आज २६ जानेवारी , पूर्वा ने संदुकीत जपून ठेवलेला तिरंगा बाहेर काढून त्याला मस्तक झुकवून प्रणाम केला. आपसूकच नवरा अर्णव च्या आठवणीने डोळ्यातून अश्रूंचा महापूर ओघळू लागला . तेव्हड्यात छोट्या अंकित नी आवाज दिला तशी ती भानावर आली . तिरंग्यापुढे शपथ घेऊन बोलली , रडण्यापेक्षा ताठ मानेने माझ्या पोराला देशासाठी तिरंगा फडकवायला लावेन.
आठविला तीला तो काळा दिवस पाकिस्तान नी भारतीय लष्कराचे बंकर उध्वस्त केले , त्यांच्याशी चार हात करता करता अर्णव ला वीरमरण आले. तिरंगात लपेटून आणलेला त्याचा मृतदेह पाहून पूर्वाचा आक्रोश आसमंतात घुमत होता.
कोणा कोणाचे सांत्वन करणार ! छोटा अंकित तर पप्पा असे का गप्प म्हणून विचारत होता . इतक्या लहान वयात त्याच्यावर आघात झाला . परंतु लष्कराने तिच्या हाती जेंव्हा तिरंगा सुपूर्त केला तेंव्हाच तिने शपथ घेतली की , मी माझा पोरगा देशाला बहाल करतेय ! तिचे हे देशभक्तीचे व्रत पाहून सर्व उपस्थितांचा ऊर अभिमानाने भरून आला.
हे तिरंगा ऐकतोस ना अश्या अभागी माता , पत्नी , बहिणीचे बोल !
देशभक्ती आमच्या तानामनातून स्फुरतेय . २२ जुलै १९४७ ला भारताचे स्वातंत्र्य दृष्टीक्षेपात येताच लाहोरच्या सभेत पंडित नेहरू यांनी प्रथम तिरंगा जगासमोर फडकविला .
आणि भारताचा राष्ट्रध्वज म्हणून तिरंगा ला अखिल विश्वात मान्यता मिळाली.
स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या हुतात्मे यांचा रक्ताचा रंग तिरंग्यात सामावला आहे.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याचे हे प्रतीक म्हणजे हा तिरंगा !
देशप्रेमाने भारावून जाऊन अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
स्वातंत्र्य लढ्यात अनेक देशभक्तांना प्राण गमवावे लागले . अनेकांना तुरुंगवास घडला. निधड्या छातीवर गोळ्या झेलत ते देशासाठी लढत होते. वंदे मातरम् चा घोष,
….अखेरच्या क्षणी करत
आनंदाने फासावर चढले.
हे सर्व करण्यासाठी अंगी असावी लागते ती देशभक्ती !!
तिरंगा सदैव मनाने डौलात , फडकत रहावा ह्यासाठी तिन्ही भारतीय सैन्य दलातील जवान अहोरात्र देशासाठी आपली सेवा बजावत तिरंगाचे रक्षण करतात.
आपल्या स्वतंत्र भारताचा तिरंगा ही प्रत्येक भारतीयांची अस्मिता आहे .
असा हा आपला राष्ट्रीय ध्वज भगवा (केशरी ) , पांढरा , हिरवा - त्याग , शौर्य , शांती , बुद्धी , सत्य , समृद्धीचे प्रतीक आहे. त्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र दिमाखात विराजमान झाले असून त्या चक्राला चोवीस आरे आहेत.
तर ह्या तिरंग्याचा मान सदैव आपल्या मनात जपावा.
झेंडा आमुचा प्रिय देशाचा ….
फडकत वरी महान
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम !!
- राजश्री भावार्थी
मुख्यसंपादक