HomeUncategorizedक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले - शिक्षण, समता आणि स्त्रीस्वातंत्र्याची अखंड ज्योत(१० मार्च -...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले – शिक्षण, समता आणि स्त्रीस्वातंत्र्याची अखंड ज्योत(१० मार्च – स्मृतिदिन विशेष लेख )

१० मार्च हा दिवस भारतातील सामाजिक क्रांतीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा दिवस म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन. स्त्रीशिक्षणाची पहिली मशाल पेटवणारी, समाजातील अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहणारी, स्त्रीसमानतेसाठी आयुष्यभर झगडणारी अशी ही महान व्यक्ती.

आज आपण ज्या समाजात स्त्रियांना शिक्षण, अधिकार आणि समानतेची संधी मिळताना पाहतो, त्या परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांनी केली. त्यांच्या संघर्षमय जीवनाची कथा ही केवळ एका स्त्रीची नाही, तर संपूर्ण समाजाला दिशा देणाऱ्या एका महान क्रांतीची कथा आहे.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्या काळात मुलींना शिक्षण देणे तर दूरच, त्याबद्दल विचार करणेही समाजात निषिद्ध मानले जात होते. स्त्रियांना त्यावेळी बाहेर पडून समाजात वावरणे देखील शक्य नव्हते.
लहान वयातच त्यांचा विवाह महान समाजसुधारक ज्योतीराव फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिक्षण दिले. त्यांनी अक्षरज्ञान घेतले आणि पुढे त्या स्वतःच शिक्षिका बनल्या.
त्या काळात स्त्रीशिक्षण हा समाजासाठी जणू मोठा गुन्हा मानला जात होता. परंतु सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी या सामाजिक अंधकाराला आव्हान दिले.

सन १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाडा येथे भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करण्यात आली. या शाळेच्या पहिल्या शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले.
हे काम त्या काळात अत्यंत धाडसी होते. शाळेत जाताना अनेक लोक त्यांच्यावर दगड, चिखल आणि शेण फेकत असत. परंतु सावित्रीबाई हार मानणाऱ्या नव्हत्या. त्या नेहमी आपल्या पिशवीत एक अतिरिक्त साडी घेऊन जायच्या कारण शाळेत पोहोचल्यानंतर त्या साडी बदलून पुन्हा अध्यापन सुरू करायच्या.
हा प्रसंग त्यांच्या संघर्ष, धैर्य आणि शिक्षणावरील निष्ठेचे सर्वोच्च उदाहरण आहे.

सावित्रीबाई फुले यांचे कार्य केवळ स्त्री-शिक्षणापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी समाजातील अनेक अन्यायकारक प्रथांविरुद्ध लढा दिला.
त्यांनी विधवा महिलांसाठी आश्रयस्थान सुरू केले. त्या काळात विधवा स्त्रियांना अत्यंत अमानुष वागणूक दिली जात होती. सावित्रीबाईंनी त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. अनैतिक समजल्या जाणाऱ्या गर्भधारणेमुळे अनेक स्त्रिया नवजात बाळांचा त्याग करत होत्या अशावेळी सावित्रीबाईंनी या मुलांना आश्रय देण्याची व्यवस्था केली.
त्यांचे कार्य सत्यशोधक समाज या चळवळीशी जोडलेले होते. या संस्थेचा उद्देश समाजातील जातिभेद, अंधश्रद्धा आणि अन्याय दूर करणे हा होता.

सावित्रीबाई फुले केवळ शिक्षिका आणि समाजसुधारक नव्हत्या, तर त्या एक उत्तम कवयित्री देखील होत्या.
त्यांच्या प्रमुख साहित्यकृतींमध्ये काव्य फुले, बावनकशी सुबोध या ग्रंथांमधून त्यांनी शिक्षण, समता आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या कवितांमध्ये समाजातील अन्यायाविरुद्ध तीव्र आवाज आणि जागृतीचा संदेश दिसून येतो. त्यांच्या एका प्रसिद्ध विचाराचा अर्थ असा आहे,
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे.

१८९७ साली पुण्यात प्लेगची भीषण साथ पसरली. अनेक लोक मृत्यूमुखी पडत होते. त्या कठीण काळात सावित्रीबाईंनी लोकांची सेवा करण्याचे कार्य हाती घेतले.
आजारी लोकांना उपचार मिळावेत म्हणून त्यांनी मदतकार्य सुरू केले. एका आजारी मुलाला खांद्यावर घेऊन रुग्णालयात नेत असताना त्यांना स्वतःलाही प्लेगची लागण झाली.
१० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचे हे बलिदान मानवतेसाठी केलेल्या सेवाभावाचे सर्वोच्च उदाहरण आहे.

आज भारतात लाखो मुली शिक्षण घेत आहेत, विविध क्षेत्रात यश मिळवत आहेत. या परिवर्तनामागे सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाची मोठी भूमिका आहे. त्यांच्या कार्यामुळे
स्त्रीशिक्षणाचा मार्ग खुला झाला, समाजातील जातिभेदाविरुद्ध आवाज उठला
स्त्रियांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा मिळाली, शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे हा विचार दृढ झाला, त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही अनेक सामाजिक चळवळींमध्ये दिसून येतो.

आजच्या आधुनिक युगात आपण तंत्रज्ञान, विज्ञान आणि शिक्षणात प्रगती करत आहोत. परंतु समाजात अजूनही काही ठिकाणी स्त्रीभेद, अन्याय आणि अंधश्रद्धा दिसून येतात.
अशा वेळी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आठवण आपल्याला योग्य दिशा दाखवते.
त्यांनी दिलेला संदेश मोलाचा आहे.
शिक्षण हे परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन आहे.
समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे.
स्त्री आणि पुरुष समान आहेत.
मानवतेपेक्षा मोठे कोणताही धर्म नाही.

सावित्रीबाई फुले यांचे जीवन म्हणजे संघर्ष, धैर्य आणि समतेची अखंड ज्योत आहे. त्यांनी समाजातील अंधकार दूर करून शिक्षणाची मशाल पेटवली.
आज त्यांच्या स्मृतिदिनी आपण त्यांना अभिवादन करताना केवळ त्यांच्या कार्याची आठवण ठेवू नये, तर त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवण्याचा संकल्प करावा.
कारण खरे स्मरण म्हणजे त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !!

जय ज्योती, जय सावित्री

सावित्री माई कळायला जन्म अपुरा पडेल
जेव्हा कळेल तेव्हा समाजात बदल घडलेला असेल
अंगावर शेण फेकुन, खरे दरिद्री कोण ? हे कळेल
तेव्हा सावित्रीचा उद्देश आणि अभिमान सार्थ ठरेल

✍️विजय वैशाली दत्ताराम पराडकर – आण्णा

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular