सातारा (प्रतिनिधी ) – गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे(NCP Shashikant Shinde) आणि भाजपा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले(BJP Shivendrasingh Bhosale) यांच्यातील वाद जिल्ह्यात गाजत होता. माझ्या वाटेला जाईल त्याची वाट लावल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी थेट शशिकांत शिंदे यांना धमकीवजा इशारा दिला होता, त्यामुळे साताऱ्यातील राजकारण पेटलं होतं.
अशातच राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना पक्षात येण्याची ऑफर दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शशिकांत शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले की, शिवेंद्रसिंहराजे भोसले नगरपालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत आले तर तेच पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनेलचे नेतृत्व करतील, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेत कधी पक्षीय राजकारण येऊ दिले नाही. रामराजे यांच्या माध्यमातून सगळेजण एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करतील असं त्यांनी सांगितले.
तसेच पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे पार पाडण्यावर सुरुवातीपासूनच भर दिलेला आहे. जावळी, कोरेगाव हे दोन्ही तालुके माझ्यासाठी जवळचे आहेत. दोन्हीमधील माझे राजकारण सुरूच राहणार आहे. माझ्या विचारांचे लोक जर एकत्र येऊन पक्षासाठी काम करत असतील तर मला देखील पक्षवाढीसाठी आणि पक्षाला फायदा होण्यासाठी प्रयत्न करायला नकोत काय? त्याचा कोणाला त्रास होत असेल तर मी काय करू शकणार आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यावर आम्ही भर दिला आहे परंतु ज्या ठिकाणी विरोध होईल, तिथे ताकदीने निवडणूक लढली जाईल असा अप्रत्यक्ष इशाराही राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.
मुख्यसंपादक