Homeकला-क्रीडाक्रिकेटचे असेही भक्त

क्रिकेटचे असेही भक्त

क्रिकेटचे असे भक्त अनेक आहेत. दहा, बारा वर्षांपूर्वी मी एक समारंभ आयोजित केला होता, तो समारंभ होता सुनील गावस्कर आणि विश्वनाथ यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्ताने. त्यांचा सत्कार अमिताभ बच्चन ह्यांनी केला होता .. त्यावेळी अमिताभ बच्चन आल्यानंतर काही क्रिकेटपटू आणि अमिताभ बच्चन ह्यांना मी एका हॉलमध्ये नेऊन बसवलं होतं. तिथे चंदू बोर्डे आणि चंदू पाटणकर हे दोन क्रिकेटपटू सुद्धा होते. बोर्डे आणि पाटणकरांनी पाहिलं की समोर अमिताभ बच्चन आहे. त्यांची इच्छा झाली की अमिताभ बच्चनला जाऊन भेटावं. म्हणून हे दोघंजण गेले आणि चंदू बोर्डेनी अमिताभ बच्चनला हात पुढे करून सांगितलं, ‘नमस्ते ..!! मी चंदू बोर्डे ..!!’

अमिताभ बच्चन दिलखुलास हसले, आणि चंदू बोर्डेना म्हणाले की, ‘तुम्ही तुमचं नाव कशाला सांगता ..?? मी तुम्हाला तुमचीच एक आठवण सांगतो. तुम्हाला आठवतं का की, तुम्ही १९५८ साली दिल्लीला वेस्टीइंडिज विरुद्ध शतक ठोकलं होतं ..??’

बोर्डे म्हणाले की, ‘हो. मला चांगलंच आठवतंय ..!!’

अमिताभ पुढे म्हणाला .. ‘तुम्हाला हे ही आठवतंय का, की त्यावेळेला काही मंडळींनी तुम्हाला खांद्यावरून उचलून पॅव्हेलियनमध्ये नेलं होतं ..??’

बोर्डे म्हणाले .. ‘हो. आठवतं ..!!’

आणि मग अमिताभ बच्चनने त्यांना सांगितलं की, ‘त्यातला एक खांदा माझा होता ..!!’

अमिताभने हे म्हटल्यावर चंदू पाटणकर, मी, बोर्डे खरं तर आम्ही तिथे जे होतो, ते सर्वच शहारलो ..!!

नंतर आणखीन एक गोष्ट आम्हाला कळली की, चंदू बोर्डेना उचलणारा तिथे आणखी एक तरुण होता, जो गोरा गोमटा होता. जो अमिताभ बच्चनचा मित्र होता. त्याचं नाव होतं राजीव गांधी ..!!

गंमत पहा या दोन मित्रांपैकी एक ‘वन मॅन फिल्म इंडस्ट्री’ झाला, आणि दुसरा देशाचा पंतप्रधान ..!!

चंदू बोर्डे ह्यांनी १९६४ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध दसऱ्याला भारताला एका छोट्या पण अफलातून खेळीने जिंकून दिलं. अत्यंत मोक्याच्या वेळेला त्यांनी अप्रतिम अशी आक्रमक फलंदाजी केली. त्यावेळेला स्टेडियममधली अनेक मंडळी स्तिमित झाली. त्यांना हर्षवायू झाला. आणि त्या आनंदाच्या भरात चंदू बोर्डेना खांद्यावरून पॅव्हेलियनमध्ये कोणी नेलं असेल ..??

त्या माणसाचं नाव होतं राज कपूर ..!!

– द्वारकानाथ संझगिरी ( सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular