उत्तूर ( प्रतिनिधी ) -:
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्तूर मतदारसंघ यंदा केवळ मतदानापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण आजरा तालुक्याच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहे. पारंपरिकदृष्ट्या निर्णायक मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात यावेळी नेत्यांची प्रतिष्ठा, पक्षांची ताकद आणि कार्यकर्त्यांची निष्ठा पणाला लागल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले आहे.
आजरा–भादवण परिसरात सर्वच प्रमुख पक्षांनी प्रचाराची धार वाढवत थेट घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न केला. उन्हा-ताणात, मर्यादित वेळेत आणि वाढत्या अपेक्षांच्या ओझ्याखाली कार्यकर्ते प्रचार करताना दिसले, ज्यामुळे उत्साहाइतकीच तणावाची छाया प्रचारात जाणवली.
राष्ट्रवादी गटाचा आक्रमक प्रचार
भादवण व उत्तूर परिसरात राष्ट्रवादी गटाच्या प्रचार यंत्रणेने सक्रिय सहभाग नोंदवला.
जिल्हा परिषदेसाठी : शिरीष देसाई
पंचायत समितीसाठी (भादवण) : जयश्री गाडे
पंचायत समितीसाठी (उत्तूर) : विकास चोथे
या उमेदवारांसाठी झालेल्या श्री. मुश्रीफ यांच्याशी सभांमधील स्पष्ट भाष्य व कार्यकर्त्यांना दिलेले संदेश प्रचार यंत्रणेची गती वाढवणारे ठरले आहेत. सोशल मीडियावर या प्रचाराचे पडसाद झपाट्याने उमटताना दिसले , ज्यामुळे मतदारांपर्यंत संदेश पोहोचवण्याचा वेगही वाढला आहे.

भाजप–ताराराणी पुरस्कृत आघाडीचा डिजिटल भर
दुसरीकडे, भाजप व ताराराणी पुरस्कृत आघाडीने डिजिटल प्रचारावर विशेष भर देत सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप गट आणि स्थानिक संपर्क यंत्रणेद्वारे वातावरण तापवले.
जिल्हा परिषद उमेदवार : उमेश आपटे
पंचायत समिती उमेदवार : साधना केसरकर (भादवण )
महेश करंबळी ( उत्तुर )
या आघाडीस आमदार शिवाजी पाटील व महाडिक कुटुंबाचा पाठिंबा प्राप्त झाला आहे, ज्यामुळे ही निवडणूक अस्तित्व अबाधित करण्याची संधी उमेदवारांना लाभली, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.

शिवसेनेचा स्वतंत्र प्रयोग
यंदा शिवसेनेने स्वतंत्र भूमिका स्वीकारली व पहिल्यांदाच उत्तूर मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी प्रचार केला.
जिल्हा परिषद : विठ्ठल उत्तूरकर
पंचायत समिती (भादवण) : भारती डेळेकर
या उमेदवारींमुळे पक्षाने स्थानिक कार्यकर्त्यांना संधी दिली, असा संदेश जनमानसात पसरत आहे. हा निर्णय धाडसी की धोकादायक, याबाबत मतदारांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर व अर्जुन आबिटकर यांनी या मोर्चाला वैयक्तिक लक्ष दिल्याचा दावा प्रचाराप्रसंगी सामन्यातून आला आहे.

मीडिया आणि सोशल मीडियाचा प्रभाव
एकूणच या निवडणुकीत मीडिया व सोशल मीडियाची भूमिका निर्णायक ठरली आहे. काही उमेदवारांना सकारात्मक प्रसिद्धीचा फायदा मिळाला असताना, काहींना विश्वासू साथीदारांचा चुकीचा अंदाज, संवादातील दुरावा किंवा अति–आत्मविश्वास महाग पडू शकतो, असा मतदारांमध्ये फेरफार चर्चा आहे.
सोमवारी निकाल जाहीर होताच फक्त विजय-पराभव नव्हे, तर कोणाची रणनीती यशस्वी ठरली, कोणाची चूक महाग पडली व भविष्यातील राजकीय दिशा काय हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उत्तूर मतदारसंघाचा निकाल संपूर्ण आजरा तालुक्याच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरल्याचे संकेत आहेत.

मुख्यसंपादक



