Homeघडामोडीआजरा नगरपंचायतमध्ये निधी उधळपट्टीचा आरोप; लोकवस्ती वगळून निर्जन भागात रस्ते — नगरसेविका...

आजरा नगरपंचायतमध्ये निधी उधळपट्टीचा आरोप; लोकवस्ती वगळून निर्जन भागात रस्ते — नगरसेविका निशांत चांद

आजरा | लिंक मराठी न्यूज
आजरा नगरपंचायतीच्या कारभारावर सत्ताधारी आघाडीतीलच नगरसेविका निशांत चांद यांनी कडक शब्दांत टीका करत निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकवस्ती नसलेल्या साबाज फार्म हाऊस परिसरात लाखो रुपयांचा रस्ता उभारण्यात आल्याचा आरोप करत, मदरसा कॉलनी व साई कॉलनीसारख्या प्रत्यक्षात नागरिक राहत असलेल्या वस्त्यांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
“नगरसेविका म्हणूनच जर सन्मानजनक वागणूक मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांची काय अवस्था होत असेल याचा विचार करावा,” असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट बोट ठेवले. शहरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना बांधकामे सुरू असून, बांधकाम परवान्याबाबत नागरिकांना स्पष्ट व पारदर्शक माहिती दिली जात नसल्यामुळेच हा प्रकार वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.


सभांमध्ये अधिकारी गोड बोलून वेळ मारून नेतात; मात्र सभा संपल्यानंतर लोकप्रतिनिधींना मिळणारी वागणूक समाधानकारक नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. अंदाजपत्रकाच्या पार्श्वभूमीवर आयोजित विशेष सभेची माहिती आदल्या रात्री उशिरा देण्यात आल्याने अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले. या पद्धतीत तातडीने सुधारणा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अल्पसंख्यांकांसाठी राखीव असलेल्या निधीचा योग्य व पारदर्शक विनियोग व्हावा, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
नगरसेविका चांद यांच्या या स्पष्ट आणि आक्रमक भूमिकेमुळे आजरा नगरपंचायत कारभारातील पारदर्शकता, निधीचे योग्य नियोजन आणि लोकप्रतिनिधींचा सन्मान या मुद्द्यांवर व्यापक चर्चा सुरू झाली आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular