किशोर स्वरांगीला घेऊन इकडे या ना, मी काम करतेय, रडतेय ती.....
किशोर लगेच धावत स्वरांगी जवळ जाऊन—
अ…ले…ले ले ले
काय झालं माझ्या शोनूला, कच्याला ललते ती….
खाऊ हवाय…खाऊ
देऊ का तुला खाऊ…..
खाऊ नंतर द्या तीला, आधी आणा इकडे……
भूक लागली असेल तिला……शेवंती म्हणाली..
आणि ….आणि…..आणि…….
ये शेवंती तू ओरडलीस का आता, काय झालं….काय झालं..?
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
आज कुठे जायचे आपण फिरायला, आज माझ्या स्वरांगीचा पहिला वाढदिवस आहे ना, सांग कुठे जाऊया फिरायला....
आपले पप्पा आले बघ आपण जाऊया आता फिरायला हं…
तेवढ्यात किशोर ऑफिस मधून आपल्या बॉस ला सांगून तसाच घरी दरवाजात अवतरला…सकाळचे नऊ वाजले होते….
स्वरांगी …..स्वरांगी….
ये माझ्या स्वरांगी ……
मी आलो, आज लवकर आलो, आपल्याला फिरायला जायचंय ना, चला…..चला…..चला….
नवीन कपडे घाला आणि चला पटकन….
किशोर चहा टाकू का मी थोडा, हवाय का तुम्हाला….
हो तर, टाक थोडा कपभर ……
शेवंती चहा टाकायला किचनमध्ये गेली….
कुठे ज्यायचे गं फिरायला ह्या सोनूला घेऊन, सांग….सांग…
कुठे ज्यायचे….
किशोर लेकीबरोबर लाडात बोलत होता…..
स्वरांगी आज एक वर्षाची झाली होती… केकची ऑर्डर, आणि संध्याकाळी घर सजवायची जबाबाबदारी किशोरने जवळच असलेल्या डेकोरेटर ला दिली होती…..
“स्वरांगी शेवंती किशोर देशमुख” यांनी चहा घेतला आणि फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडले…….
शेवंती – अहो पण कुठे जायचंय फिरायला ते तुम्ही मला सांगितलंच नाही, अजून….
किशोर – अगं चल तरी, तिथे गेल्यावरच समजेल तुला……
किशोरने रिक्षाला हात दाखवला आणि तिघेही रिक्षात बसले….
ती रिक्षा थेट जाऊन थांबली ती “मॅजिक प्लेस” या रिसॉर्ट च्या समोरच….
किशोरने दोन तिकीट घेतली आणि रिसॉर्टमध्ये एन्ट्री केली….
समोरच फुलांनी सजवलेला भला मोठा गेट, त्यावर नक्षीदार अशा हिरव्यागार वेलींचा आच्छादलेला स्तर, मध्ये मध्ये गोंडस फुले खोवलेली होती, खूप छान दिसत होता तो गेट……
आत जाताना दोन्हीबाजूने हिरव्या पानांच्या ताट्या मनाला मोहून टाकत होत्या, तिथूनच पुढे गेलं की, समोर दिसणारे मनमोहक असे संपूर्ण रिसॉर्ट चे चित्र.
डाव्या बाजूला स्विमिंग पूल, त्यात पाण्यात उड्या मारणारी लहान लहान मुलं, पूल च्या एका बाजूला सरळ स्लायडिंग आणि दुसऱ्या बाजूला वेडी वाकडी वळणे घेणारी स्लायडिंग होती.
ज्या मुलांना भीती वाटायची ती मुलं सरळ असणाऱ्या स्लायडिंग ने पूल मध्ये यायची.
अगदी मजा करत एकमेकांवर पाणी उडवत सगळी मुलं खेळत होती.
किशोर ऐका ना आपण इथे या पूल मध्ये स्वरांगीला घेऊन येऊया हं का ?…..
हो हो चल पुढे बघून घे सगळं….खूप छान आहे इथे…
पूल च्या बाजूला लाकडाचे बाकडे बसायला ठेवलेले होते,….
लहान मुलं राजासारखी त्यावर पहुडली होती…..
उजव्या बाजूला थोड्या अंतरावर राहण्यासाठी छोटी छोटी खोपटी बांधली होती पण त्यात चार जण आरामात राहतील अशी होती, त्यांची बांधणी एकदम अप्रतिम होती, संपूर्ण लाकडाचा घर होतं आणि प्रत्येक झाडावर एक घर असं बांधलेलं होतं, वर जायला प्रत्येक घराला एक शिडी होती.
किशोर एका घरा जवळ येऊन थांबला….
हे बघ, ही खोली आपली आहे…….
त्या शिडीवरून आपल्याला वर जायचं आहे…..
स्वरांगीला माझ्याकडे दे…..
शेवंती स्वरांगीला किशोरकडे देऊन शिडीने वर गेली आणि त्या घराकडे पाहतच राहिली…..
बाहेरून अगदी साधे वाटणारे ते घर अगदी चमचमणाऱ्या ताऱ्यांसारखे भासत होते,…..
शेवंती ……ये शेवंती…….
घर नंतर बघ, आधी स्वरांगीला घे……..
किशोरही शिडीने वर आला…….
काय गं तू, एवढं काय पाहत होतीस……
असे बोलतानाच किशोरचेही लक्ष समोर गेलं आणि तोही दोन मिनिटे बघतच राहिला…..
पूर्ण घर लाकडाच्या पट्ट्यांनी बांधलेलं होतं, पण बाहेरचा प्रकाश आत येणार नाही अशी विशिष्ट पद्धत वापरून त्या पट्ट्यांची मांडणी केली होती….
मंद असे लाईटचे दिवे लावले होते त्या मंद वातावरणात खूप बरे वाटत होते…..मनाला मोहून जाणारे दृश्य होते ते…
स्वरांगी सर्व काही आपल्या मिणमिणत्या चिमुकल्या डोळ्यांनी पाहत होती, आपण अचानक कुठे आलो, असे वाटून “आ ” करून पाहतच बसली होती…..
मऊ असे सोफे ठेवण्यात आले होते, त्याच सोफ्यांवर नक्षीदार चादर टाकलेली आणि उशाही तशाच नक्षीदार कव्हर ने झाकलेल्या होत्या….
अहो ….खूप छान आहे हो इथे, अस वाटतंय चार पाच दिवस इथेच राहू….
अगं आपल्याला स्वरांगीचा वाढदिवस घरी साजरा करायचा आहे इथे नाही…..
बरं बरं पण परत आपण कधीतरी येऊया हं इकडे…
हो गं येऊया, चल तू, चेंज करून खाली जायचंय परत, स्वरांगिला खेळवायचंय मला खाली…..
खूप खेळायचंय तिच्या सोबत आज मला चल आटप लवकर….
चेंज करून स्वरांगीला घेऊन किशोर आणि शेवंती खाली आले…..
किशोर ऐकलात का, आपण थोडा आधी नास्ता करूया का ?
मला भूक लागली आहे थोडी…..
हो ठीक आहे, ते बघ, जेवणासाठी तिथे आहे तू जा, मी येतो आपण घेतलेल्या स्विमिंग सूट चे पैसे देऊन…..
शेवंती स्वरांगिला घेऊन जेवणावळीकडे वळली…..
सगळ्या रिसॉर्टच्या दुतर्फा हिरवीगार झाडेच झाडे असल्यामुळे शेवंतीचे मन अगदी प्रसन्न झाले होते….
जेवणावळीत तिने पाय ठेवायला खाली बघितले आणि स्वरांगिला सावरत तिने आपला पाय लगेच परत उचलला….
शेवंती थोडीशी बावरली, नीट खाली बघिले तर एक जाड काच पायाखाली होती, त्याखालून पाणी वाहत होते, ते अचानक तिला दिसल्यामुळे तिने पाय घाबरूनच मागे घेतला होता.
तिचे बावरणे बघून तिथलीच एक ताई लगेच आली….
या मॅडम, आपण पहिल्यांदाच आला आहात वाटते…..
हो, माझे मिस्टर येतायत ….
या आपण बसा तोपर्यंत….
शेवंती टेबल पर्यंत पोहचली पण तिची नजर पूर्ण जेवणावळीवर भिरभिरत होती…….
एखाद्या मायाजाल सारख्या वाटणाऱ्या त्या जेवणावळीकडे पाहताना तिला, आपण वेगळ्याच जगात आलो आहोत की काय असे वाटत होते….
तेवढ्यात किशोर आला…..
किशोरही बघत बघतच शेवंतीजवळ पोहचला….
अहो, हे काय आहे, किती मस्स्त जागा आहे हो ही….
इकडेच यायचं जेवायला आपण….
तू आता सगळं इकडेच म्हणशील की काय….
आपलं घर आहे तिकडे…..
स्वरांगी मात्र आई आणि पप्पांकडे लक्ष न देता, आपल्या डोळ्यांना जे काही स्वर्गासारखे भासत आहे ते मनात आणि डोळ्यांत साठवत होती, ती तर सगळीकडे बघून, एकटीच हसत, हातवारे करत सगळं कसं न्याहाळून घेत होती…….
छोट्या छोट्या पण चांगला प्रकाश पडेल अशा लाईट्स,आणि थोडा काळोख पण रम्य असा होता, कुठूनतरी एकदाच चमकणाऱ्या ताऱ्याप्रमाणे येणारी ती लाईट मन अगदी प्रफुल्लित करत होती, स्वरांगी मात्र आपल्या हाताने ती एक रेष पकडायला पाहत होती, पण तिच्या इवल्याशा हातांना स्पर्श करून लगेच कुठेतरी ती रेष गायब होत होती, एकटीच हसत, खेळत बागडत, आपल्याच नादात स्वरांगी होती….
टेबलवर स्वच्छ असं सफेद कपडा सजवलेला होता, वेगवेगळ्या लाईट्स मूळे तो कापड खूप छान दिसत होता त्यावर कपड्याचेच छोटे बदक तयार करून ठेवलेले होते, त्याचे डोळे म्हणून मणी लावले असल्यामुळे ते लाईट्सवर चमकत होते.
साधंच पण तिथे येणाऱ्यांना एक आठवण घेऊन जाता येईल अशी त्या रिसॉर्टची प्रत्येक जागा होती.
किशोर आणि शेवंतीने नास्ता मागविले आणि खायला सुरवात केली…..
काय जेवण आहे खूप मस्स्त आणि टेस्टी आहे अहो….
हो आपण जेवायलाही इकडेच यायचं मग तर झालं…
किशोर शेवंतीचे बोलणे मधेच अडवून म्हणाला…..
तशी शेवंती थोडी लाजली, उगाचच आपल्या कानावर आलेले केस पाठीमागे केले, आणि एक स्मित हास्य किशोरकडे बघत केले…..
तू असं बघू नको गं माझ्याकडे,….
तशी शेवंती अजूनच लाजली…….
अगं ये शेवंती जेव गप्प….खा ताटातले आधी….
आणि स्वरांगी …..
स्वरांगीने काय केलं माहितेय….?
आई आणि पप्पा नास्ता करण्यात आणि बोलत असताना तिने त्या बदकाचे डोळे काढले, ते चमकत होते म्हणून त्याच्याशीच खेळत बसली होती…
बदक बनवलेला कापड स्वतः बसायला घेतला होता……
आणि त्यावर सॉस ने मस्त असं बदक पुन्हा काढले होते….
किशोरचं लक्ष स्वरांगीकडे गेलं आणि लगेच तिला उचलले….
अगं हे काय केलंस तू…..
जाऊद्या हो….
जाऊद्या काय, काय करून ठेवलंय बघ हिने……
आणि किशोर हसायलाच लागला….
अहो हसताय काय असं….
अगं मग काय करू, हिच्या तोंडाकडे बघ जरा…..
स्वरांगीने आपले तोंड सॉस ने हनुमान सारखे रंगवून घेतले होते….
हा हा हा हा…दोघेही हसू लागले….
स्वरांगी मात्र आई-पप्पा हसतायत म्हणून तीही हसायला लागली…हे हे …हॅ हॅ हॅ….ओ ओ …हा हा ही ही….
तिच्याकडे आणि तिचे खळखळणारे हसू बघून दोघांनाही अजूनच हसायला आले…..
चला आता खूप मस्ती केली आपण, हे काय केलंस शोना तोंड बघ, कपडे बघ कसे रंगवून ठेवले आहेस,
चला आता जाऊया…..!!
शेवंती आणि किशोर उठून खाण्याचे पैसे देऊन बाहेर आले, शेवंतीने स्वरांगीला आपल्याकडे घेतले होते, आणि किशोर त्यांच्या पुढे चालत होता…..
आणि त्याला काय झाले काय माहीत, थोड्या वेळाने पुढे जाऊन पुन्हा धावत मागे आला…..
कानाला फोन लावलेला, चेहरा धीरगंभीर झालेला, आणि शेवंतीला म्हणाला…..
शेवंतीला काहीच कळत नव्हते, काय झाले असेल….
असे का धावत आले असतील, काय झालं असेल, यांचा चेहरा का? पडलेला दिसतोय…..
असे अनेक प्रश्न त्या एक वर्षाच्या जीवलाही पडले असतील…
आणि त्यामुळेच आपल्या बापाकडे रडवेला चेहऱ्याने एकटक पाहत तशीच शेवंतीच्या खांद्यावर डोके ठेवून शांत होती…..
आणि तिचा एक हात शेवंतीच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या थेंबाला आईच्याच पदराच्या शेवटाने पुसत होती…..
आणि आपल्या लाडक्या पप्पाकडे पाहत बसली होती……
एक लेक ………
“स्वरांगी शेवंती किशोर देशमुख”
✍️ विजय वैशाली दत्ताराम पराडकर
( आण्णा )
( पुढचा भाग लवकरच आपल्या भेटीला येईल…….!! )
मुख्यसंपादक