आज माझ्या निवासस्थानाबाहेर जो प्रकार घडला त्यासंबंधी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण नेता शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवरही त्याचा दुष्परिणाम होतो, त्याचे उदाहरण आज आपण पाहिले. राजकारणात मतभेद असतात, संघर्ष असतात, पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्रात नाही.
परंतु, गेले काही दिवस आंदोलनाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना जे सांगण्याचा प्रयत्न झाला तो शोभनीय नव्हता. एसटी कर्मचारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घनिष्ठ संबंध आहेत. गेल्या ४०-५० वर्षांत एसटी कर्मचाऱ्यांचे एकही अधिवेशन माझ्याकडून कधी चुकलेले नाही.
तसेच ज्या ज्या वेळी प्रश्न निर्माण झाले तेव्हा त्या प्रश्नांना हातभार लावून सोडवण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांनी कष्ट घेतले. यावेळी एक चुकीचा रस्ता त्यांना दाखवला गेला आणि त्याचे दुष्परिणाम आज याठिकाणी आहेत.
कारण नसतानाही जवळपास काही महिने घरदार सोडून एसटी कर्मचारी नोकरीच्या बाहेर राहिला आणि त्यामुळे प्रचंड आर्थिक संकट त्याच्या कुटुंबावर आले. दुर्दैवाने काही व्यक्तींना यात आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घ्यावी लागली.
त्यामुळे जे नेतृत्व अशी टोकाची भूमिका घेण्याची परिस्थिती निर्माण करते तेच नेतृत्व आत्महत्या आणि तत्सम गोष्टीला जबाबदार आहे. यातून जे नैराश्य आले ते कुठेतरी काढले पाहिजे यासाठी त्यांनी याठिकाणी मला टारगेट करण्याचा प्रयत्न केला.
आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या नेहमीच पाठीशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. कर्मचाऱ्यांना चुकीचा रस्ता कोणी दाखवत असले तर त्या रस्त्याला विरोध करणे हे तुमची, माझी, सगळ्यांची जबाबदारी आहे.
आंदोलनाची थोडी माहिती कळताच तातडीने अनेक सहकारी इथे पोहचले ते माझ्या पाहण्यात होते. त्यासाठी मला वेगळे सांगण्याची गरज नाही. संकट आले तर आपण सगळे एक आहोत, हेच तुम्ही दाखवून दिले, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
मुख्यसंपादक