Homeबिझनेसभांडवल उभे करताना तारण नसल्यास काय करावे लागेल ?

भांडवल उभे करताना तारण नसल्यास काय करावे लागेल ?

याआधीच्या लेखात भांडवल मिळवण्याचे काही मार्ग सांगितले होते. त्यावर काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या, त्या अशा. विनातारण कोणी कर्ज देईल का? दिले तर तो का देईल? तारण नसल्यास कर्ज बुडण्याची शक्यता जास्त असू शकते; अर्थात हेच प्रश्न गुंतवणूकदारालाही पडतात. तेव्हा तारण न देता या प्रश्नावरचा तोडगा काढला, तर आपल्याला विनातारण कर्ज मिळू शकते.

पहिला प्रश्न आहे, विनातारण कोणी कर्ज देईल का? तर या प्रश्नाचे उत्तर होकारार्थीच आहे. कारण आजपर्यंत लाखो लोकांना विनातारण कर्ज मिळालेले आहे. आजही मिळत आहे व ते पुढेही मिळत राहील. कारण त्याचमुळे तर जगातले मोठेमोठे अविष्कार घडले आहेत. जगातील महान संकल्पनापैकी जास्तीत जास्त संकल्पना ह्या ज्याच्याकडे कसलेही तारण नव्हते त्या व्यक्तींच्या डोक्यातून जन्माला आल्या आहेत. त्या संकल्पना साकार झालेल्या आपण पाहतो, याचा अर्थ असाच होतो की चांगल्या कल्पना वास्तवात आणण्यासाठी विनातारण भांडवल मिळू शकते. विमानाचा शोध लावणाऱ्या राईट बंधूकडेही पैसे व तारण नव्हते. महान संशोधक थॉमस अल्वा एडिसनकडेही तारण देण्यासाठी पैसे नव्हते. तरीही त्यांनी विजेचा दिवा शोधण्यासाठी दहा हजार वेगवेगळे प्रयोग केले व जनरल इलेक्ट्रिक सारखी जगप्रसिध्द कंपनी उभी केली. ॲपल व फेसबुकसारख्या कंपन्याही गॅरेजमधून सुरु झाल्या आहेत. भारतातही फ्लिपकार्ट व ओयो रूम्स सारख्या कंपन्यांकडे सुरवातीला भांडवल व तारण नव्हतेच. आज केवळ तुमच्याकडे तारणासाठी काही नाही म्हणून कर्ज मिळणार नाही, हा समज डोक्यातून कोसो दूर पळवून लावा व परत कधी असा समज आसपास फिरकू देऊ नका.

कोणी विनातारण कर्ज दिले तर तो का देईल? हा दुसरा प्रश्न ह्या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा आहे. भांडवल उभारणीचे अनेक मार्ग आहेत. त्यात कर्ज हा एकमेव मार्ग नाही. तुमचा बिझनेस प्लॅन उत्तम आहे, त्याच्यावर तुमचा दृढविश्वास आहे; अशावेळी तुम्ही तुमचा बिझनेस प्लॅन अतिशय प्रभावी पध्दतीने गुंतवणूकदाराला समजावून सांगू शकलात, तर तुम्हाला भागीदारी तत्त्वावर भांडवल उभा करता येते. (बिझनेस प्लॅन बनवला व प्रभावी पध्दतीने सांगता येत नसेल तर आपल्याला समजून घेणाऱ्या माणसाला तो सांगा व त्याला गुंतवणूकदाराला बिझनेस प्लॅन सांगण्यासाठी विनंती करा किंवा ज्याचे संभाषण कौशल्य उत्तम आहे अशा महाविद्यालयीन तरुणाची तुमचा सहाय्यक नेमणूक करा. कमी मोबदल्यात हे काम होते.) या भागीदारीमध्ये गुंतवणूकदाराला तुमच्या संकल्पनेबाबत ज्ञान असेलच असे नाही किंवा असले तरी त्याला त्यात काम करावे अशी आपण सक्तीही करु शकत नाही. त्यामुळे गुंतवणूकदार केवळ भांडवल उभे करुन देतो. संपूर्ण उद्योग आपल्याला स्वतःहून उभा करावा लागतो, अशा वेळी त्या भागीदाराला sleeping partner म्हणतात. काही वेळा असे असू शकते की, गुंतवणूकदारालाही तुमच्या व्यवसायात प्रत्यक्ष सहभाग घ्यायचा असतो. यामध्ये संकल्पना असणारा एक मित्र व पैसेवाल्या कुटुंबातील एक मित्र अशी भागीदारी होऊ शकते. अशा भागीदाराला Active Partner म्हणतात.

आपण सगळे लघुउद्योजक आहोत. अशा सर्व लघुउद्योजकांसाठी भारत सरकारने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा उद्योग केंद्रांची निर्मिती केली आहे. तेथे प्रशिक्षणापासून भांडवलापर्यंत सर्व गोष्टी पुरवल्या जातात. मात्र कित्येक तरुणांना हे माहिती नसल्याने ते तेथे पोहोचत नाहीत व बराचसा निधी दरवर्षी परत जात असतो. तेव्हा प्रत्येक लघुउद्योजकांनी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा उद्योग केंद्राला भेट देऊन तेथे आपला उद्योग नोंद करुन घ्यावा. अर्थात तुम्ही गेला की तुमचे तिथे लगेच जंगी स्वागत वगैरे काही होणार नाही. कारण त्या व्यवस्थेला एक प्रकारची मरगळ आलेली आहे. ४-५ प्रयत्नात तुम्हाला नक्की यश मिळेल. त्याशिवाय उद्यम नोंदणी (आधीचे उद्योग आधार), MSME databank मध्ये आपली नोंदणी करुन घेणे फायदेशीर ठरते.

तारण नसल्यास कर्ज बुडण्याची शक्यता जास्त असते. यावरचा उपाय म्हणून एक उदाहरण देतो. एका उद्योजकाला बँकेने त्याची कंपनी तारण ठेऊन १० करोड रुपयांचे कर्ज दिले. त्याचा उद्योग पहिल्या एक-दोन प्रयत्नात असफल झाला व त्याचे कर्जफेडीचे हप्ते थकले. बँकेने त्याची कंपनी लिलावात काढली. तेव्हा या उद्योजकाने स्वतःच शांतपणे लिलावात सहभाग घेतला व बँकेच्या अधिकाऱ्यांना समजावून सांगितले की, “माझी संकल्पना होती तरीही मला यात अपयश आले. आता ही कंपनी लिलावात विकल्यास नवीन मालकाला या क्षेत्रातील ज्ञान किंवा मी उभा केलेल्या संकल्पनेची तेवढी समज असेल असेही नाही. तेव्हा ही कंपनी बँकेने स्वतःकडे ठेवावी. (म्हणजेच बँकेच्या वतीने तो स्वतः बोली लावणार व बँक ती कंपनी विकत घेणार.) व बँकेने मलाच या कंपनीत कामाला ठेवावे. मला दिलेल्या पगारातून कर्जाचे हप्ते वसूल करत राहावे. जेव्हा मी लिलावातील रक्कम परत करेन तेव्हा ही कंपनी परत मला द्यावी. तोपर्यंत कंपनीची मालकी ही बँकेची राहील.” हा तोडगा बँक अधिकाऱ्यांना आवडला. त्या उद्योजकाला तिसऱ्या प्रयत्नात यश आले. त्याने प्रचंड नफा कमावला. बँकेचे कर्जही वसूल झाले.

आजचा लेख थोडा मोठा झाला आहे. तेव्हा आपण उद्योग आधार व एमएसएमही नोंदणीविषयी तसेच विनातारण भांडवल उभारणीचे अजून काही मार्ग (मुद्रा कर्ज, एमएसएमई कर्ज व इतर काही पर्याय) आहेत; त्याबद्दलचा विचार आपण परत केव्हातरी करु.

  • संकलन – टीम लिंक मराठी
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular