आजरा (हसन तकीलदार):- नवीन तयार करण्यात आलेल्या तथाकथित राष्ट्रीय महामार्ग 548 वर लावण्यात येणारा टोल रद्द करावा.अशा आशयचे निवेदन बहुजन मुक्ती पार्टीने तहसीलदार यांना दिले. सदर निवेदन नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी स्वीकारले.
या निवेदनात म्हटले आहे की,संकेश्वर ते बांदा ह्या दोन गावांना जोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने NH548-H या नवीन महामार्गाची बांधणी केलेली आहे. यापूर्वी या ठिकाणी या दोन गावांना जोडण्यासाठी राज्य महामार्ग उपलब्ध होता. मुंबई पुणे तसेच इतर ठिकाणाहून गोव्याला जाण्यासाठी सर्वात सोयीस्कर असा आंबोली घाट या रस्त्यावरच असल्यामुळे या रस्त्यानेच जास्त प्रमाणात लोकांची वर्दळ होत असते. असे असले तरीही या रस्त्याला खूप जास्त प्रमाणात वाहनांची वर्दळ होत नाही. याशिवाय आपला पश्चिम घाट हा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये असल्यामुळे येथे जे जंगल आहे त्या जंगलातील वृक्षांची वृक्षतोड होऊ नये यासाठी रस्त्यांना मंजुरी दिली जात नाही. अशा परिस्थितीमध्ये सदर ठिकाणी राज्य महामार्गनेही वाहतुकीचे काम होण्यासारखे परिस्थिती होती. परंतु तरीही सदर महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया केलेली आहे. याखेरीज सद्यस्थितीत बनवलेला राष्ट्रीय महामार्ग हा अतिशय अरुंद असून अनेक ठिकाणी तो निकृष्ट असल्याचेही दिसून येत आहे. वनविभागातून गेलेला सदर महामार्ग हा तर अगदी पूर्वीच इतकाच असून त्यामध्ये यत्किंचितही रुंदीकरण अथवा मजबुतीकरण झालेले नाही. याशिवाय राष्ट्रीय महामार्गावर देण्यात येणाऱ्या सुविधा सदर रस्त्याला उपलब्ध नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या रस्त्यावर कुठेही दुभाजक नसल्यामुळे सदर रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढणार आहे. दुभाजक नसल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना चांगली गती देखील मिळणार नाही. याशिवाय राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने तेथे ॲम्बुलन्स व टोविंग व्हॅन उपलब्ध केलेली असली तरीही ज्याप्रमाणे राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी उड्डाणपूल, अपघात मदत केंद्र, इ यापैकी सुविधा असल्या पाहिजेत त्या अद्याप दिसून येत नाहीत. असे असले तरीही सदर महामार्गावर टोल नाका बांधकाम करून पूर्ण करण्यात आलेला आहे व तो 18 जुलै 2025 म्हणजेच आज पासून सुरू होणार असल्याची जाहिरात वृत्तपत्रात दिलेली आहे. या रस्त्यावर टोल नाका होणार असल्याचे अगोदर आजऱ्यातील जनतेला कोणीही पूर्वसूचित केलेले नव्हते. या रस्त्यावर टोल लागल्याने त्याचा सगळ्यात जास्त फटका हा गडहिंग्लज, आजरा, आंबोली, सावंतवाडी या परिसरातील सर्वच लोकांना होणार आहे. याशिवाय भविष्यामध्ये सॅटॅलाइट सर्वेलन्स नेटवर्क ने वसुली होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असे झाले तर आजरा तसेच आजूबाजूच्या गावा-शहरांमधील लोकांना या रस्त्याचा नाहक भुर्दंड बसणार आहे. आम्ही राष्ट्रीय महामार्गावर इतर ठिकाणी असणारे टोल नियमितपणे भरत आलेलो आहोत. तेथे आम्ही कोणत्याही टोलला विरोध करत नाही. कारण त्या रस्त्यांवर त्या प्रकारच्या सोयी सुविधा सरकारने पुरवलेल्या आहेत. परंतु या दोन गावांना जोडणाऱ्या कमी अंतराच्या, कमी रुंदीच्या, निकृष्ट रस्त्याला देखील जर सरकारने टोल लावला तर यापूर्वी ज्याप्रमाणे मुघल किंवा इंग्रज जुलमीकर लोकांवरती लादत होते त्याचप्रमाणे हा कर लादत असल्याचे प्रकार दिसून येत आहे. सदर रस्त्यावर टोल लागण्याला सर्वच स्थानिक लोकांचा कडाडून विरोध आहे. या विरोधात गेल्या सहा महिन्यांपासून टोल मुक्ती संघर्ष समितीच्या माध्यमातून विरोध प्रदर्शन करण्याचे निरंतर कार्य सुरू आहे. याबद्दल यापुर्वी निवेदने देणे, धरणा प्रदर्शन करणे, रॅली काढणे तसेच अगदीच नाईलाज म्हणून रास्ता रोको करणे या प्रकारचे सर्व विरोध प्रदर्शनाचे मार्ग स्थानिक जनतेने अवलंबलेले आहेत. याविषयी आपल्याकडून दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी आंदोलनकर्त्यांना एक लेखी पत्र सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अथवा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने देण्यात आलेले आहे. तरी लोकांच्या लोक भावनेचा विचार करून व आपल्याच यंत्रणे कडून केलेल्या कामाचा अपराधबोध म्हणून आपण सदर टोल वसुली संदर्भात सुरू असलेली कोणतीही प्रक्रिया तात्काळ थांबवावी. आवश्यकता भासल्यास येथील जनतेशी थेट संवाद आयोजित करूनही आपण यावर तोडगा काढावा आणि आपण काढाल ही आशा आहे.

बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने आपणास या अगोदरही टोल विरोधी भूमिकेची निवेदने देण्यात आलेली आहेत. त्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अथवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेच्या मार्फत लेखी प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तरी सदर निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर सदर टोलची सुरू असलेली प्रक्रिया थांबवावी व सामान्य नागरिकांना आपण लावणार असलेला टोल तात्काळ थांबवावा. अन्यथा बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने विरोध प्रदर्शनाची आंदोलने आणखी तीव्रतेने निरंतर सुरू राहतील याची दखल घ्यावी.असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी डॉ. उल्हास त्रिरत्ने, डॉ. सुदाम हरेर, अवधूत सुतार अमित सुळेकर, राहुल मोरे, दशरथ सोनुले, संदीप दाभीलकर,भिकाजी कांबळे, महादेव कांबळे, रवी देसाई, झुल्पीकार शेख, शोभा कांबळे, संतोष मासोळे, सुरेश दिवेकर, सुधाकर प्रभू, नितीन राऊत आदिजण उपस्थित होते.

या निवेदनाच्या प्रती मुख्य अभियंताNHI, ,मुख्य अभियंता PWD NHI, जिल्हाधिकारी, कोल्हापूर,मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर, नाम. प्रकाश आबिटकर(पालक मंत्री), माजी आमदार राजेश पाटील(चंदगड विधानसभा), शिवाजी पाटील (( चंदगड विधानसभा ) नाम.हसन मुश्रीफ, कागल विधानसभा तथा आरोग्य शिक्षण मंत्री , आम. दिपक केसरकर(सावंतवाडी विधानसभा), नाम. नितीन गडकरी( दळणवळण मंत्री, भारत सरकार)
यांनाही देण्यात आल्या आहेत.
https://youtube.com/@linkmarathi-news
📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!
📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!
🌐 वेबसाईट:
👉 www.linkmarathi.com
📺 यूट्यूब चॅनेल:
👉 youtube.com/@linkmarathi-news
📘 फेसबुक पेज:
👉 facebook.com/profile.php?id=100063705265578
💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp:
👉 whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!
📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

मुख्यसंपादक