Homeकृषीमुरघास – वर्षभर हिरवा चारा म्हणून एक उत्तम पर्याय

मुरघास – वर्षभर हिरवा चारा म्हणून एक उत्तम पर्याय

मुरघास – वर्षभर हिरवा चारा म्हणून एक उत्तम पर्याय . मुरघास म्हणजे हवा विरहित जागेत किण्वनीकरण (आंबवून) करून साठवलेला चारा होय.

या पद्धतीत हवा विरहित अवस्थेमध्ये जगणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंमुळे हिरव्या वैरणीत असलेल्या साखरेपासून लॅक्टिक आम्ल तयार होतो. हे आम्ल चारा चांगल्या अवस्थेत ठेवण्याचे काम करते.
हिरवा चारा कापून जेव्हा खड्ड्यात भरला जातो. तेव्हा वनस्पतीच्या पेशी जिवंत असतात व त्यांचा श्वासोच्छ्वास चालू असतो. त्यामुळे पाणी व कार्बनडायऑक्साइड तयार होतो. तसेच चारा दाबून भरल्यामुळे खूप उष्णताही निर्माण होते. व खड्ड्यातील हवाही निघून जाते. त्यामुळे हवेत जगणारे जीवाणू तेथे टिकू शकत नसल्याने चारा खराब न होता तो टिकून राहतो.

*_मुघासाचे फायदे_*

१. सर्वसाधारणपणे ऑगस्ट ते जानेवारी महिन्यापर्यंत हिरवा चारा उपलब्ध असतो. परंतु त्यानंतर हिरव्या चाऱ्याची कमतरता जाणवते. त्यामुळे मूरघास हा जनावरांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध करून देणारा पर्याय आहे.
२. मुरघासाला वाळलेल्या चाऱ्यापेक्षा कमी जागा लागते म्हणजे एका घनमीटर जागेत ६६ किलो वाळलेला चारा ठेवता येतो. तर मुरघासाच्या स्वरूपात ५०० कि. हिरवा चारा ठेवता येतो.
३. दररोज हिरवा चारा जनावरांना कापून घालण्यापेक्षा त्याचा मुरघास बनविल्यास चारा पिकाखाली असलेली जमीन लवकर रिकामी होऊन दुसरे पिक त्वरित घेता येते. म्हणजेच आपणाला जास्त पिके घेता येतात. व रोज चारा कापून खाऊ घालण्यामागील वेळ व कष्ट वाचतात.
४. मुरघास बंधिस्त जागेत असल्याने त्यास आगीचा धोका नाही. तसेच तो जास्त दिवस टिकून ठेवता येतो व हिरवा चारा नसेल अशा टंचाईच्या काळात मुरघास वापरता येतो.
५. मुरघासात तयार होणारे लॅक्टिक आम्ल हे गायी – म्हशींचे पचनेंद्रियात तयार होणाऱ्या रसासारखे असते म्हणून मुरघास पचण्यास सोपा असतो.
६. वाळलेल्या चाऱ्याच्या पौष्टेकतेच्या तुलनेत मुरघासाची पौष्टिकता उत्तम असते.
मुरघासाकरिता चारा पिकाची कापणी फुलोरा अवस्थेत केली जात असल्यामुळे जास्तीत जास्त अन्नदव्ये चाऱ्यामध्ये येतात.
७. मुरघास तयार केल्यास मजुरांवर होणारा खर्च कमी होतो. मजुरांचे व्यवस्थापन व्यवस्थित करणे शक्य होते.

*_मुरघासकरिता उपयुक्त चारापिके_*

तसे तर सर्व हिरव्या चाऱ्याचा मुरघास तयार करता येतो. परंतु उत्तम प्रकारचा मुरघास बनविण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी, संकरित नेपिअर, (हत्तीघास), मार्वेल (पन्हाळी गवत), उसाचे वाडे, ओट, इ. एकदल वर्गीय चारा पिकांचा उपयोग करता येतो. कारण या पिकांमध्ये अंबविण्याच्या क्रियेसाठी लागणाऱ्या साखरेचे प्रमाण जास्त असते. तसेच या पिकांच्या खोडांची साल जाड व टणक असते. त्यामुळे ही पिके वाळण्यासाठी जास्त वेळ घेतात. म्हणून ही पिके वाळविण्यापेक्षा मुरघास बनविण्यासाठी जास्त सोईस्कर आहेत.
मात्र, द्विदल वर्गातील पिकांचा मुरघास तयार करताना त्यात एकदलवर्गीय पिकाचा ६० ते ७० टक्के समावेश करावा.

*_मुरघासकरिता चारापिके कापणीची योग्य वेळ_*

_मका_ : पीक ५० टक्के फुलोऱ्यामध्ये असताना पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांनी कापणी करावी.
_ज्वारी_ : पीक ५० टक्के फुलोऱ्यामध्ये असताना पेरणीनंतर ५० ते ६० दिवसांनी कापणी करावी.
_बाजरी_ : पीक ५० टक्के फुलोऱ्यामध्ये असताना सर्वसाधारपणे पेरणीनंतर ४५ ते ५५ दिवसांनी कापणी करावी.
_ओट_ : पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांनी कापणी करावी.
_बहुवर्षीय वैरणपिके (संकरित हत्ती गवत, गिनी गवत इत्यादि)_ :  सर्वसाधारण पहिली कापणी पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांनी (१० आठवड्यांनी) व त्यानंतरच्या कापण्या प्रत्येकी ३० ते ४० दिवसांनी.

*_मुरघास बनविण्याची पद्धत_*

१. १ फूट लांब, १ फूट रुंद व १ फूट खोल आकाराच्या खड्ड्यामध्ये १५ किलो मुरघास तयार होतो. १ मीटर लांब, १ मीटर रुंद व १ मीटर खोल या आकाराच्या बांधकामामध्ये खड्ड्यामध्ये ६५० ते ७०० किलो मुरघास तयार होतो.
२. मुरघास तयार करण्यासाठी खड्डा जमिनीच्या खाली किंवा जमिनीच्या वरही वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. ह्या व्यतिरिक्त आपण २५ ते १००० किलो क्षमतेच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा प्लॅस्टिक ड्रममध्येही मुरघास तयार करू शकतो.
३. मुरघास तयार करण्यासाठी कापलेले पीक जागेवरच एक दिवस सुकू द्यावे. त्यानंतर चाऱ्याचे २ ते ३ सें.मी. लांबीचे तुकडे करून टाकीत किंवा पिशवीत भरावेत.
४. एक टन चाऱ्यासाठी एक किलो मिठाच्या पाण्यात द्रावण तयार करून हे द्रावण मुरघास भरताना प्रत्येक थरावर शिंपडावे.
५. चाऱ्याचा प्रत्येक थर भरल्यानंतर चांगला दाब द्यावा जेणेकरून कुट्टी केलेल्या चाऱ्यामध्ये हवा राहणार नाही. कारण, हवा राहिली तर तेथे बुरशीची वाढ होऊन मुरघास खराब होतो. म्हणून चारा चांगला दाबून भरावा.
६. टाकी किंवा बॅग भरल्यानंतर त्यावर जड वस्तू ठेवाव्यात; जेणेकरून मुरघास चांगला दाबून राहून मुरण्याची प्रक्रिया चांगली होईल.
७. सर्वसाधारणपणे ५० ते ६० दिवसांत मुरघास तयार होतो.

*_उत्तम मुरघास कसा ओळखावा?_*

तयार झालेल्या चांगल्या मुरघासाचा आंबूस वास येतो. हा चांगला मुरघास फिक्कट हिरवा किंवा तपकिरी रंगाचा दिसतो. उत्तम दर्जाच्या मुरघासाचा सामू (पी. एच.) ३.५ ते ४.५ असतो. ७५ ते ८५ टक्के पाण्याचे प्रमाण असते.
खराब झालेल्या मुरघासाचा रंग काळपट असतो. तसेच, तेथे बुरशीची वाढ दिसते.

*_मुरघास जनावरांना किती खाऊ घालावा_*

सुरवातीला मुरघास खाऊ घालताना तो इतर चार्याल सोबत किंव्हा खाद्यासोबत मिसळून द्यावा जेणेकरून जनावरांना मुरघासची सवय होईल.
पूर्ण वाढ झालेल्या जनावरास रोज १५ किलो मुरघास देऊ शकतो. लहान जनावरांना त्यांच्या वयोमानाप्रमाणे मुरघास द्यावा. १ वर्षापेक्षा कमी वयाच्या वासरांना अर्ध्या किलोपेक्षा जास्त मुरघास देऊ नये. शेळ्या-मेंढ्यांना दररोज किलोभर मुरघास द्यावा.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular