Homeआरोग्यकोरोना संकटातून माणूस काय शिकेल ?

कोरोना संकटातून माणूस काय शिकेल ?

              मानवाने कल्पनाही नसेल केली इतकी भयंकर महामारी येईल. अंतराळात, परग्रहावर घर बांधण्याचे स्वप्न माणूस पाहू लागला होता. चांद्रयान, मंगळयान मोहिमेने भारावून गेला होता. आलेल्या प्रत्येक संकटाला माणूस सामोरे जाऊ शकतो. प्रत्येक गोष्टीवर माणूस उपाय शोधू शकतो. निसर्गालाही आव्हान देऊ शकतो. मोठ-मोठ्या कल्पनाविश्वात माणूस रमला होता. विकास म्हणजे मोठी घरं,गाड्या, उद्योग, दळणवळण, फोर जी नंतर फाईव्ह जी , भविष्याच्या योजना आखल्या होत्या. काहींच्या हातात भक्कळ पैसा आला होता. मौजमजा, सहली ,पार्ट्या म्हणजे जीवन झाले होते. माणसाची स्वार्थी वृत्ती वाढली होती. जे माझे ते माझेच आणि जे दुसऱ्याचे तेही माझेच असे तो म्हणू लागला. चंगळवाद ,भोगवाद संस्कृतीत वाढ होऊ लागली होती. प्रत्येक जण आपल्या स्वप्नात गुरफटलेला होता. अचानक कोरोना नावाच वादळ आलं. सारे जग हादरुन गेलं. मनातल्या इच्छा मनातच राहिल्या. सुरु झाली जगण्यासाठी केविलवाणी धडपड. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कित्येकांना जीव गमवावा लागला. धडधाकट माणसं डोळ्यादेखत जात होती.काही मृत्यूच्या जबड्यातून परत आली.  काहींची घरं उद्ध्वस्त झाली. कोरोनामुळे मानसिक,जीवित,सामाजिक ,आर्थिक प्रचंड हानी झाली. हे मृत्यूचं तांडव माणसं पहात होती. असं कधी नव्हतं झालं. जुनी जाणती माणसं म्हणत होती. घरात बसल्या बसल्या टीव्हीवर हे सारं बघत होती. एकमेकांना फोन करून धीर देत होती.  
      असाच एके दिवशी मला मित्राचा फोन आला. कोरोना विषयी गप्पा रंगल्या. माणूस माणसापासून कसा दूर गेला हे तो सांगत होता. मी म्हटलं, 'माणूस कोरोना येण्या अगोदरच दूर गेला होता. मनातलं प्रेम कधीच आटलं होतं. मनाने तो आधीच दुरावला होता. आज फक्त शरीराने दुरावला आहे. काम असेल तेव्हाच एकमेकांना फोन करत होते. देवाण-घेवाणीवर साऱ्यांचा भर होता.आपण या समाजाचे देणे लागतो ही भावनाच नष्ट झाली होती. नात्यांना नाव होती पण त्यातली माया कधीच आटलेली होती. माणूस तुलना करून जगत होता. अंतरंगातील सुख सोडून बाह्यरंगात रंगला होता. एवढा विचार करायलाही त्याच्याजवळ वेळ शिल्लक नव्हता. 'तुज आहे तुजपाशी/ परी तू जागा चुकलासी' //सुख, समाधान ,शांती माणूस इतरत्र शोधत होता.  या कोरोनाने माणसाला खूप शिकवल आहे'. खरच या कोरोनातून तो शिकेल काय ? असा प्रश्न मला जेव्हा पडतो. आणि समाजाचे निरीक्षण केलं असता. असे लक्षात आले. मानवतेवर संकट येतं तेव्हा माणसातील सत्प्रवृत्ती जागी होते. या काळात माणसांनी माणसांना खूप मदत केली. करोडोंचा निधी शासनाला दिला. लोकसहभागातून कोविड सेंटर उभारले. आर्थिक परिस्थितीने खचलेल्या कुटुंबाला मदतीचा हात दिला. कुणी प्लाजमा दान केले. रक्तदान शिबिरात रक्तदान केले. ज्याला जे शक्य असेल त्याने ती मदत केली. तन मन धनाने मदत केली. अजूनही मदत करत आहेत. माणूसच माणसाच्या मदतीला जातो. माणसाला माणसाची किंमत कळली. लॉकडाऊन मध्ये घरात बसून राहिल्याने कुटुंब काय असते ते कळले. माणसाचे समाजमन जागे झाले. डॉक्टर, आरोग्य सेवक, सेविका, नर्स, पोलीस, शिक्षक, ग्रामसेवक असे कितीतरी घटक कोरोनायोद्धा  म्हणून काम करत आहेत. आपण काही दिवसाचे सोबती आहोत. एकमेकांशी प्रेमाने वागले पाहिजे. मीपणा ,अहंकार काही कामाचा नाही. हसत खेळत जगणे हेच सुंदर जीवन आहे. सगळ्याच गोष्टी आपल्या हाती नसतात. निसर्ग नियती नवनवीन खेळ खेळत असते. माणसाने निसर्गनियमानुसार चालावे . ही शिकवण मात्र मिळाली. जेवढं आयुष्य आहे, ते आनंदाने जगावे. आपणही आनंदी रहावे इतरांनाही आनंदी करावे. तशी माणसाला स्वतःची मर्यादाही समजली. कोरोनासारखा महाभयंकर विषाणू किती क्रूर असतो. गरीब-श्रीमंत, जात -धर्म, कोणताही पक्ष,कसलाही भेदभाव, कसलाही वशिला,  त्याच्यापुढे चालत नाही. हे चांगलेच समजले आहे. 
           एकीकडे सत्प्रवृत्ती जागी झाली. तशी दुष्प्रवृत्तीही काम करत होती. लॉकडाऊनच्या काळात काही दुकानदारांनी आपल्या मालाचे भाव वाढवले.  काही मेडिकलवाल्यांनी औषधांचे भाव वाढवले. काही रुपयांना मिळणारे रेमडीसीवर हजारो रुपयात विकले गेले. काही डॉक्टरांनी ही संधी समजून लयलूट केली. 

एकीकडे अशा लुटीच्या घटना घडत होत्या. तशी गावाकडे जमिनीच्या बांधावरून हाणामारी होत होती. शहरातून गावाकडे आलेली माणसं जमिनीच्या वाटण्या करण्यात दंग होती. अनेक ठिकाणी या वाटण्यापायी सख्खे भाऊ पक्के वैरी झाले. काही ठिकाणी भावा बहिणीचे वाद रंगले. आयुष्याचे नाते तुटले. एवढ्या मोठ्या संकटातूनही काही माणसं शिकले नाहीत हे दुर्दैव आहे. परंतु कोरोनाने सगळ्यांचा बडेजाव, दिखाऊपणा ,पोकळ प्रतिष्ठा, माणसाचा खोटेपणा धुळीस मिळविला. अहंकाराचा पडदा टराटरा फाडला. ऋण काढून सण साजरे करणे बंद झाले. लग्न कमी खर्चात होऊ लागली. दशक्रियाविधी झटपट मोजक्या माणसात पार पडले. गावच्या जत्रात होणारे वाद काही काळ थांबले. लोकांना कीर्तनातून उपदेश करणारे महाराज घरी बायकोला मारत होते. सर्वांनी व्हिडिओ पाहिले. माणसं काय समजायचं ते समजून गेले.
यावर संत शेख महंमद महाराजांचा एक अभंग आहे.
काय दाखविता थोरी/
नाम मांडुनी बाजारी //१//
नाम विकुनिया नफा /
म्हणती पुण्य जोडती पापा //२//
न भरे पोट जया /
तेणे काट्या त्या भराव्या//३//
शेख महंमद म्हणे शुद्ध वागा /
न भरे पोट भिक मागा //४//
माणसाने सन्मार्गाने पोट भरावे. देवाच्या नावाचा बाजार करू नका. आपले आचरण शुद्ध ठेवा. असा मोलाचा संदेश ते समाजाला देत आहेत.
नक्की हे विचार आजही तंतोतंत लागू पडत आहेत.
या कोरोना संकटात
जिभेचे चोचले पुरविणारा साधे जेऊ लागला. माणसाच्या आपसूकच गरजा कमी झाल्या. जीवघेण्या स्पर्धेत पळणारा माणूस जीव वाचवण्यासाठी पळू लागला. चांगल्या आणि वाईट घटना घडल्या. आज बऱ्याच गोष्टी माणूस शिकला. परंतु याचे विस्मरण न होवो एवढीच माफक अपेक्षा.
पुढच्यास ठेच मागचा शहाणा
म्हण सर्वांच्या मुखी असते
जो त्यानुसार प्रत्यक्ष वागतो
त्याला कशाची भीती नसते …

   संकटातून माणसान शिकावं
 माणूसचं माणसाच्या मदतीला
    मानवता हाच खरा धर्म 
 कोण खातं तुमच्या प्रतिष्ठेला? ….

   सोडून द्या खोटा अहंकार
  सर्वांनी माणूस म्हणून जगावे
      आले जरी लाख संकटे
सर्वांच्या मदतीला उभे रहावे ….

   आल्या पावली संकट जाईल
       मित्रा घाई नको करू
       निसर्गाचे होऊ सवंगडी
       मानवतेचा वसा धरू … 

         माणूस नैसर्गिक स्वभावापासून दूर गेला की संकट येत राहतात. ही संकटाची मालिका भविष्यात टाळायची असेल तर निसर्ग नियम पाळणे. पर्यावरण संवर्धन करणे. स्वच्छता पाळणे, प्रदूषण वाढणार नाही याची काळजी घेणे. झाडे लावून ते जगविणे. पाण्याचा वापर जपून करणे. माणुसकी धर्म कधीच न सोडणे. सकारात्मक विचार करून आनंदी जीवन जगणे. शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवणे. नक्की या गोष्टीचा सर्वजण विचार करतील.  माझे कुटुंब, माझा गाव, माझी माणसं, माझा देश ही माझेपणाची भावना रुजेल. तेव्हाच भविष्यातील धोके टाळतील. या महामारीच्या संकटातून शिका आणि माणूस म्हणून जगा. 

- लेखक - श्री.किसन आटोळे सर
 वाहिरा ता.आष्टी जि.बीड
       (प्रा.शिक्षक)
     

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular