Homeसंपादकीयकाय म्हणता खोक्यांनो, झालं का मनासारखं! आम्हीच खरी शिवसेना म्हणून छाताड बडवणाऱ्यांनो..

काय म्हणता खोक्यांनो, झालं का मनासारखं! आम्हीच खरी शिवसेना म्हणून छाताड बडवणाऱ्यांनो..

काय म्हणता खोक्यांनो, झालं का मनासारखं! आम्हीच खरी शिवसेना म्हणून छाताड बडवणाऱ्यांनो.. झालं का काळीज शांत! ‘शिवसेना जगली पाहिजे’, हे आज प्रत्येक राजकीय-अराजकीय व्यक्तीच्या तोंडी होते. कारण हा पक्ष, याचे नेतृत्व, याचे कार्यकर्ते आणि विचारही अगदी याच मातीतले. उसने न घेतलेले.. कोणत्याही संघटनेकडून न चोरलेले.

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ओळख तुम्हाला कधीच कळली नाही खोक्यांनो.. म्हणून तुम्ही आज केवळ याला पक्ष म्हणून गिळायला निघालात. तुमचा तोटा झालाच कुठे आहे म्हणा! तुम्ही सत्तेत आहात, सर्व शक्तिमान आहात. याच वेळी तुम्ही भ्रमात देखील आहात. देशातील विविध पक्षात दुही पेरण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवणाऱ्या दिल्लीश्वर ‘महाशक्तीने’ तुमचा आणि पर्यायाने मराठी माणसाचा कांड केला आहे.

औरंगजेब दिल्लीतून थेट दक्खनेत उतरला आणि त्याने मराठ्यांवर मुकाबला लादला होता. विश्वातील सर्वात दीर्घ अश्या लढायांपैकी एक असलेल्या युद्धाचा अंक सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर लढला गेला. राजा, तख्त सिंहासन नसताना मराठा २७ वर्षे झुंजला आणि त्याने औरंगजेबाला निर्णायक विजय मिळू दिला नाही. आजही दिल्लीश्वरांनी ध्यानी ठेवावे, त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात दीर्घ लढा हा याच मराठी मातीतील शिवसैनिकांशी आहे.

चिन्ह नसेलही, पण ठाकरे या एका नावावर आणि केलेल्या सत्कर्मावर हा कठीण प्रसंग आम्ही पार करूच. सत्तेच्या धुंदीत असलेले खोके कधी बाजूला फेकले जातील हे त्यांना देखील कळणार नाही! फक्त खंत एकाच गोष्टीची आहे. जे शिवसेना नावाचे महाराष्ट्राच्या मातीसाठीचे रोपटे प्रबोधनकारांनी लावले, स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ते वाढवले.. तेच रोपटे आज आपल्याच माणसांनी ओरबाडून घेतले. ओरबाडणाऱ्याच्या हातात मात्र काड्या राहिल्या आणि फळे मात्र भलतेच घेऊन गेले. म्हणूनच म्हटले, न तुला न मला.. घाल भाजपला!


शिवसैनिक. अविनाश चौगुले ( पन्हाळा )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular