To service Act) एकही गुन्हा नोंद होताना दिसत नाही. असे का आपण पहिल्याच दिवशी जो आवाज उठवला तो दमदारपणा हेच सांगत होता सोबतीचे माणसं बदलले सरकार बदललं मात्र बच्चू कडू चा आवाज तोच आहे हे आपण दाखवून दिलं, मी आपणास विनंती करेल महाराष्ट्रामध्ये अनेक असे प्रश्न आहेत आधीच्या भाजपाच्या सरकारने महापुरुषांचे नाव देऊन शेतकऱ्यांची खोटी कर्जमाफी केली, त्याच्यानंतर आलेला आघाडीचे सरकारनेही फसवी कर्जमाफी केली, नियमीत कर्जदारांना 50 हजार रुपये देऊ असं म्हणणारा आघाडीचे सरकार जाता जाता काम करून गेलं, मात्र आताच सरकार प्रोत्साहन पर 50,000 द्यायला तयार नाही. त्याच्यानंतर पीक विम्याचा प्रश्न आहे रासायनिक खतांवरच्या अनुदानाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न आहे, काही प्रश्न केंद्राच्या हातात तर काही राज्याच्या हाती आहेत, आता केंद्रात आणि राज्यात एकाच विचारसरणीच सरकार आल्याने हे प्रश्न सुटले पाहिजेत असे वाटते, दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती आवळलेला फास म्हणजे काळे कृषी कायदे शेतकरी विरोधी धोरण॓ असे अनेक प्रश्न आहेत की आपण त्यावर काम करू शकतो, मात्र त्यासाठी सदसद्विवेक बुद्धी जागृत पाहिजे आणि आपल्याकडे तो विवेक असल्याने आम्ही समस्त कृषक समाज आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपणास शुभेच्छा देताना ही मागणी करत आहोत.
▪️कमाल शेतजमीन धारण (सिलिंग) कायदा Ceiling Act
▪️ आवश्यक वस्तू कायदा Essential Commodities Act
▪️ जमीन अधिग्रहण कायदा Land Acquisition
हे कायदे अतिशय निर्दयी व जीव घेणे आहेत शेतकऱ्यांचे हातपाय बांधून शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे असे हे कायदे रद्द करण्यासाठी आपण प्रयत्न करावा, केंद्र व राज्य सरकारने या कायद्यांचा पुनर्विचार करावा शेतकऱ्यांचे काही प्रश्न कागदावरचे व काही बांधावरचे असतात हे आपण पूर्णपणे जाणून आहात आताच्या ह्या सरकारमध्ये आपले स्थान फार महत्त्वाचे आहे म्हणून मी एक शेतकरी पुत्र म्हणून पुन्हा आपणास विनंती करतो की आपला धारदार आवाज हा शिवारातला आवाज भवनात घुमला पाहिजे, व शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, आपण कुठल्या सरकारसोबत काम करत आहोत यापेक्षा आपण कुणाचे काम करत आहोत हे फार महत्त्वाचे आहे हा महाराष्ट्रातला दिनदुबळा, दिव्यांग, शेतकरी, आपल्या सदैव पाठीशी राहील मात्र आपण त्यांचा आवाज बनून आवाज उठवला पाहिजे, आणि शेतकऱ्यांसाठी न्याय मिळवला पाहिजे…
प्रार्थयामहे भव शतायु: ईश्वर:सदा त्वाम्‌ च रक्षतु।
पुण्य कर्मणा कीर्तिमार्जय जीवनम्‌ तव भवतु सार्थकम्‌।।

                       संतोष पाटील
                   
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular