हापूस

“आये ग, आज घरी येताना आणशील का ग? “

“अरे अजून आले नाहीत बाजारात. येवढ्या लवकर कसे मिळतील? आता तर एप्रिल महिना सुरु झालाय. पुढच्या महिन्यात मिळतील तवा आणू”

“त्यो आंबेवाला वरडतो त्ये काय हाये मंग? हापूसय हापूस कवापासून चालू हाय त्येचं. एकडाव तरी आण ना ग आये. त्या बिल्डिंगमधल्या ताई हायेत न? तू जातेस त्या. त्या दिसाला पाहिलं मी त्येंच्याकडे तूच रस काडत व्हतीस ना? मंग? “
आता याला कस समजावायचा हे जनीला काही केल्या कळेना. मागल्या वर्षी पण त्याला आंबे खायचे होते. आपल्या सारख्याला
हापूस कसा परवडायचा? तीनशे चारशे रुपये बारा आंब्यासाठी मोजायचे. तेवढ्या पैशात आठ दहा किलो जवार येईल. दहा दिवस पोटभर भाकरी खायला मिळेल . तिचा मनातल्या मनात हिशोब चालू होता. तिने मग स्वस्तात मिळणारे आंबे आणले होते. तरी ते पण शंभरला बारा होतेच.तेच आंबे तिने हापूस आंब्यांच्या रिकाम्या खोक्यात नीट रचले आणि घरी आणले. तेवढ्यानेही त्याचे समाधान झाले. हापूस, हापूस असे म्हणत त्याने ते साधे आंबे पण आनंदाने खाल्ले होते. त्याच्यापेक्षा लहान दोघांनाही त्याने आंबे खाऊ घातले. तिची धाकटी तर नुकतीच बोलायला शिकली होती. हापू हापू बोलायला शिकली ती तेवढ्या दिवसात. जनीच्या डोळ्यातल्या पाण्याला मात्र खळ नव्हती. ती त्या आंब्याला शिवली पण नाही. स्वतःच्या नवऱ्याला आणि नशिबाला बोल लावत मनातल्या मनात चडफडत होती. “ह्यो दारुडा! मुडदा बशिवला त्येचा. चार आठ दिवस न्हाई पिली नि नीट कामं क्येली तरी हापूस आणता यील. आपलच नशीब फुटकं! पोराची एक मागनी त्येवडी पन न्हाई पूरी करता येत”

यंदाच्या वर्षी तिला वाटले की आधीपासून थोडे थोडे पैसे बाजू काढावेत आणि मागणी पूरी करावी पोराची. पण तेही जमले नाही. नवरा दारु पिऊन पडला आणि त्याला खोक पडली. सरकारी हॉस्पिटल मध्ये चार दिवस ठेवायला लागले आणि जनीची सगळी साठवणूक संपली वर खाडे कापले गेले ते वेगळेच.
तिला खूपच वाईट वाटले. “कायतरी करावे नी हजारभर रुपये जास्तीचे मिळवावे “ती ठरवत होती मनाशी.
यावेळी मात्र तिला नशीबाने साथ दिली. एका मॅडमकडे पाहुणे येणार होते आणि त्यांच्या नेहमीच्या कामवालीच्या मुलीचे लग्न होते म्हणून तिला महिनाभर बदली बाईच काम मिळाले. त्या मॅडम पण चांगल्या होत्या. घरातले उरलेसुरले द्यायच्याच पण तिला रोज चहा चपाती पण द्यायच्या. कधी कधी उशीर झाला तरी रागवायच्या नाहीत. जनी खुश होती या कामावर.
“माये यावेळी पण आणशील ना हापूस?” तिचा लेक तिच्या मागे तगादा लावून होता.
“व्हय रे राजा थोडा दम धर एक तारख्येला पैसे मिळत्याल मंग आणू या हं हापूस” तिने त्याला जवळ घेऊन त्याच्या गालावर हात फिरवून सांगितले.
तिची धाकटी पण “हापूश, हापूश”
म्हणत टाळ्या पिटायला लागली.
दुसऱ्या दिवशी तिने कामावरच्या मॅडम कडे विषय काढला..
“ताई तुम्ही हे आंबे कोणाकडून आणता वं? चांगले आंबे हवे होते हापूस चे “
” कोणाला ग? कोणी नवीन आलय का सोसायटीत? त्यांना हवे आहेत का?”
“न्हाई वो मलाच हवे होते. पोरं सारखी हापूस हापूस म्हणून डोस्क खायाला लागलीत. त्यांना देईन म्हंते.”
“तेवढ्यासाठी विकत कशाला आणायचे? ने की चार आंबे यातलेच “
” नको ताई, म्हंजे मला ना अख्खी प्येटीच आनायची दोन डझनाची.”
” अग.एकदम दोन डझन! सातेकशे रूपये लागतील. कसे परवडायचे तुला? “
” त्याचं काय हाय ताई या महिन्याला बदलीचं एक्स्ट्रा काम पकडलं व्हतं. त्याचे आलेत हजारभर. मग म्हनलं याखेपेला खाऊ द्येत पोरान्ला काय खात्यात त्ये हापूस पोटभरुन”
” बरं बाई, ते देसाई आहेत नं, बी विंगमधले? ते आणतात गावावरून हापूस विकायला. आंबा खात्रीचा असतो आणि पैसेही वाजवी असतात. मी सांगून ठेवेन हं त्यांना. तू जा उद्याच्याला. ते देतील हो तुला आंबे. “
” लई बेस झालं ताई. जाते उद्याच्याला मी. पोरं लई खूश व्हतील बगा “
जनी लगबगीने कामाला लागली.
घरी गेल्यावर तिने मुलांनाही आपण उद्या आंबे आणणार आहोत हे कळवले. मुले खूपच आनंदली. संध्याकाळभर तिघं एकमेकांशी काहीतरी खुसखुसत होती. जनीही अगदी आतुरतेने दुसऱ्या दिवसाची वाट पाहात होती.
दुपारी बारापर्यंत सगळी कामे उरकून ती देसायांकडे गेली. देसाई काकूंनी पेटी बांधूनच ठेवली होती.
त्या म्हणाल्या ही,”हे बघ जने, तुला म्हणून अडीचशेला दिल्येत. तुझी पोरं खातील तर आम्हालाही बरच वाटेल हो आणि हे सरबत पी ग लिंबाच, उन्हातान्हाची वणवण फिरत असतेस. जा हो आता घरी लेकरं वाट बघत असतील”
“हो जी, येते काकू. तुमचं काई बी काम असल तर सांगा. म्या करन. येते बरं का”
आंब्याची पेटी घेऊन जनी घरी पोचली. मुलं वाटच पाहात होती. हापूस, हापूस म्हणून कल्ला करत होती.
तिनेही दोन आंबे फोडले. दोन फोडी देवासमोर ठेवल्या. मुलांना म्हणाली” या रे हापूस खायला”
तिच्या मोठ्याने पहिली फोड खाल्ली आणि तो रडायलाच लागला. हा नाही, मला हापूस पाहिजे. तू दुसराच आंबा आणलास..” त्याने मोठ्याने भोकाड पसरले.
जनीला काही कळेनाच. “आरं हापूसच हाये हा. त्या देसाई काकूंकडून आणलाय. घ्ये की रं.” जनी रडवेली झाली.
“काय बी खोटं सांगू नको. मागल्या वर्षी हापूस असा लागत नव्हता. अं अं मला हापूस पाहिजे. हा आंबा नको.”
जनी हतबल होऊन एकदा मुलाकडे आणि एकदा आंब्यांकडे पाहात राहिली..
दूर एका घरात एक आजी आपल्या नातवाला अश्वत्थाम्याची कथा रंगवून सांगत होती.,” अरे गरिबी फार वाईट बघ .मुलांच्या साध्या मागण्याही पुरवता येत नाहीत आईबापाला! घरात दुध नव्हते तर अश्वत्थाम्याला त्याच्या आईने पीठात पाणी कालवून ते दूध म्हणून दिलेन हो!तो निरागस मुलगा! तो ते पाणी दूध म्हणून प्यायला. “
” आजी, पण त्याला कळलं नाही. दूध असं लागत नाही म्हणून? “नातू आश्चर्याने विचारत होता.

  • डॉ. समिधा गांधी

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular