आज आम्हाला तुमची आठवण येईल बघा महाराज!
सलवार झब्बा नि फेटा घालून
सारे सारे धावतील बघा महाराज!
तुम्हाला त्यांच्या गोटात घ्यायचा
आटापिटा करतील महाराज..
तुम्ही कशी त्यांचीच मक्तेदारी आहात याचे प्रदर्शन
पण करतील बरं का महाराज..
फक्त एखादी कल्याणच्या सुभेदाराची सून आली समोर तर तिला साडीचोळीच्या आत आपण नग्न आहोत याची जाणीव करून देतील महाराज..
कोणी मनातल्या मनात तर कोणी उघडपणे तिची साडी फेडतील बघा महाराज…
हं हं थांबा महाराज..
कितीही रक्त खवळले तरी
त्या मूर्तीतून बाहेर येऊ नका..
तुम्ही येऊन काय काय थांबवाल?
कोणाकोणाला अडवाल?
नको राजे, कधी नाही ते आता पराभूत व्हाल.
तुमच्या मावळ्याला फाईव्हस्टारच्या बाहेर तुतारी फुंकताना पहाल?
येणाऱ्या जाणाऱ्या ऐऱ्यागैऱ्याला मुजरा करताना पहाल?
तुम्हीच स्थापन केलेल्या गडकिल्ल्यांवर गेलात तर
नक्की दिसतील तुम्हाला झिंगलेले मावळे..
त्यांची झिंग वेगळी आणि तुमची जग जिंकायची
झिंग वेगळी बर का महाराज…
हे सारे पहाण्यापेक्षा तुम्ही आपले फोटोत
किंवा मुर्ती मध्ये हातात तलवार धरून
मस्त पोझ देऊन उभे रहा.
तुम्हाला आणि आम्हाला तेच
सोयीचे पडेल महाराज..
आज रोजी साऱ्यांना आपण शिवरायांचा मावळा असल्याचा साक्षात्कार होतो की नाही
बघाच तुम्ही महाराज
डॉ.समिधा गांधी
मुख्यसंपादक