सध्या गुगलबाई गुगलबाई सांगतेस का ग? हा खेळ सुरू आहे. हा खेळ खेळताना एकातून दुसरे, दुसऱ्यातून तिसरे असे काहीतरी पहात राहिले जाते. त्यात भोजनकुतूहल नावाच्या ग्रंथावरची लेखमाला दिसली. कुतुहलापोटी मी पण भराभर वाचली.
तंजावर येथील एकोजीराजे यांच्या पत्नी दीपाबाई यांनी रघुनाथ पंत नवास्थे या महाराष्ट्रातून तिथे पोचलेल्या पंडिताकडून हा ग्रंथ लिहून घेतला.
हा ग्रंथ संस्कृतमधून श्लोक स्वरूपात लिहिलेला असला तरी त्यात काही शब्दांचा मराठी अर्थ कंसात उद्धृत करून त्यांनी आपला मराठी बाणा जपला आहे. तर या ग्रंथात अनेक पदार्थांची कृती व त्या पदार्थाच्या सेवनामुळे शरिराला होणारे फायदे याबद्दल लिहिलेले आहे. जवळपास चारशे पाककृती यात दिलेल्या आहेत.
त्यातल्या एका लेखात प्रपानक नावाचा पदार्थ वाचनात आला. कृतीमध्ये आंबट आंबा उकडून त्यात साखर अथवा गूळ घालून त्याचे पेय बनवावे असे लिहिलेले होते. मी मनात म्हणाले अरेच्चा हे तर आपले पन्हे!
भीमसेनाने बनवलेले पेय असाही त्यात उल्लेख आहे. हा भीमसेन म्हणजे महाभारतातला भीम की काय ते कळले नाही. ( याच भीमाने अज्ञातवासात बल्लवाचार्याचा वेष धारण केला होता व शिरीखंड नावाचा पदार्थ बनवला होता तो पदार्थ श्रीकृष्णाला खूप आवडला होता असे कुठेतरी वाचले होते.)
मूळ मुद्दा पन्ह्यावर लिहिण्याचा होता ही महाभारतापासून सुरू झालेली गाडी शेवटी आपल्या स्टेशनात पोचली!!
चैत्र महिना म्हटले की चैत्रातले हळदीकुंकू, पन्हे आणि आंबाडाळ यांची आठवण हटकून होते. चैत्रगौरीची सजावट, सुंदर कलाकुसरीने तयार केलेले चित्रांगण यापेक्षाही जास्त लक्ष आंबाडाळीवर आणि पन्ह्यावर असायचे.
पन्हे करायची पद्धत एकदम सोपी आहे. आंबट चवीच्या कैऱ्या स्वच्छ धुवून कुकरात तीन शिट्ट्या देऊन उकडायच्या. थंड झाल्यावर गर वेगळा करायचा. गराच्या दुप्पटीने साखर किंवा गुळ घालून मिक्सरमध्ये बारीक करून त्यात थोडे मीठ, वेलची पूड,चार केशराच्या काड्या घातल्या व योग्य प्रमाणात पाणी मिसळले की झाले पन्हे तयार!
यात काहींना वेलची ऐवजी जिऱ्याची पूड व सैंधव मीठ घातलेले आवडते.
काही गूळ व साखर समप्रमाणात घालतात.
उन्हाच्या झळा लागत असताना चटकदार वाटल्या डाळीबरोबर हे थंडगार पन्हे पिताना अक्षरशः दिल को थंडक मिळते.
माझ्या एका मैत्रिणीकडे कच्च्या कैरीचे पन्हे प्यायले होते. कैरीची साले काढून तिचे बारीक तुकडे करायचे किंवा किसायची त्यातच पाणी साखर मीठ घालून ते मिक्सरला लावायचे. गाळणीने गाळून वेलची पूड घालून प्यायचे. झटपट होणारे हे पन्हे ही रुचीपालट म्हणून मला आवडले.
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा हापूस आपल्या आवाक्यात येतो, तेव्हा पन्हे करताना मी आवर्जून अर्धवट पिकलेला हापूस आंबा इतर कैऱ्यांबरोबर उकडते. पिवळसर केशरी रंगाचे पन्हे दिसतेही देखणे आणि अधिक चवदार लागते.
कैरी कोणत्या आंब्याची आहे त्याप्रमाणे पन्ह्याची चव बदलते. तसेच त्यातल्या साखर गुळाचे प्रमाणही बदलते.अतिगोड किंवा अतिआंबट पन्हे मजा किरकिरी करते.
मे महिन्यात अनेक साठवणींचे पदार्थ बनवताना मी कैऱ्या उकडून गर गरम असतानाच त्यात दुप्पट प्रमाणात बारीक चिरलेला गूळ व थोडी साखर घालून अजिबात पाणी न घालता तसाच मिक्सरवर बारीक करून घेते. मोठ्या तोंडाच्या काचेच्या बरणीत हा गर भरून थंड झाला की फ्रीजमध्ये घालते. अॉक्टोबर महिन्यापर्यंत हा गर फ्रीजमध्ये छान टिकतो.(त्या नंतरही टिकत असेल पण आमच्याकडे तोपर्यंत बरणीतला गर रसातळाला गेलेला असतो!!) जेव्हा गरज पडेल तेव्हा पाणी घालून पन्हे करता येते.
ही करोनाची गडबड संपली की घरच्या घरी पन्हे करोन बघा हं.
- डॉ. समिधा गांधी
मुख्यसंपादक