Homeकृषीदुग्ध व्यवसाय : देशी आणि जर्सी गाय बाबत समज-गैरसमज

दुग्ध व्यवसाय : देशी आणि जर्सी गाय बाबत समज-गैरसमज

शेतकर्‍यांच्या शेतीला सर्वाधिक उपयुक्त ठरणारा पूरक उद्योग किंवा जोडधंदा म्हणजेच दुग्ध व्यवसाय. गायी किंवा म्हशी पाळून हा व्यवसाय केला जातो. १९७० सालपासून महाराष्ट्रात या व्यवसायाला मोठी गती मिळाली. तत्पूर्वी दुग्ध व्यवसाय एवढा संघटितपणे आणि व्यापक प्रमाणावर होत नव्हता. शहरवासीयांचे राहणीमान वाढत गेले आणि दूध ही त्यांची गरज बनली. दररोज नियमितपणे दूध विकत घेण्याइतकी त्यांची ऐपत वाढली. त्यामुळे शेतकर्‍यांना दुग्ध व्यवसाय करून चार पैसे मिळविता येतील ही कल्पना रुजायला लागली. असे असले तरी १९७० पर्यंत महाराष्ट्रात पुरेशा प्रमाणात दुग्ध उत्पादन होत नव्हते. कारण महाराष्ट्रात पाळल्या जाणार्‍या देशी गायी आणि म्हशी ङ्गार कमी दूध देणार्‍या होत्या. तरीही त्या पाळल्या जात होत्या. शेतकरी विकण्यासाठीच्या दुधाचे जनावर म्हणून गायीकडे पहात नव्हते. प्रामुख्याने शेती कामाला लागणारे बैल आणि घरच्या पुरते दूध एवढीच गरज गायीने भागवावी, अशी अपेक्षा धरून गायी पाळल्या जात होत्या. दुग्धोत्पादन वाढविण्याचे ठरले तेव्हा दुधाळ जातींचा वापर करावा लागला.

महाराष्ट्रामध्ये जर्सी आणि होलस्टिन या दोन परक्या जातींच्या गायींचा विकास महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून महाराष्ट्रातल्या दुग्धोत्पादनात चांगलीच वाढ झाली. या दोन परक्या जातींच्या गायी तशाच भारतामध्ये आणणे शक्य नव्हते. त्यामुळे संकरीकरणाच्या माध्यमातून त्यांची महाराष्ट्रात वाढ करण्यात आली. परदेशातल्या जर्सी किंवा होलस्टिन या जातीच्या बैलाचे वीर्य जमा करून ते थंड पेट्यांमधून भारतात आणले जाते आणि भारतातल्या देशी गायींवर कृत्रिम गर्भधारणेच्या पद्धतीने त्याचे रोपण केले जाऊन भारतात संकरित गायी वाढवल्या जातात. देशी गायी खाल्लेल्या चार्‍याचे रूपांतर मांसात करतात तर या संकरित गायी खाल्लेल्या चार्‍याचे रूपांतर दुधात करतात. त्यामुळे हा गुणधर्म संकराच्या माध्यमातून आपल्या देशातल्या गायींमध्ये उतरवला तर आपण दुग्धोत्पादन वाढवू शकू, असे लक्षात आले आणि तिथूनच महाराष्ट्रातल्या या जर्सी गायींची पैदास वाढली. या प्रयोगामुळे महाराष्ट्रातले दुधाचे दैन्य संपलेले आहे. ४० वर्षांपूर्वी घरात दुधाचा वापर फार कमी होत होता. दैनंदिन दुधाचा रतिब लावून मुलांना हमखास दूध प्यायला देणारे लोक म्हणजे श्रीमंत लोक समजले जात होते. मध्यमवर्गीय आणि निम्नवर्गीय कुटुंबांमध्ये दूध ही चैन समजली जात होती. एकंदरीतच आपल्या आहारामध्ये दुधाचे प्रमाणही कमी होते आणि दूध ही वस्तू मोठी दुर्मिळ वाटत होती.

जर्सी गायींमुळे हे दैन्य दूर झाले आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही. आज काही लोक जर्सी गायीला नावे ठेवून पुन्हा देशी गायींचाच पुरस्कार करायला लागले आहेत. जर्सी गायीच्या दुधाने अनेक रोग निर्माण होतात अशा अफवा पसरविल्या जात आहेत. परंतु या सगळ्या अफवाच आहेत. गरिबांच्या मुलांना जर्सी गायींमुळेच दुधाचा लाभ झालेला आहे, हे कोणी नाकारू शकणार नाही. गाय कोणती चांगली ? देशी का जर्सी ? आपल्याला गाय दुधासाठी हवी असेल तर ती जर्सी म्हणजे संकरितच हवी असे माझे वैयक्तिक मत आहे. कारण देेशी गाय जर्सी गाई इतके दूध देऊ शकत नाही. सेंद्रीय शेतीला देशी गायीचेच मूत्र आणि शेण लागते असे काही लोक सांगत असतात पण त्यांनी जर्सीे गायीचे शेण- मूत्र आणि देशी गायीचे शेण- मूत्र यांचा तुलनात्मक अभ्यास करून, प्रयोग करून आपले शास्त्रीय निष्कर्ष समोर मांडायला हवे आहेत. खरे तर आपण जिला जर्सी गाय म्हणतो ती काही पूर्ण जर्सी नसते. तिच्यात ५० टक्के गुणधर्म देेशी आणि ५० टक्के गुणधर्म परदेशी असतात. ती निम्मी का होईना देशी असतेच ना ! शिवाय आपल्या राज्यात अजून तरी काही सगळ्या गायींंचे संकरीकरण झालेले नाही. अजून देशी जनावरे शिल्लक आहेत. केवळ २० टक्के गायी संकरित आहेत. ८० टक्के गायी अजूनही शुद्ध देशी आहेत.

सेंद्रीय शेतीच्या प्रवर्तकांना काही जैविक संवर्धके तयार करण्यासाठी देशी गायीचे शेण लागते आणि पिकांवर फवारण्यासाठी देशी गायीचेच गोमूत्र लागते. तेवढ्या साठी देशी गायी ठेवायला काही हरकत नाही. त्याशिवाय शेती कामासाठीही बैल लागतात. तेही देशी गायीपासूनच मिळतात. त्या बैलांसाठीही देशी गाय लागते. तेव्हा देशी की जर्सी ? या वादात ङ्गार न पडता दुधासाठी जर्सी गाय आणि शेण, गोमूत्र, बैल यासाठी देशी गाय असे तारतम्य आपण ठेवले पाहिजे. देशी गायींचे काही ङ्गायदे आहेतच पण जर्सी गाय व्यवसाय म्हणून करावयाच्या दुग्धोत्पादनासाठी गरजेची आहे हे आपण विसरता कामा नये. तेव्हा आपल्या गोठ्यात काही जर्सी गायी आणि एक दोन पूर्ण देशी गायी ठेवाव्यात. नाही तरी आपल्याकडे संकरित गायींची पैदास करण्यासाठी देशी गायी लागत असतात. गाय महत्त्वाची की म्हैस ? असाही एक वाद जारी असतो. शेती तज्ञांनी केलेल्या प्रयोगांत म्हशीपेक्षा जर्सी गाय आर्थिक दृष्ट्या ङ्गायद्याची असते असे दिसून आले आहे. आपल्याकडे ग्राहक म्हशीच्या दुधाची मागणी करतात कारण म्हशीचे दूध गायीच्या दुधापेक्षा घट्ट असते. ग्राहकांना दुधावर दाट साय आलेली आवडते. दूध विकत घेतले तर त्यापासून दही, ताक, तूपही तयार व्हावे असे त्यांना वाटत असते. म्हणून लोक म्हशीचे दूध जास्त मागतात. त्यामुळे दुधाचा धंदा करायचाच तर म्हशीच बर्‍या असे शेतकर्‍यांना वाटते. पण म्हैस गाभण राहिली की तिचा भाकड काळ सुरू होतो. ती एक वर्षभर दूध देते पण जवळपास ७ ते ९ महिने भाकड राहते म्हणजे तिचे दूध बंद होते. तिला एवढा काळ पोसावे लागते.

याबाबतीत जर्सी गाय ङ्गार परवडते. ती गाभण राहिली तर ङ्गार तर तीन महिने भाकड असते. म्हणजे वर्षाभरात ती दोन ते तीन महिने भाकड आणि बाकीचा काळ दुभती असते. तिला भाकड काळात कमी पोसावे लागते. जर्सी गाय दूधही जास्त देते. अलीकडे म्हशींच्याही नव्या आणि जादा दूध देणार्‍या जाती विकसित करण्यात आल्या आहेत. पण म्हैस ही गायीएवढे दूध देऊ शकत नाही. गायीच्या दुधाला म्हशीपेक्षा कमी पैसे मिळतात. पूर्वी तर गायीचे दूध कोणी विकतही नव्हते आणि विकतही घेत नव्हते. आता मात्र गायीचे दूध पिण्याची सवय आता लोकांनी लावून घेतली आहे. म्हशीच्या दुधात चरबी जास्त असते पण गायीच्या दुधात प्रथिने जास्त असतात. मुलांची वाढ होण्यासाठी गायीचे दूध अधिक उपयुक्त असते. म्हैस तशी तोट्यात जाणारी असली तरीही तिचेही काही ङ्गायदे आहेत. पण शेतकर्‍यांनी हिशेब मांडून या दोघींचा अभ्यास केला पाहिजे.

शेतकर्‍यांकडे जर्सी गायी असतात पण त्यांना त्या गायीची दूध देण्याची खरी क्षमताच माहीत नसते. काही शेतकरी त्यांची जोपासना करावी तशी करीत नाहीत पण तिने सहा ते सात लीटर दूध दिले तरी तिच्यावर खुष होतात. आपली जर्सी गाय सात लीटर दूध देते असे मोठ्या अभिमानाने सांगत असतात. त्यांना, या गायीने किती दूध दिले पाहिजे असे तुम्हाला वाटते ? म्हणजे ती कमाल किती दूध देऊ शकते हे माहीत आहे का असा प्रश्‍न केला की ते गोंधळात पडतात. या हवामानात तिची क्षता दररोज २० ते २५ लीटर दूध देण्याची आहे हे त्यांना माहीत नसते. २५ लीटर दूध म्हणजे दररोजचे किमान ३०० -४०० रुपये झाले. असे हे दररोज मोठे उत्पन्न देणारे यंत्र आपण घरात आणले आहे आणि त्याच्यापासून तेवढे दूध मिळवायचे सोडूून ङ्गार तर ६० ते ७० रुपयांचे दूध मिळवत आहोत हे धंदा म्हणून किती घातक आहे हे त्यांना कळत नाही.आपल्या गायीने किमान १५ ते १८ लीटर दूध दिलेच पाहिजे असा जर्सी गाय पाळणार्‍या शेतकर्‍याचा अट्टाहास पाहिजेे. तिच्या सहा ते सात लीटर दुधावर आपण खुश राहणार असू तर त्या जर्सी गायी भारतात तयार करण्याचा आणि वाढवण्याचा हा सारा उद्योग काय कामाचा ? तशा मग काही देशी गायीही एवढे दूध देणार्‍या आहेतच ना ? आपली जर्सी गाय १० लीटरच्या आता दूध देत असेल तर शेतकर्‍यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

जर्सी गायीचे पालन करण्यापूर्वी तिच्या संंबंधी तपशीलवार माहिती घेणे गरजेचे आहे. ती तिच्या देशात ५० ते ६० लीटर दूध देते. पण ती मुळात थंड हवामानात राहणारी असल्याने ती भारतात आणता येत नाही. म्हणून संकर करून तिला आपल्या देशातल्या गायीच्या पोटी जन्म द्यावा लागतो. या गायी नेहमी आजारी पडतात अशी काही लोकांची तक्रार असते आणि त्यांच्या पेक्षा म्हशी पाळलेल्या बर्‍या अशा निष्कर्षाप्रत ते येतात. पण जसर्ंी गाय आजारी का पडते ? याचा विचार केला पाहिजे. आपण जेव्हा देशी गायीला जर्सीचे इंजेक्शन देऊन आणतो तेव्हा तिच्या पोटी जन्माला येणारी कालवड ही ५० टक्के जर्सी आणि ५० टक्के देशी असते. आपण, त्याच कालवडीवर पुन्हा तोच प्रयोग केला तर तिच्या पोटी जन्माला येणारी कालवड ७५ टक्के जर्सी आणि २५ टक्के देशी असते. त्या कालवडीला पुन्हा इंजेक्शन दिले तर ती ८७ टक्के जर्सी होते आणि तिला आपले हवामान मानवेनासे होते. त्यामुळे तिसर्‍या पिढीत ती देशी वळू कडून भरवून आणली पाहिजे. जर्सी गाय कोणत्या पिढीतली आणि तिच्या शरीरात किती टक्के गुणधर्म जर्सीचे आहेत याची नांेंद आपल्याकडे असली पाहिजे. मग ती आजारी का पडते हे कळेल. महत्त्वाची आणि अतीशय महत्त्वाची बाब म्हणजे काही शेतकरी बँकेकडून २५ ते ३० हजार कर्ज काढून जर्सी गायी विकत आणतात. पण त्या गायी किती टक्के जर्सी आणि किती टक्के देशी आहेत याचा आपल्याला काहीही पत्ता नसतो. शिवाय ती किती दूध देते याचीही आपल्याला खात्री नसते. त्यामुळे ङ्गसगत होते. तेव्हा सर्वांना आपुलकीचा सल्ला असा की जर्सी गाय आपल्याच घरी तयार करा. आपल्या घरच्या गायीवर संकर करूनच ती तयार करा. ती आपल्या ङ्गायद्याची ठरते. विकतची जर्सी गाय परवडत नाही.

  • दिपक मांगले
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. Sir हा तुमचा स्वतःचा व्यवसायिक विचार आहे हा सगळ्यांनाच आवडेल असे नाही.
    जर्सी ( विदेशी ) गाय दूध ज्यास्त देते हे ठीक आहे पण या दुधात रोग प्रतिकार शक्ती कमी आसते हे नक्की.त्यामुळे ग्राहकांचे आजार वाढत आहेत. त्यामुळे देशी गाय कधीही चांगली. फक्त पैशाचाच विचार करून चालणार नाही.आणि आशा व्यवसायिक विचारामुळे देशी गायांची संख्या कमी झाली आहे.हे सत्य नाकारून चालणार नाही.

- Advertisment -spot_img

Most Popular