सोलापूर/ पंढरपूर : सोलापूर शहर व परिसरात गुरुवारी पहाटेपासून वातावरणात मोठा बदल झालेला आहे. सोलापूर शहर, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागात पहाटेपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, काल बुधवारी रात्रीपासूनच शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती. पंढरपुरात बुधवारी रात्री अचानक रिमझिम पाऊस पडण्यास सुरुवात झाली. या अवकाळी पावसाने द्राक्षांच्या बागीचे नुकसान होत असल्यामुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये घाबरट निर्माण झाली आहे.
कालपासूनच शहर व तालुक्यात थंडी कमी झाली होती. तर बुधवारी दिवसभर उकाड्याचे वातावरण निर्माण झाले. परंतु रात्री उशीरा अचानक विजेचा कडकडाट सुरू झाला. त्याचबरोबर रिमझिम पाऊस पडण्यास सुरुवात झाली. तसेच शहर व ग्रामीण भागातील लाईट गेली होती.
वादळी वारा, विजेचा कडकडाटासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. यामुळे द्राक्ष, डाळींब, ज्वारीसह रब्बी पिकाचे धोक्यात आली आहे.
मोहोळ तालुक्यातील पेनूर , कोण्हेरी , येवती ,कामती , पुळूज आदी परिसरात द्राक्षांच्या मोठ्या प्रमाणात बागा आहेत. या पावसामुळे द्राक्ष बागायतदारांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता द्राक्ष बागायतदार कुंडलिक टेकळे यांनी वर्तवली आहे.
मुख्यसंपादक