उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले हे समजण्यासाठी बाहेरचे तापमान वाढायच्या आधीच टिव्हीवर कोल्ड्रिंक्स, अमूललस्सी वगैरेंच्या जाहिराती सुरू होतात मग हळूहळू उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होते.
मागच्यावेळी मी लिंबूसरबता विषयी लिहिले होते. त्या सारखेच किंबहुना मला त्यापेक्षाही आवडणारे घरगुती सरबत म्हणजे कोकम सरबत .
अतिशय आल्हाददायक रंग असलेली आणि त्यापेक्षाही उत्तम चव असणारी या फळांची झाडे कोकण परिसरात मुबलक प्रमाणात दिसतात. काजू, फणस, आंबे यासारख्या स्टार मंडळींमुळे थोडे साईडट्रॅकला पडलेले हे फळ. याला कोकणात रातांबा म्हणतात. कोकमाला रातांबा का म्हणतात हे माहीत नाही. अर्थात त्यामुळे कोकमाच्या चवीत फार फरक पडत नाही.
आज भारतातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध असलेली सोलकढी कोकम आगळ व नारळाच्या दुधापासून बनवतात.
आपण आधी कोकम सरबताबद्दल बोलूया. साधारण एप्रिल च्या मध्यानंतर कोकमाच्या झाडावर ही फळे दिसू लागतात. सुरुवातीला हिरवी असणारी फळे पिकली की लाल व गुलाबी यांच्या मिश्रणाच्या रंगाची दिसू लागतात. या रंगाचे वर्णन करणे अवघड आहे. याला कोकमी रंगच म्हणायला हवे.
ही फळे आमच्या पनवेलमध्ये भाजीबाजारात वडाच्या झाडाजवळ काही बायका विकायला आणतात. ताजी फळे मिळावीत म्हणून जरा फिल्डिंग लावावी लागते. भर उन्हात बाजाराच्या चकरा माराव्या लागतात. या तपश्चर्येला फळ मिळते आणि चांगली ताजी, उत्तम रंगाची मोठ्ठाली कोकमफळे आपल्या पदरात सॉरी पिशवीत पडतात.
घरी आल्या आल्या पहिल्यांदा टबभर पाण्यात चांगली दोनतीनदा धुवून जुन्या पंचावर त्यांना पसरवून ठेवायचे.
फळाला पाणी राहिले की कोकमसरबताला बुरशी लागायची शक्यता असते म्हणून ही विशेष काळजी कोरडी केलेली कोकमे आधीच स्वच्छ धुवून पुसलेल्या विळीवर चिरायची. या फळांमध्ये पांढरा गर असतो.तो वेगळा करायचा. व साले वेगळी ठेवायची.(मी कोकम चिरायला बसले की माझा लेक माझ्या आसपास घोटाळायचा. त्याला तो गर खायला खूप आवडतो) एकेका कोकमाचे दोन किंवा चार तुकडे करायचे. सगळी कोकमे चिरून झाली की ज्या वजनात कोकम आणले असेल त्याच्या अडीचपट साखर घालून एका टोपात झाकून ठेवायचे. अधूनमधून हलवत राहायचे. साखर विरघळून चारपाच दिवसात पाक सुटू लागतो. साधारण आठवड्यात साखर पूर्ण विरघळते. तो पाक गाळणीने गाळून बाटलीत भरून ठेवायचा हा पाक म्हणजेच कोकम सरबताचा अर्क. हा फ्रीज मध्ये नाही ठेवला तरी टिकतो पण त्यापासून बनवलेल्या सरबताला काळपट रंग येतो. फ्रीजमध्ये बाटलीत भरून ठेवला तर वर्षभर याचा रंग अजिबात बदलत नाही. यात चार ते पाचपट पाणी थोडे मीठ व जीरे पूड (जिरं भाजून खलबत्त्यात केलेली ताजी पूड) घातली की सुंदर सरबत तयार होते. काही जण याला अमृत कोकम म्हणतात.
मे महिन्यात सकाळभर हुंदडून आल्यावर किंवा आताच्या काळात क्लिनिकमधून भर दुपारी घरी आल्यावर हे सरबत पिताना त्याला अमृत कोकम का म्हणतात याची प्रचिती येते.
आता बाजारात कॅनमध्ये भरलेला कोकम सरबताचा अर्क मिळतो. पण त्याचे बनवलेले सरबत आणि घरी केलेल्या अर्काचे सरबत यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. अर्थात अडिअडचणीला कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा हे सरबतही चालून जाते.
माझ्या क्लिनिकच्या बाहेर असलेल्या जयंत ज्यूस सेंटरमध्ये कोकमसोडा नावाचे एक अप्रतिम पेय मिळते. बहुदा कोकमसरबताच्या अर्कात पाण्याऐवजी सोडा घालून ते बनवत असावेत.
तर असे हे कोकम सरबत! सध्याच्या घरबसल्या स्मरणरंजन करण्यामुळे एप्रिल, मे महिन्यात करायच्या गोष्टींची आठवण काढत होते त्यात हे कोकमसरबत आठवले.
तसे या कोकमापासून आमसुले, कोकमातल्या बियांपासून कोकम तेल (तळपायाच्या भेगांवरचा पारंपरिक रामबाण उपाय) कोकम आगळ वगैरे अनेक उपयोगी पदार्थ बनवतात. कोकम पित्तनाशक, पाचक आहे असेही मानतात. पण माझ्यासाठी ते उत्तम चवीचे सरबत देणारे फळ आहे!
एक बार पिओगे तो बार बार पिओगे. पिओ तो जानो….
- डॉ . समिधा गांधी
मुख्यसंपादक
[…] By अमित गुरव उन्हाळा स्पेशल – कोकम सरबत […]