मानवी मन हा आरसा आहे तर मानवी बुद्धी हा चष्मा आहे. मनाच्या आरशात जगाचे प्रतिबिंब उमटते. ते प्रतिबिंब मानवी मनाने बुद्धीच्या चष्म्यातून बघितले नाही तर त्या प्रतिबिंबाचे मानवी मनाच्या आरशाला नीट आकलन होत नाही व त्या प्रतिबिंबाशी काय व्यवहार करायचा हे त्या मनाला कळत नाही. मानवी मनाच्या आरशात दोन प्रतिबिंबे पडतात. एक प्रतिबिंब असते संपूर्ण सृष्टीचे व दुसरे प्रतिबिंब असते या सृष्टीचाच भाग असलेल्या मानव समाजाचे. या दोन्ही प्रतिबिंबांकडे बघताना मानवी बुद्धीच्या चष्म्याला दोन भिंगांचा वापर करावा लागतो. सृष्टीच्या प्रतिबिंबाकडे बघताना बुद्धीला मोठ्या भिंगातून बघावे लागते तर मानव समाजाच्या प्रतिबिंबाकडे बघताना बुद्धीला छोट्या भिंगातून बघावे लागते. त्यानुसार बुद्धीला सृष्टीविषयी नैसर्गिक दृष्टिकोन प्राप्त होतो व समाजाविषयी सामाजिक दृष्टिकोन प्राप्त होतो. उदाहरणार्थ, करोना विषाणूच्या प्रश्नाकडे बुद्धीला मोठ्या भिंगातून म्हणजे नैसर्गिक दृष्टिकोनातून बघावे लागते तर समाजातील वैवाहिक व मालमत्ता हस्तांतरण प्रश्नांकडे बुद्धीला छोट्या भिंगातून म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून बघावे लागते. नैसर्गिक दृष्टिकोन हा सामाजिक दृष्टिकोनापेक्षा फार मोठा म्हणजे विशाल असतो. सृष्टीमध्ये जसे मानवी जीवनाला अनुकूल व प्रतिकूल असे दोन प्रवाह असतात तसे समाजातही मानवी जीवनाला अनुकूल व प्रतिकूल असे दोन प्रवाह असतात. सृष्टी व समाज यांच्यातील अनुकूल प्रवाहाचा किंवा सकारात्मक घटकांचा अतिशय सुंदर असा उपयोग करून मनुष्य या अनुकूल घटकांचे सोने करतो. उदाहरणार्थ, सुंदर कलाकृतीची निर्मिती करणे. याउलट सृष्टी व समाज यांच्यातील प्रतिकूल प्रवाहाला किंवा नकारात्मक घटकांना निसर्गाचे आव्हान किंवा अवघड परीक्षा म्हणून स्वीकारून मनुष्य या प्रतिकूल घटकांना एकतर नेस्तनाबूत करतो किंवा स्वतःच्या नियंत्रणात ठेवतो. उदाहरणार्थ, सृष्टीतील रोगजंतू, विषाणूंविरूद्ध डॉक्टरी लढा व समाजातील दुष्ट प्रवृत्तींविरूद्ध, असामाजिक तत्वांविरूद्ध वकिली लढा. मन म्हणजे आरसा व बुद्धी म्हणजे चष्मा या संकल्पना मी माझ्या पद्धतीने सोप्या करून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
- ॲड.बी.एस.मोरे©
मुख्यसंपादक