Homeघडामोडीनॅशनल कॉन्फरन्स - काँग्रेसमध्ये आघाडी ! जम्मू आणि काश्मीर मधील सर्व ९०...

नॅशनल कॉन्फरन्स – काँग्रेसमध्ये आघाडी ! जम्मू आणि काश्मीर मधील सर्व ९० जागांचे वाटप लवकरच

श्री नगर : जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या सर्व ९० जागांवर काँग्रेसबरोबर आघाडी निश्चित झाली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांबरोबर बैठक झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘आमची बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात झाली. आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून आम्ही सर्व ९० जागांसाठी करारावर स्वाक्षरी करू.’

जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला तीन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, ”आघाडी होत आहे आणि मला आशा आहे की, आमच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना योग्य सन्मान मिळेल. स्वातंत्र्यानंतर केंद्रशासित प्रदेश राज्ये बनली आहेत, परंतु राज्य केंद्रशासित प्रदेश बनण्याची ही पहिलीच वेळ आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील लोकांना त्यांचे लोकशाही अधिकार परत मिळावेत, यासाठी आमचे प्राधान्य असेल, असे आम्ही जाहीरनाम्यात स्पष्ट केले आहे.’

माकप नेते एम.वाय. तारिगामी यांना आघाडीमध्ये सामील करून घेण्याबद्दल अब्दुल्ला यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. अब्दुल्ला यांनी आशा व्यक्त केली की लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी ही आघाडी प्रचंड बहुमताने विजयी होईल. सर्व अधिकारांसह पूर्ण राज्याचा दर्जा बहाल केला जाईल. अब्दुल्ला म्हणाले की, देशात सध्या असलेल्या फुटीरतावादी शक्तींना पराभूत करण्यासाठी निवडणूक लढवणे हा आमचा समान कार्यक्रम आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीपूर्वी सर्व तपशील उघड केला जाईल, असे ते म्हणाले. निवडणूक लढवणार की नाही या प्रश्नावर मात्र अब्दुल्ला यांनी मौन बाळगले.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular