Homeघडामोडीरशिया युक्रेन युद्धाचे 10 अपडेट ; आतापर्यंत 13414 मृत्यू तर बेपत्ता सैनिकांची...

रशिया युक्रेन युद्धाचे 10 अपडेट ; आतापर्यंत 13414 मृत्यू तर बेपत्ता सैनिकांची संख्या 7000 वर

नवी दिल्ली, 22 एप्रिल : रशिया-युक्रेनमधील युद्ध 58 व्या दिवसावर पोहोचलं आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेलं युद्ध अजूनही सुरूच आहे. युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका आणि मित्र राष्ट्रे रशियावर निर्बंध घालण्याच्या घोषणा करत आहेत. आता रशियाही पाश्चात्य देशांच्या शैलीत पलटवार करत आहे. गुरुवारी, रशियन सरकारने अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यासह 29 अमेरिकन आणि 61 कॅनेडियन नागरिकांना रशियामध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली. त्याचवेळी, रशियन संरक्षण मंत्रालयानं ट्विट केलं की युक्रेन हल्ल्यात 13414 रशियन सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर सात हजार सैनिक अद्याप बेपत्ता आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी युक्रेनला मदत करण्यासाठी 80 कोटी डॉलर्सची सैन्य मदत पाठवली आहे. यासोबतच त्यांनी युक्रेनसाठी अमेरिकन काँग्रेसकडे अधिक मदत मागणार असल्याचे सांगितले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेन्स्की यांनी या मदतीबद्दल अमेरिकेचे आभार मानले आहेत.

जाणून घेऊ रशिया आणि युक्रेन युद्धाचे आतापर्यंतचे 10 अपडेट्स (Russia-Ukraine War News Update)

  1. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणतात की, पुतिन कधीही संपूर्ण युक्रेन काबीज करू शकणार नाहीत. मात्र, रशियन हल्ल्यामुळे मारियुपोलमध्ये अडकलेल्या युक्रेनियन नागरिकांना अद्याप बाहेर काढण्यात आलेलं नाही.
  2. ब्रिटननं रशियातून येणाऱ्या चांदी, लाकूड उत्पादने आणि उच्च दर्जाच्या वस्तूंवर बंदी घातली आहे. त्याच वेळी, युरोपियन युनियनचं म्हणणं आहे की, ते रशियाचा सामना करण्यासाठी युक्रेनला शस्त्रं पाठवत राहतील.
  3. इस्रायलचं म्हणणं आहे की, ते युक्रेनियन सैन्याला संरक्षणात्मक उपकरणं पाठवत राहतील. इस्रायलचे संरक्षण मंत्री बेनी गॅंट्झ यांनी 20 एप्रिल रोजी युक्रेनियन सैनिकांना बुलेटप्रूफ जॅकेट आणि हेल्मेट देण्यास मान्यता दिली.
  4. CNN ने एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटलंय की, रशिया पूर्व युक्रेनमध्ये सातत्याने आपल्या सैन्याची संख्या वाढवत आहे. त्यांच्या सैन्याच्या एकूण 85 बटालियन येथे तैनात आहेत. यापैकी बहुतेक डॉनबासमध्ये तैनात करण्यात आले आहेत.
  5. पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणतात की, त्यांनी युक्रेनसाठी फिनिक्स घोस्ट ड्रोन प्रणाली विकसित केली आहे. युक्रेनचे सैनिक अगदी कमी प्रशिक्षणानंतरच ती वापरण्यास सुरुवात करतील. युक्रेनसाठी अमेरिकेने तयार केलेल्या मदत पॅकेजमध्ये अशा 121 प्रणालींचा समावेश आहे.
  6. क्रेमलिन समर्थक मीडिया राडोव्काने केलेल्या ट्विटनुसार, युक्रेन हल्ल्यात 13414 रशियन सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर 7,000 सैनिक अद्याप बेपत्ता आहेत. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या गोपनीय ब्रीफिंगमध्ये याची पुष्टी करण्यात आली. मात्र, राडोव्का यांनी नंतर हे ट्विट डिलीट केलं.
  7. रशियन सैन्याने युक्रेनमधील जापोरिझियावर क्षेपणास्त्राने हल्ला केला आहे. या हल्ल्यात आठ नागरिक जखमी झाल्याचं प्रादेशिक लष्करी प्रशासनानं सांगितलं. खोरित्सिया बेटावर ही क्षेपणास्त्रं डागण्यात आली आहेत.
  8. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर जेलेन्स्की यांनी जागतिक बँकेसोबतच्या गोलमेज परिषदेत सांगितलं की, एका अंदाजानुसार, आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना महिन्याला $7 अब्ज डॉलर्सची आवश्यकता असेल.
  9. डॉनबास प्रदेशात निर्णायक लढाईसाठी कीव आपली प्रमुख मोबाइल युनिट्स ठेवत आहे, कारण मोठ्या प्रमाणात तोफखाना असलेलं 40,000 हून अधिक रशियन सैन्य पूर्व युक्रेनमध्ये आहे आणि पूर्व युक्रेनमधील विनाशकारी लढाई अद्याप सुरू व्हायची आहे.
  10. लुहान्स्कचे गव्हर्नर सेर्ही गैडाई यांनी सांगितलं की, 18 एप्रिल रोजी क्रेमिना ताब्यात घेतल्यापासून रशियन सैन्याने आगेकूच केली आहे. आतापर्यंत, रशियन सैन्याने या प्रदेशाचा 80% भाग व्यापला आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular