आजरा ( प्रतिनिधी ) -: हलकर्णी–महागाव–मलिग्रे–शृंगारवाडी–चंदगड–इब्राहिमपूर हा महत्वपूर्ण महामार्ग सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) रुंदीकरण व मजबुतीकरणाच्या कामांतर्गत सुरु आहे. हा मार्ग पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असला तरी नंतर महामंडळाकडे वर्ग करण्यात आला. मात्र, कामाच्या अंमलबजावणीमध्ये गंभीर त्रुटींकडे नागरिकांनी लक्ष वेधले आहे.
पेद्रेवाडी फाट्यापासून काही अंतरावर रेडेकर पोल्ट्री फार्मजवळ अत्यंत धोकादायक ‘S’ आकाराचे वळण असून, ते वळण कायम ठेवूनच रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हे वळण गेले अनेक वर्षे अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखले जात असून, येथील नागरिकांचा तीव्र विरोध आहे.
मलिग्रे, कानोली, हत्तीवडे, होनेवाडी या गावांच्या ग्रामपंचायतींनी लेखी पत्राद्वारे हे वळण तत्काळ काढण्याची मागणी केली आहे.“हे वळण कायम ठेवले तर मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असा नागरिकांचा इशारा आहे.
कामाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सिमेंट काँक्रीट रस्त्यावर आवश्यक ते पाणी न मारल्याबद्दल नागरिकांनी असंतोष व्यक्त करत वरिष्ठ कार्यालयास याबाबत कळविण्याची मागणी केली आहे.या सर्व मागण्यांसाठी नागरिकांनी आजरा कार्यालयात सहायक अभियंता पी. बी. सुर्वे यांचेमार्फत निवेदन सादर केले.
निवेदनात वळण काढण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कळवावे आणि तोपर्यंत काम थांबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांना या बाबत सूचना पाठविण्यात आल्या असल्याची माहितीही देण्यात आली.जर
धोकादायक वळण काढण्याची मागणी मान्य झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.अशोक शिंदे, सुभाष पाटील, संजय कांबळे, प्रकाश सावंत, संजय घाटगे, धनराज बुगडे, शिवाजी निऊंगरे आदी नागरिक निवेदन देताना उपस्थित होते.
✅ दैनंदिन अपडेट्स हवे आहेत?
मग आजच Link Marathi सोबत जोडून रहा!
📲 WhatsApp Channel (तुमचा नंबर पूर्णपणे सुरक्षित)
👉
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
▶️ YouTube – ताज्या बातम्या आणि व्हिडिओंसाठी
👉
https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH
महत्वाच्या बातम्या, माहितीपूर्ण लेख, आणि दैनंदिन घडामोडी — एकाच ठिकाणी!

मुख्यसंपादक



