सरले ते बालपण, उरल्या फक्त आठवणी
मोठे झालो आम्ही, करत वयाची मोजणी
लहान होतो तेव्हा मस्त खिदळायचो,
पडायचो, चिखलाने माखायचो, मातीही खायचो
पण आनंदाने जगायचो …
जाणते झालो, पैसा कमावला, अक्कल आली,
शिकलो, आदर, निष्ठा, विसरलो, इथेच माती खाल्ली
खेळताना खरचंटायचं, अंगठा फुटायचा, रक्त यायचं,
आई- बाबा मारतील, म्हणून त्याला फडक्याने बांधायचं
पण आनंदाने जगायचो …
आता मात्र, जरासं कुठे लागलं तर,
मम्मी-पप्पा फरफटत डॉक्टरकडे नेतात
सकाळी नवीन काहीतरी चमचमीत खायला घालून
पाठीवर दफ्तराचा बोजा देऊन, शाळेला धाडतात
उद्याच्या लादलेल्या भविष्यासाठी …
एकाच घरात, पुस्तकांत तोंडं खुपसून अभ्यास करत होतो,
गुरुजी येतायत रे, जिथे असू तिथून पळत घरी सुटायचो
नाही तो धाक आता शिक्षकांचा, गुरुजनांचा
भेटेल तिथे ठरलेला असतो, कार्यक्रम मास्तरांचा
बाजार भरलाय इथे शिक्षणाचा …
आई-बाबांच्या मायेचा हात पाठीवर असायचा
लहान बहिणीलाही मोठा भाऊ समजून घ्यायचा
घास भरविला त्याच हातांना किंमत मिळत नाही
वृध्दश्रमाच्या उंबऱ्यावर पुन्हा पाऊल फिरत नाही
उपकार दुधाचे कसे विसरून जाई …
घरात दाणाही नसता, सण थाटात साजरा व्हायचा
पोरांच्या अंगी नवीन कापडं, बाप फाटक्या सदऱ्यात दिसायचा
दिवस पुन्हा आठवले की पापण्या ओल्या होतात !
व्याकुळतेने आई-बाबांनी डोळे मिटलेले असतात
डोळे मिटलेले असतात कायमचे ….
- विजय वैशाली दत्ताराम पराडकर – आण्णा
- https://youtu.be/XZ1PkBA8znA
मुख्यसंपादक