आजरा (हसन तकीलदार):-आजरा एस.टी. स्टॅंड म्हणजे खाजगी वाहनांचा तळ झाल्याचे चित्र सद्या दिसत आहे. आज स्टॅंडवर थांबलेले एक चार चाकी वाहन उताराला लागून आपोआप महामार्गावर आल्याने काही टू व्हीलर गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले. केवळ दैवबलवत्तर म्हणून कोणतीही जिवीत हानी अथवा मोठी दुर्घटना झाली नाही. या घटनेवरून प्रवाशांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्टॅंडच्या समोरच्या बाजूला संरक्षक भिंत बांधणे गरजेचे असल्याचे आता अधोरेखित झाले आहे.

एस. टी. महामंडळाने प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये म्हणून लाखो रुपये खर्च करून सर्व सोयीनियुक्त असे भव्य व उत्तम दर्जाचे काम करून आजरा बस्थानकाची इमारत उभी केली आहे. परंतु या बस स्टॅंडवर खाजगी वाहनांचे अतिक्रमण होताना दिसत आहे. प्रवाश्यांच्या सेवेसाठी व सुविधेसाठी असलेल्या रिक्षा लावण्यास बस स्थानक प्रशासन मज्जाव करताना दिसत आहे. वृद्ध, अपंग, रुग्ण महिला प्रवासी यांना सोयीचे व्हावे तसेच प्रवाशांना तातडीने लगेच रिक्षा उपलब्ध व्हावी या हेतूने पूर्वीपासून स्टॅंडलगच रिक्षा स्टॉप अस्तित्वात होते. परंतु गत वर्षापासून अचानकपणे एस. टी. प्रशासनाने या रिक्षा थांब्याला बाहेर काढल्यामुळे महामार्गाच्या कडेला रिक्षा थांबा करावा लागला आहे. त्यामुळे प्रवाश्यांची गैरसोय होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर अडचण होत आहे. रिक्षा थांब्यामुळे काय अडचण होते आणि यामागचे कारण काय आहे हे ही एक गूढ बनले आहे.रिक्षा थांबा होता त्या ठिकाणी खाजगी चार चाकी वाहने पार्किंग केली जात आहेत. अशीच एक थांबवलेली चार चाकी वाहन हँडब्रेक न लावल्याने उताराच्या दिशेने आपोआप महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला गेली व उभ्या असलेल्या टू व्हीलर गाडयांना थडकल्याने किरकोळ नुकसान झाले. हे प्रकरण आपापसात मिटवले असले तरी खाजगी वाहने स्टॅंडवर थांबवल्याने एस. टी. चालक व वाहक यांच्याबरोबर वादाचे प्रकारही होताना दिसून येत आहेत.

आगार प्रमुखांनी यावर योग्य उपाययोजना आखून स्टँडला संरक्षक भिंत बांधून रिक्षा थांब्यासाठी योग्य नियोजन करावे अशी मागणी होताना दिसत आहे.
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक


