तुकाराम आहेस का रे घरात ?
मी आलोय. एकदा बाहेर येऊन बघ तरी, मला दर्शन देणार नाहीस का ?
आज पर्यंत तुझ्या हाताने पाय धुतल्याशिवाय माझा दिवस उजाडला नाही आणि आज तू निपचित पडलायस होय. तुझे उपकार घेऊन मी तरी कसा राहू या पापी जगात. तूच सांग.
येतोस ना रे !
ये लवकर मी थांबलोय बाहेर.
तू आल्याशिवाय आणि माझे पाय तुझ्या हाताने धुतल्याशिवाय मी इथून जागचा हलणार नाहीय बघ !!
ये लवकर. मी इथेच उभा आहे !!
……………………………………………………….
सकाळचे तीन वाजले होते.
पहाटे पहाटे उठून तुकाराम कसलीतरी तयारी करत होता. त्याला लागणारे कपडे एका पिशवीत कोंबून भरून ती पिशवी त्याने ओटीवर आणून ठेवली. लागलीच पुन्हा देवाच्या खोलीत जाऊन हात जोडून उभा राहिला. काहीतरी तोंडाने पुटपुटत होता. खोलीतून बाहेर आला तेव्हा त्याची बायको समोर उभी होती.
सकाळचा प्रहर आणि अचानक समोर रुख्मिणी सारखी कंबरेवर हात ठेऊन उभ्या असलेल्या कावेरीला बघून तुकाराम दचकलाच. कावेरीच्या तोंडावर ना हसू होते ना रागाचा लवलेश होता. स्मित हास्य करून त्याच्याकडे पाहत उभी होती आणि तुकाराम तिच्या त्या निरागस आणि प्रेमळ चेहऱ्याकडे बघत तसाच काही वेळ उभा होता.
अहो मी काय म्हणते.
कावेरीचा आवाज ऐकून तुकाराम भानावर आला आणि तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेऊन तिला ओटीवर घेऊन आला.
अगं बस इथे.
मी बसते, पण मला एक सांगा यावेळी जायची गरज आहे का ? एक वर्ष नाही गेलात तर नाही चालणार का ?
त्यात सध्या तुमची तब्बेतही बरी नाहीय मग कशाला ही दगदग करताय. ज्याच्यासाठी करताय त्याला काही पाझर फुटत तर नाही, मग का तुम्ही तरी त्याच्या पायावर डोकं आपटायला जाताय.
कावेरी काय सांगू तुला आणि कसं सांगू. अगं तोच माझा सखा आणि तोच माझा सोबती, तीच माझी पंढरी. ज्याच्या पायावर डोकं ठेवल्याशिवाय मला चैन पडत नाही त्याला भेटायला कसं नको जाऊ सांग मला.
आज माझी तब्बेत ठीक नसली तरी मी तिथे पोहचेपर्यंत अगदी ठणठणीत बरा होईन बघ तू.
तुकाराम आणि कावेरी एका छोट्याशा गावातील रहिवासी पण त्यांची भक्ती पाहून गावातले सगळे त्या दोघांचाही आदर करायचे. त्यांना आदराने वागवायचे.
तुकारामाचं झालेलं भरपूर शिक्षण आणि त्याला कोणत्याही गोष्टीचे प्रगाढ ज्ञान असल्याने त्याच्याकडे गावातील लोक त्याचा सल्ला घेण्यासही यायचे. आपल्याकडे जे ज्ञान स्वरूपात आहे ते इतरांना दिल्याने आपल्याच ज्ञानात जास्तीची भर पडते हा त्याचा स्वभाव असल्यामुळे तोही मनापासून सर्वांना योग्य तो सल्ला द्यायचा.
तुकारामकडे वडिलोपार्जित भरपूर शेती होती. वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याने मेहनत करून ती शेती बऱ्यापैकी राखली होती. का नाही ! तसे कष्ट तो आणि कावेरी दरवर्षी घेत होते. मेहनतीचे फळ हे चांगलेच मिळते. शेतीतून वर्षाकाठी त्याला बऱ्यापैकी पैसाही मिळत होता. गावात कोणाला कधी काही गरज लागली तर स्वतःहून पुढे होऊन मदत करण्यास तुकाराम आणि कावेरी तत्पर असत.
कावेरीसह त्याचा संसार अगदी सुखात चालला होता. दोघेही आनंदात, हसत, खेळत दिवस काढत होते.
एकच व्यसन त्याला लागले होते. ते म्हणजे भक्ती. भक्तीत अखंड बुडालेला गावात कोण असेल तर तो तुकाराम.
आज मात्र तुकाराम अंगात बळ नसतानाही आपल्या देवाच्या भेटीला जायला निघाला आहे.
दरवाजाच्या बाहेर पडून कावेरीचा निरोप घेताना तिच्या डोळ्यातली अश्रूंची चमक पाहून त्याला थोडं गहिवरून आलं पण त्याने स्वतःला सावरले आणि तो निघाला नामस्मरण करत, पायी चालत.
डोक्यावर पांढरी टोपी, पांढरा सदरा, पांढरा लेहेंगा, हातात एक लाकडाची गुळगुळीत चमकणारी काठी, खांद्याला लावलेली एक कापडाची कपडे असलेली पिशवी आणि मुखी होते फक्त त्याचे नाव. फक्त त्याचे नाव. त्याच्या देवाचे नाव.
तुकाराम घरातून बाहेर पडला तेव्हा सकाळचे साडेतीन वाजले होते. काळोख अजूनही होता. गावातल्या रस्त्यांवर दिवे नसल्याने काळोख जाणवत होता. मुख्य रस्त्यावर जाईपर्यंत त्याला अर्धा तास लागला. जसा मुख्य रस्त्यावर आला तसे त्याचे डोळे स्थिरावले गेले. समोर त्याच्या देवाची त्याला पालखी दिसली. तो धावला. धावताना त्या अंधुकशा काळोखात धडपडला पण तडक धावत जाऊन त्याने पालखीला हात घातला आणि आपल्या देवाला खांद्यावर घेतले. त्याच्या नकळत त्याच्या गालावरून पाणावलेल्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. हळूच एका हाताने ते अश्रू पुसले गेले आणि पालखी सावरत तो त्याच्या देवाच्या नावाचा जप करत सर्वांसोबत चालत होता.
रोज रात्री पालखी मुक्काम स्थळी थांबायची आणि सकाळी लवकर पालखीसह पुन्हा सगळे चालत चालत पुढे जात होते.
काय तो सोहळा,
काय त्याचा थाट,
काय ती वारी,
काय त्या लांबच लांब रांगा,
काय ती पोरवयातली भक्ती,
काय गरीब, काय श्रीमंत,
काय देव, काय भगवंत,
काय त्या तुळसी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या माऊली,
काय ती शिस्तीतली शिस्त शिकवणारी शिस्त,
काय तो खण खण वाजणारा टाळ,
काय तो मृदंगाचा नाद,
काय ती मध्येच धापकन पडणारी आवाजाची थाप,
काय तो सगळा कानाला तृप्त करणारा आवाज,
काय ती त्याच्या तालावर नाचणारी माणसं,
काय रिंगण,
काय त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव,
काय ती भक्तीत तल्लीन होऊन डुलणारी डोकी,
काय ते मंदिर,
काय त्या मंदिरावर झुलनाऱ्या फुलांच्या माळा,
काय ती रोषणाई,
काय त्यांचा देव,
काय ती गर्दी,
काय तो गुलालाने लाल झालेला रस्ता,
फक्त तुझ्या नामाचा गजर
काय तो सोहळा,
काय त्याचा थाट…
काही दिवसांनी मजल दरमजल करत तुकाराम अगदी आनंदात देवाच्या मंदिरात पोहचला. तिथला सर्व थाट पाहून तो सुखावला. देवाच्या पायाजवळ त्याने लोळणच घातली. त्याचा देव त्याला आज भेटला होता. किती आनंद झाला होता म्हणून सांगू.
इकडे कावेरी त्याच्या काळजीने कासावीस झाली होती. बरेच दिवस झाल्याने तिला खूपच काळजी वाटत होती. खाण्या पिण्याची आबाळ होणार नाही याची तिला शास्वती होती. कारण तुकाराम बरोबर खुप लोकं जाणारी होती. जिथे मुक्काम असेल तिथे तिथल्या लोकांकडून प्रसाद म्हणून जेवण दिले जाते. त्यामुळे ही एक काळजी तिला अजिबात नव्हती.
परंतु तब्बेत ठीक नसताना घरातून बाहेर गेलेल्या माणसाची काळजी वाटणे साहजिकच आहे. शेवटी बायको आहे ती. तिला अन्न जात नव्हते. कधी एकदा तुकाराम परत सुखरूप घरी येतो असे तिला झाले होते.
तुकाराम देवाच्या दर्शनाला गेला. मंदिर सजवलेलं होतं. चारी बाजूंनी मंदिरावर फुलांच्या माळा सोडल्या होत्या. काही लाईट्स लावल्या होत्या. देवाच्या समोर उभा राहिला. हात जोडले. मूर्तीला भरभरून पाहून घेतले. डोळ्यांत साठवून घेतले. आजपर्यंत इथवर सुखरूप आणलंस तसंच दरवर्षी माझे पाय तुझ्या दर्शनासाठी इथवर येऊदेत. इतकीच तुझ्या चरणी मनापासून प्रार्थना. यापेक्षा मला कसलीही अपेक्षा नाही असे बोलून जणू त्याने देवाजवळ साकडेच घातले होते.
रात्रीच्यावेळी रोषणाई होऊन अख्खं जगच इथे दर्शनाला आलं आहे असाच भास होत होता. कशाला कसलाही गालबोट न लागता हा सोहळा दरवर्षी सुखात, आनंदात पार पडत असे.
तुकाराम देवाच्या भक्तीत तल्लीन होऊन आनंदाने नाचत होता. रिंगण म्हणजे त्याचा जीव की प्राण. टाळ, चीपळ्यांच्या तालावर बेफाम होऊन थिरकायला त्याला आवडत असे.
दिवसांमागून दिवस गेले तुकारामला त्याचे काही देणे घेणे नव्हते. बस्स आपला देव आपल्याला भेटला यातच त्याला सर्व सुख मिळाले होते. याचाच हर्ष त्याला होता. अचानक त्याला कावेरीची आठवण झाली. तसा तो थोडा भांबावला. आपण इकडे आल्यापासून एकदाही तिची आठवण काढली नाही. आणि कशी येणार ?
कधी एकदा देवाला भेटतोय, त्याच्या पायावर मस्तक ठेवतोय असे त्याला झाले होते. पण आता घरची ओढ त्याला जाणवू लागली. उद्या निघायला हवं असे मनात ठरवून तो झोपायला गेला.
नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून घरी जायची तयारी करायला लागला. अंगात कणकण होतीच. गाडी करून घरी याला निघाला. गावापर्यंत आला.
का आणि कशी काय माहित. अचानक त्याला भोवळ आली आणि तो खाली पडला. गावातल्या लोकांनी त्याला पाहिले आणि तसाच उचलून त्याला घरी आणले.
कुणीतरी पुढे येऊन त्याच्या तोंडावर पाणी मारले. त्याला बघून कावेरी रडायलाच लागली. काय झालं ? काय झालं ? सगळ्यांना विचारत होती. कुणीतरी पुढे येऊन तिला घडला प्रकार सांगितला.
बघा मी तुम्हाला सांगत होती ना, नको जाऊ तर माझं ऐकलं नाही आणि आता हे काय होऊन बसलं बघा.
रडत रडतच कावेरी बोलत होती.
कोणीतरी डॉक्टरांना घेऊन आले. डॉक्टरांनी तुकारामला तपासले. एक इंजेक्शन दिले. काही औषधं दिली.
काही काळजी करू नका त्याला अशक्तपणामुळे थकवा आल्याने चक्कर आली आहे. थोड्या वेळाने शुध्दीवर येईल. त्याला आराम करुद्या.
कावेरीला समजून सांगून डॉक्टर निघून गेले.
गावातील लोकंही हळू हळू जाऊ लागले. कावेरीने सर्वांचे आभार मानले. काही लोकं अजूनही तिथेच थांबली होती. ज्या स्त्रिया आल्या होत्या त्या कावेरीला धीर देत होत्या.
काही वेळ गेला आणि तुकारामची हालचाल चालू झाली. पण त्याला अंगात ताकद नसल्याने उठता येत नव्हते. त्याला जाग आल्यावर कावेरी पुन्हा रडायला लागली. तुकाराम डोळ्यांनीच कावेरिशी बोलत होता. नको रडूस मी ठीक आहे असं सांगत होता.
इतक्यात बाहेरून कुणाचा तरी मोठ्याने आवाज आला.
तुकाराम आहेस का रे घरात. मी आलोय
कुणालाच ऐकू आले नाही, फक्त तुकारामने तो आवाज ऐकला होता. हळू आवाजात त्याने कावेरीला बाहेर कोण आहे का बघ म्हणून सांगितले. पण बाहेर कोणच दिसत नव्हतं.
पुन्हा आवाज आला.
एकदा बाहेर येऊन बघ तरी, मला दर्शन देणार नाहीस का ?
तुकारामला आता राहवत नव्हते. मलाच आवाज येतोय. बाकीच्यांना का नाही येत. अंगातली सगळी ताकद एकवटून तो उठला आणि कावेरीच्या मदतीने बाहेर आला.
समोर बघतो तर काय !!
साक्षात विटेवर उभा त्याचा देव विठ्ठल उभा होता. काळया पाषानी मूर्तीतला त्याचा देवच त्याला दर्शन द्यायला त्याच्या दारात उभा होता. विठ्ठलाला बघून त्याची ग्लानी, अशक्तपणा कुठच्या कुठे पळाला हे त्यालाही कळले नाही. तुकाराम आपसूकच ढोपरावर खाली बसला. कावेरीला पाणी आणायला सांगून त्याने देवाचे आधी पाय धुतले. हात जोडले आणि विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल म्हणू लागला.
आता भेट होत होती ती एका भक्तीत तल्लीन झालेल्या भक्ताची आणि आपल्या भक्तासाठी दरवाजात आलेल्या देवाची.
तुकाराम कितीतरी वेळ विठ्ठलाशी बोलत होता. हात जोडून उभ्या असलेल्या तुकारामाकडे कावेरी आणि गावातील लोकं फक्त पाहत उभे होते.
तुकाराम आज खरोखर तुकाराम झाला होता. कावेरीला जवळ बसवून सगळी हकीकत त्याने सांगितली.
आजचा दिवस विठ्ठलाच्या दर्शनाने सुखावून गेला होता.
भक्तीत शक्ती असते ती आज तुकारामाने दाखवून दिली होती.
तुकाराम पुन्हा नामाचा गजर करू लागला.
विठ्ठल
विठ्ठल
विठ्ठल
विठ्ठल
विठ्ठल…
✍️विजय वैशाली दत्ताराम पराडकर-आण्णा
( विरार )
समन्वयक – पालघर जिल्हा