आम्हीच का ठेका घेतला
शब्दांना तोलून मापून बोलायचे
संदर्भ त्यांचे त्यांनी त्यांच्याच मापात आम्हांस का हो तोलायचे
गारवटलेल्य धडमड्यानां
आग लागते शब्दानीच
अन् विझतातही वणवे
मणानात पेटलेले
काहीकांचे शब्द म्हणजे अलंकारिक व्याकरणाने परिपूर्ण, जसे साजुक तुपातले पक्वान्न
अन् आमचें म्हणजे आडवाटेवरचे दगड धोंडे
अहं
असं नाहीच मुळात गाव खेड्यातल्या
शब्दांनाही धार वार परीमाण
संस्कार आहे
पण तो किती परिणामकारक आहे हे तुमच्या पेक्षा आम्हालाच माहीत तुम्ही नाही सांगायच.
आई जेंव्हा बाळा, वाघा पिल्लू म्हणून हाक मारते अन् ते लाडावलेल लेकरु आपल्याच धुंदीत असतं तेंव्हा
अय कारट्या… मुडद्या कानाला काय पटकी आली की काय तूह्या
या ही शब्दांत वरच्या इतकीच माया ममता वात्सल्य पेम ओतप्रोत भरलेले असते कारण ते माईचे बोल असतात मात्र परिणाम कारकता काळजात घर करणारी.
शब्दांच्या आधी शब्द.. .. .. (टिंब टिंब) होते
कोन्हीतरी कशाला काहीतरी म्हटले आणि अन्.. .. ..(टिंब टिंब)ला तो अर्थ येत गेला
तसं तर राना वनात, दर्या खोर्यात
गाव खेड्यात बोलतो ना तेच खरे शब्द की हो त्यांनाच सुद्धतेचा भ्रतार
तुमची ति संस्कारित अलंकारिक व्याकरणाचे परिपूर्ण
म्हणता ना तिला दहा दिशांचा संकर कधीच झालाय.
तेंव्हा आमच्या बोलीला एका चौकटीत मोज मापतांना जरा
विचार करून.
कारण आम्ही बोलतो तिच
खरी भाषा
अन् तुमचा तोलून मापून
बणवलेला आकृतीबंध म्हणजे खिचडी
जगन्नाथ काकडे मेसखेडा
मुख्यसंपादक