Homeघडामोडीआई मी 18 वर्षाची झाल्यावर माझ्या मनातला नेता मिळेल का गं ?...

आई मी 18 वर्षाची झाल्यावर माझ्या मनातला नेता मिळेल का गं ? शाळकरी चिमुकली दीप्तीचा प्रश्न

आजरा(हसन तकीलदार):-आजऱ्यातील स्वामी विवेकानंद विद्या मंदिरमध्ये चौथीच्या वर्गात शिकणारी फक्त 9 वर्षाची निरागस चिमुकली मुलगी दीप्ती दिलीप सावंत हिने आपल्या मनातला नेता कसा असावा याबाबत लिहिले आहे. ते खरोखरच मनाला भिडणारे आणि आंतरमनाला जागे करणारे आहे. निवडणूकीची आजची परिस्थिती पाहिली तर जेवणावळी, पैसा, अमीषे, भ्रष्टाचार, ठेकेदारी, घराणेशाही, धनशक्ती इथपर्यंतच येऊन ठेपली आहे.जनतेच्या आपल्या अस्तित्वाची किंमत केवळ हजार दोन हजार करून घेतली आहे. एका जेवणाच्या ताटासाठी पाच वर्षाच्या विकासाला आपण मुकत चाललोय याची जाणीव राहिलेली नाही. प्रामाणिक, निःस्वार्थ आणि निष्कलंक माणसे या निवडणूकीपासून दुरावत चाललेली आहेत. भ्रष्ट, घराणेशाही आणि धनशक्ती पुढे सरसावत आहे. सर्वांसामान्यांची निवडणूक आता राहिलेलीच नाही त्यामुळे या मुलीने विचारलेला प्रश्न मनाला नक्कीच भिडणारा आहे. योगायोगाने याची माहिती आमच्या प्रतिनिधीला मिळाली त्यावेळी तिने याबाबत सांगितले.


नेता असावा तरी कसा? पांढरेशुभ्र कपडे घालणारा की गाडीतून फिरणारा? मला वाटते रस्त्यावरून फिरणारा, गोरगरिबांच्या खांद्यावर हात टाकून चालणारा. नेता हा असा असावा. जनतेने फोन केल्यानंतर “नंतर” फोन करा म्हणून सांगणारा की फोन उचलून पहिला शब्द….. कसे आहात? बोला काय काम आहे? असा काळजीने विचारणारा नेता असावा. नेता असावा कसा? सत्ता हाती आल्यानंतर ओळख न दाखवणारा की हे सर्व आपलं कुटुंबच आहे म्हणून या जनतेची काळजी करणारा की आपल्या सारखेच पद असणाऱ्या उच्चभ्रूना हॉटेलला घेऊन जाणारा की एखाद्या गरीब लेकराचा वाढदिवस आहे म्हणून केक घेऊन जाणारा?


नेता असावा कसा? दोन चार महिन्यात तरी गल्ली बोळातून गोरगरिबांच्या मधून फेरी मारून काय चाललंय? कोणाची काय अडचण आहे हे जाणून घेणारा असा असावा नेता. अहो!गोरगरिबांची नेत्याकडून अपेक्षा असते तरी काय? राहण्यासाठी छोटेसे घर, चालण्यासाठी चांगला रस्ता, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुलांसाठी गावात चांगली सरकारी शाळा आणि त्यांच्या छोट्या छोट्या अडचणीचे निवारण करणारा असा असावा नेता. नेता असावा तरी कसा? सरकारकडून आलेला निधी गोरगरीब जनतेसाठी खर्च करणारा की निधी आलाच नाही म्हणून सांगणारा? सामान्य माणसाला न्याय मिळवून देणारा की तो त्यांचा प्रश्न आहे म्हणून पाठ फिरवणारा? मला वाटते पाच वर्षांमध्ये त्यांनी मी एक नेता म्हणून नव्हे तर सर्वसामान्य नागरिक आहे जनतेचा प्रतिनिधी आहे म्हणून जनतेची कामे, काळजी, गावाचा विकास जे जे काही करता येईल ते त्यांनी करावे. पाच वर्षानंतर निवडणूकीच्यावेळी त्याला प्रचारच करायला लागू नये, त्याला काहीही अमीषे, प्रलोभने देऊ लागता कामा नये….. तो जनतेचा राजा असावा.


आई मी अठरा वर्षाची झाल्यानंतर माझ्या मनातला नेता मिळेल का गं? खरोखरच चिमुकलीचा हा प्रश्न मनाला भिडून जातो. सुज्ञ जनतेला विचार करायला भाग पाडतो. जनतेने आंतरमुख होऊन विचार करावा. आज आम्ही निवडणूकीची दिशा आणि दशा काय करून ठेवली आहे? ठेकेदारी पद्धतीला आम्ही निवडून देतोय काय? भावी पिढीसाठी आम्ही काय आदर्श देत आहोत? याचा विचार करून आपला प्रतिनिधी निवडावा एवढीच या चिमुकलीची अपेक्षा नक्कीच असणार.

✅ दैनंदिन अपडेट्स हवे आहेत?
मग आजच Link Marathi सोबत जोडून रहा!

📲 WhatsApp Channel (तुमचा नंबर पूर्णपणे सुरक्षित)
👉

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

▶️ YouTube – ताज्या बातम्या आणि व्हिडिओंसाठी
👉

https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

महत्वाच्या बातम्या, माहितीपूर्ण लेख, आणि दैनंदिन घडामोडी — एकाच ठिकाणी!

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular