आजरा | लिंक मराठी न्यूज
आजरा नगरपंचायत हद्दीतील आजरा–गारगोटी मार्गावरील कमलकुंज आवारातील वाढीव ‘ए’ व ‘बी’ विंग इमारतीस देण्यात आलेल्या पूर्णत्वाच्या दाखल्यावरून वाद निर्माण झाला असून या प्रकरणाने आता चांगलाच ताप घेतला आहे. आवश्यक नागरी सुविधा पूर्ण नसतानाही इमारतीस पूर्णत्व प्रमाणपत्र (Completion Certificate) देण्यात आल्याचा आरोप करत आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती आणि कमलकुंजमधील सदनिकाधारकांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
“पूर्ण सुविधा नसताना दाखला कसा?” नागरिकांचा सवाल
सदनिकांच्या खरेदी-विक्री व्यवहारानंतर विकासकाने त्याच परिसरात वाढीव विंगचे बांधकाम केले. मात्र या नव्या बांधकामात मूलभूत नागरी सुविधा अपूर्ण असल्याची शंका उपस्थित करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित पूर्णत्व दाखला कोणत्या निकषांवर देण्यात आला, याबाबत प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

नागरिकांनी उपस्थित केलेले गंभीर मुद्दे
निवेदनात खालील बाबींची तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे —
नियमित व मुबलक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आहे का?
सांडपाणी निचरा व रेनवॉटर हार्वेस्टिंगची योग्य व्यवस्था आहे का?
लिफ्टसाठी बॅकअप व्यवस्था उपलब्ध आहे का?
कमर्शियल व निवासी भागासाठी आवश्यक कॉमन टॉयलेट सुविधा आहे का?
अग्निशमन वाहनासाठी पुरेशी मोकळी जागा आहे का?
फायर फायटिंग सिस्टम व स्वतंत्र पाइपलाईन बसवली आहे का?
सीसीटीव्ही, सुरक्षा व्यवस्था व सोसायटी स्थापन प्रक्रियेबाबत कार्यवाही झाली आहे का?

पूर्णत्व दाखला रद्द करण्याची मागणी
वरील सुविधा अपूर्ण असतानाही दाखला देण्यात आला असल्यास तो चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीच्या आधारे मिळविण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नागरिकांनी नमूद केले आहे. त्यामुळे वाढीव ‘बी विंग’ला देण्यात आलेला पूर्णत्व दाखला तात्काळ रद्द करून विकासकास सर्व नियमबद्ध सुविधा पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी ठाम भूमिका समितीने घेतली आहे.
जबाबदारी निश्चित करा; अन्यथा उपोषण
या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी व लेखी अहवाल दहा दिवसांत सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा सर्व सदनिकाधारक कुटुंबीयांसह नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
विकासकावर कायदेशीर कारवाईचा दबाव वाढणार?
नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित विकासकाविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नगरपंचायतीकडून या प्रकरणी अधिकृत भूमिका स्पष्ट होणे अपेक्षित असून, प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे आजरा शहराचे लक्ष लागले आहे.
कमलकुंज प्रकरणामुळे नगरपंचायत कारभारातील पारदर्शकता, बांधकाम नियमांचे पालन आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुख्यसंपादक


