वाटते भीती खचतं मन रुखरुखतेचा सडा पडतो
उपाय कोणता दिसत नसता
तर्क मंथनात बिथरून जातो
इलाज नसता मांडीत डोकं घालून
जेव्हा मी बसतो तेव्हा ठेवावा विश्वास कोणावर
प्रश्न गळ्याला येतो ……………….।1।
तो म्हणतो मी तुमचा
मी म्हणतो तो माझा
साद घालता वाद होतो
कोण तुझा अन कोण माझा
नक्की कळत तेव्हा मला
कठिण समयी कोण होतो
तेव्हा ठेवावा विश्वास कोणावर
प्रश्न गळ्याला येतो ………………..।2।
तोंडावर बरं बोलणारे
माघारी भलतचं बरळतात
हमी द्यावी म्हटलं ज्यांची
हातोहात ते ही फसवतात
विसंबून राहावं ज्याच्यावर
तो ही स्वार्थानं सोबत करतो
तेव्हा ठेवावा विश्वास कोणावर
प्रश्न गळ्याला येतो…………………।3।
पलटणारे झटकन पलटतात
स्वार्थाचा येथे बाजार भरतो
वचन बद्धता तोडावयास
किंचित कोणी कुढत नसतो
काय म्हणावं या लोकांना जो
तो माहीर दुसऱ्या फसवतो
तेव्हा ठेवावा विश्वास कोणावर
प्रश्न गळ्याला येतो ………………..।4।
जगाला मतलबी ठरवायचं का?
मी फसलोय म्हणायचं
चिंतन करता डोकं भडकत
विचारमालेस कसं जुळवायचं
एकट्याला बाजूला सारताना यातून
खरं उतरायचा प्रयास करतो
तेव्हा ठेवावा विश्वास कोणावर
प्रश्न गळ्याला येतो ………………..।5।
कृष्णा शिलवंत
मुख्यसंपादक