Layoff : इंस्टाग्राम, स्नॅपचॅटसारखे असणारे ‘हे’ भारतीय अॅप करणार तब्बल २० टक्के कर्मचाऱ्यांची कपात |
Layoff : जगभरामध्ये आर्थिक मंदीचे कारण देत अनेक कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये Amazon , Google, Meta , Microsoft यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. अनेक कंपन्यांनी तर दोनवेळा कर्मचारी कपात केली आहे. आता यामध्ये भारतीय शॉर्ट व्हिडीओ App असणाऱ्या Chingari या अॅपने आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. हे अॅप इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट सारखे आहे. जून २०२० मध्ये टिकटॉकवर बंदी घातल्यावर चिंगारी अॅपला भारतीय बाजारपेठेमध्ये लोकप्रियता मिळाली.
चिंगारी अॅपने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. चिंगारीच्या प्रवक्त्याने बिझनेस टुडेकडे या निर्णयाची पुष्टी केली. यावेळी ते म्हणाले, ” चिंगारीमधील संघटनात्मक पुनर्रचनेचा एक भाग म्हणून २० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याबद्दल आम्हाला खेद वाटतो. हा निर्णय घेणे आमच्या व्यवस्थापनासाठी सर्वात कठीण होते. चिंगारीसाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो. ”
त्यासह कंपनीने प्रभावित कर्मचाऱ्यांना काय काय ऑफर केले आहे त्याबाबत काही खुलासे केले आहेत. कंपनीच्या निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आले ,” आम्ही प्रभावित कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी दोन महिन्यांचा पगार देणार आहोत. तसेच प्रभावित झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत त्यांना आणखी तीन महिन्याचे आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे.”
तसेच कंपनी पुढे म्हणाली, ” नोकर कपातीच्या निर्णयामध्ये प्रभावित झालेल्या कर्मचाऱ्यांना करिअर समुपदेशन आणि जॉब प्लेसमेंट ऑफर करून पुढील नोकरीच्या शोधासाठी मदत करण्यात येणार आहे. प्रक्रिया सुव्यवस्थित करणे, उत्पादकता वाढवणे आणि आमच्या दीर्घकालीन संसाधनांशी जुळवून घेणे हे आमचे प्राधान्य असणार आहे. ”