Homeवैशिष्ट्येअक्षय तृतीया महत्त्व आणि इतिहास

अक्षय तृतीया महत्त्व आणि इतिहास

महत्वाचा सण व सुमुहुर्त व आपल्या प्राचीन कृषीसंस्कृतीतील महत्वाचा दिवस.परंपरेने  शेतीतील माती, शेती अवजारे, नंदी आणि शिवांची पूजा रूढ आहे.
महात्मा बसवेश्वर यांची  आज जयंती. या उदार महामानवाने समतेची द्वाही दिली ,त्यांचा स्मरण दिनचं !

अक्षय तृतीया…
अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे  दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया… अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे.

आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करतात व त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात.
प्रथेप्रमाणे या दिवशी मातीचे घागरीऐवढे मडके आणून, त्यात पाणी भरुन त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. गरजूंना, भुकेलेंना अन्नदान होते. प्राणी पक्ष्यांसाठी अन्न, पाणी याची सोय  केली जाते, असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानतात.

या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्’(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे.

आखाजी… पितृ देवोत्सव, दोलोत्सव, वसंतोत्सव, चंदनयात्रा, आखिती, आख्यातरी, अखतारी अशा अनेक नावाने हा सण संपूर्ण देशात साजरा होतो.

विशेषत: खानदेशात या सणाला खूप वेगळं महत्त्व आहे. अहिराणी भाषेतील गाणी, झोक्यावर बसून माहेरी आलेल्या महिला गातात..

आथानी कैरी तथानी कैरी
कैरी झोका खाय बो

वडाच्या गर्द छायेखाली बांधलेला झोका आणि त्यावर बसून मस्त रंगलेला खेळ, गाणी हे पारंपारिक  दृश्य आता जवळपास दुर्मिळच होत आहे.
भारतीय पंचांगामध्ये दसरा दिवाळीप्रमाणेच अक्षयतृतीया महत्त्वाची मानली जाते.

महाराष्ट्रात आजही या दिवशी  खेडोपाडी वर्षभराचे सर्व शेती कामाचे करार  करण्याची प्रथा आहे.
सालदार, शेतगडी, गहाणखत याच दिवशी खेड्यात केले जाते. अनेक घरात तर केवळ अक्षय तृतीयेपासूनच आंबे खायला सुरुवात होते. तत्पूर्वी पितरांना नैवेद्य दाखविले जाते.

शेतीमध्ये काम करायची सुरुवात देखील याच दिवसापासून केली जाते. जमिनीची भाजणी, ढेकळे फोडून वाफे तयार करणे, राख गोबर मातीत एकरूप करून ठेवणे, शेताभोवती कुंपण किंवा बांध घालण्याची प्रथा याच दिवसापासून पाळली जाते.

  विशेषत: ग्रामीण भागात या दिवसात असणारी पाण्याची टंचाई लक्षात घेता पाणी बचतीचा संदेशही या निमित्ताने दिला जातो. अक्षय तृतीया हा सण केवळ सण म्हणून न पहाता त्यातील इतर संदर्भासाठी ही महत्वाचा आहे.

मातीत आळी घालणे व पेरणी
( आखीतीत आळं ,अनं बेंदराला फळ – ही लोकम्हण रुढ आहे )
पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय तृतीया येते. वर्षाऋतूच्या आगमनाचा, म्हणजे मृग नक्षत्राचा व या तिथीचा घनिष्ट संबंध आहे.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे अक्षय तृतीयेपर्यंत मशागत करण्याचे काम पूर्ण करावे.मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे. अक्षय तृतीयेच्या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृतिकेचे कृतज्ञ भाव ठेवून पूजन करावे. त्यानंतर पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालावीत व त्या आळयांमध्ये बियाने पेरावे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही. त्यामुळे वैभव प्राप्‍त होते, असाही समज !

पूर्वीच्या काळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याकारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपिक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नसे. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभूशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे होत असे. अक्षय तृतियेच्या शुभमूहुर्तावर म्हणजेच पावसाला सुरुवात होण्यापूर्वी पेरणीची कामे पूर्ण केली जात असत. हल्ली पावसाचे प्रमाण अगदीच कमी असल्याने व  पेरणी न केल्याने जमिनी नापिक होत चालल्या आहेत व कसदार धान्य पिकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.
अक्षय तृतियेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात. तसेच आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही. म्हणून वृक्ष संगोपन ही प्रथा !

अक्षय तृतियेच्या कृषी संस्कृती शेती शुभारंभ दिन, मृतिका व शिवलिंग लिंगायत धर्माचे संस्थापक उदार बसवेश्वरांना जयंती  दिन त्यांचे प्रतिमेचे  व शिवाचे इष्टलिंगाचे पूजन करण्याचे महत्त्व . परशुराम जयंती, अन्नपूर्णा जयंती, कुबेरास शिवांकडून  संपत्ती भांडार रक्षक नेमणूक दिन अशा अनेक दिनांसाठी प्रसिद्ध आहे.

अक्षय तृतियेच्या दिवशी प्रजेच्या पालनपोषणाची जबाबदारी शेतीद्वारे आपले खांद्यावर घेणाऱ्या नंदीचे , त्याचे प्रेरणास्थान असलेल्या शिवशक्तीचे पूजन  सामूहिकरीत्या  करतात.शक्‍ति  शक्‍ति दे ! अशी आराधना करतात. (आधारित ) _   

राजेंद्र गुरव (  यमाई औंध )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular