भादवण ( प्रतिनिधी ) : भादवण गावातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सरपंच संजय पाटील यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या ग्रामस्तरीय कोरोना दक्षता समितीच्या आजच्या बैठकीमध्ये गावातील कोरोना बाधित लोकांची संख्या वाढत आहे त्या अनुषंगाने भादवण गाव शुक्रवार रात्री आठ वाजले पासून ते बुधवारी रात्री अकरा वाजेपर्यंत पूर्णपणे पाच दिवस लॉक डाऊन करण्यात येणार आहे. आजरा तहसीलदार विकास अहिर आणी पी.आय. भांगे यांच्या आदेशानुसार निर्णय घेण्यात आला.
या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये फक्त वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्यात येईल. या व्यतिरिक्त किराणामाल दुकान, बांधकाम व्यवसाय, दूध डेअरी, बँकेचे व्यवहार पत संस्था, व इतर सार्वजनिक कार्यक्रम पूर्णपणे बंद करण्यात येतील. जनावरांना चारा आणण्यासाठी व अत्यंत महत्त्वाची शेतीची कामे करण्यासाठी सकाळी सात पूर्वी शेतामध्ये जाणे व सायंकाळी सहा नंतर परत यायचे आहे.
आपल्या गावामध्ये बाहेरून येणारे भाजीपाला विक्रेते इतर फेरीवाले यांना अजिबात परवानगी राहणार नाही. आपल्या गावामध्ये सूक्ष्म कंटेनमेंट झोन तयार करून कोरोणाची साखळी तोडण्यासाठी काटेकोर नियोजन केले जाणार आहे यामध्ये जे लोक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.
आजच्या ग्रामस्तरीय कोरोना दक्षता समितीच्या मीटिंगसाठी उपसरपंच, माजी सरपंच ,ग्राम विकास अधिकारी, गाव कामगार तलाठी, पोलीस पाटील कृषी सहाय्यक, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी, तंटामुक्त सदस्य पोलीस पाटील , दूध डेअरी संस्था प्रतिनिधी तसेच इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यसंपादक