🟠रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; सामान्य कार्यकर्ता ते सात वेळा खासदार, एकही निवडणूक पराभूत न झालेला नेता
🔹भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर आता रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. राष्ट्रपती भवनाने देशातील १३ राज्यपालांची बदली केली आहे. रमेश बैस हे झारखंडचे विद्यमान राज्यपाल आहेत. त्याआधी त्यांनी त्रिपुरा राज्याचे राज्यपाल पद सांभाळले होते. रमेश बैस हे सात वेळा खासदार राहिलेले आहेत. भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. छत्तीसगढचे मध्य प्रदेशमधून विभाजन होण्याअगोदर त्यांनी मध्य प्रदेशचे आमदार म्हणूनही काम पाहिले. आजवर एकही निवडणूक पराभूत न झालेला नेता, अशी त्यांची ओळख आहे. लालकृष्ण अडवाणी यांचे ते निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळेच २०१९ च्या निवडणुकीत त्यांचे तिकीट कापण्यात आले, असे त्यांचे समर्थक म्हणतात.
छत्तीसगढच्या रायपूरमधून सुरुवात
रमेश बैस यांनी छत्तीसगढ मधील रायपूर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व केलेले आहे. १९७८ मध्ये ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेत निवडून आले होते. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख चढता राहिला. १९८० पासून १९८४ पर्यंत ते मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते. १९८९ मध्ये तेव्हाच्या एकत्रित मध्य प्रदेश (आता छत्तीसगढ) च्या रायपूर लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा खासदार बनले. त्यानंतर सलग सात वेळा त्यांनी लोकसभेचे प्रतिनिधित्व केले.
कधीच निवडणुकीत पराभूत झाले नाहीत
भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिपदाचाही अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. रमेश बैस हे आजवर एकही निवडणूक पराभूत झालेले नाहीत. लागोपाठ विजय मिळूनही २०१९ मध्ये त्यांचे तिकीट कापले गेले. बैस यांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुख्य प्रवाहातून बाजूला केले गेले. मात्र २०१९ ची लोकसभा निवडणूक पार पडताच. त्यांची वर्णी त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून केली गेली. लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबतच सुषमा स्वराज यांच्यासोबतही त्यांचे संबंध चांगले होते. सुषमा स्वराज या रमेश बैस यांना आपला बंधू मानत होत्या.
वाजपेयी सरकारच्या काळात होते मंत्री
२ ऑगस्ट १९४७ रोजी जन्मलेल्या रमेस बैस यांनी वाजपेयी सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून काम केले आहे.
……..
मुख्यसंपादक