Homeमुक्त- व्यासपीठवाचा आणि समृद्ध व्हा

वाचा आणि समृद्ध व्हा

जगामध्ये सर्वात मोठे ज्ञानाचे केंद्र कोणते असेल तर ती म्हणजे शाळा. ज्ञान दिल्याने वाढते घेतल्याने शहाणपण येते. अज्ञान नष्ट होते.ज्ञानामुळे स्वाभिमान तर येतोच पण त्याचबरोबर शिस्त सुद्धा आपण शिकतो. आपण सुसंस्कारी होतो. कारण ज्ञान हे अमृत आहे. त्याचा योग्य उपयोग कसा करावा हे ज्याला कळते तोच खरा ज्ञानी असतो. यासाठी गरज आहे चांगले पुस्तक वाचनाची. वाचन हे आपल्याला घडवते. ज्याला वाचण्याचा छंद जडला . त्याची मैत्री पुस्तकांशी होते. मित्र हे स्थल कालानुसार बदलतात. माणसांशी असणारी मैत्री कधीतरी तुटू शकते. मैत्रीत ,नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. पण पुस्तकांशी असणारी मैत्री कधीच तुटू शकत नाही. पुस्तक वाचनाचा छंद सर्वोत्तम छंद आहे. ‘वाचन म्हणजे डोळ्यांच्या मदतीने विचार करणे . वाचताना वरवरचं वाचण्याऐवजी सखोल वाचन करावे.
म्हणतात ना,
‘जो वाचतो पुस्तक/सुधारते त्याचे मस्तक,
मग होतो स्वाभिमानी / कुणापुढेही होत नाही नतमस्तक’…
वाचनाने माणूस समृद्ध होतो, श्रीमंत होतो. ती श्रीमंती पैशाची, व्यक्तिमत्त्वाची,सुख, शांती, समाधान, चांगुलपणाची असते. आपला भविष्यकाळ उज्ज्वल करण्याची ताकद वाचनामध्ये असते. वाचता येणाऱ्या प्रत्येक माणसात स्वतःची उन्नती करण्याचं, जगण्याला अनेक संदर्भ देण्याचे, पूर्णत्वाने रसरशीत आयुष्य जगण्याचं सामर्थ्य असतं. यामुळे पुस्तक वाचन काळाची गरज आहे. चांगली पुस्तके समाज घडवतात. शेकडो वर्ष झाली भगवतगीता, कुराण, बायबल,इतर धर्मग्रंथांना. संतविचार ,महापुरुषांची पुस्तक यातून समाज घडत आहे. घडत राहील. एवढी ताकद या पुस्तकांमध्ये असते. आलेल्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याचे सामर्थ्य पुस्तकांमध्ये असते. एखादे चांगले पुस्तक हाती आले की ते आपले आयुष्य बदलून टाकते. त्या पुस्तकातून स्फूर्ती मिळते. जगण्याची नवी दिशा मिळते. दुसऱ्या कोणत्याही माध्यमांपेक्षा क्षणार्धात तुमच आयुष्य बदलणार माध्यम म्हणजे वाचन आहे.
मोबाईल, टीव्ही, रेडिओ , इतर साधन मनोरंजन करतील. त्यातील एखाद्या कार्यक्रमातून काहीतरी शिकवण मिळेल. परंतु समृद्ध जीवन जगण्यासाठी पुस्तकच हवे.
आपण अवतीभवती पाहिले तर असे लक्षात येते की, जो माणूस, समाज वाचनापासून दुरावला. तो सुख ,शांती, समृद्धीपासून दुरावलेला असतो. गुन्हेगारीचे, व्यसनाचे प्रमाण वाढलेले असते. सुशिक्षित वाचक समाजात एकमेकांना मदत करणे, सुखदुःखात जाणे, मानवता जपण्याचे कार्य करत असतो . वाचनामुळे माणूस सकारात्मक विचार करू लागतो. यामुळे चांगले जीवन जगता येते. वाचता येणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये स्वतःला मोठे करण्याची क्षमता आहे. तो अनेक अंगांनी त्याचं आयुष्य फुलवू शकतो. वाचणारा माणूस समृद्ध आयुष्याचा पुरेपूर आस्वाद घेतो. या आयुष्याची लढाई जिंकायची असेल तर वाचन गरजेचे आहे.
मी माझ्या मित्रमैत्रिणींना नेहमी विचारतो , तू किती चित्रपट पाहिलेस,. त्यांची चित्रपटांची नावे तोंडपाठ असतात. काही मित्र मैत्रिणी चित्रपटातील प्रसंग, घटना, गाणी, कहाणी जशीच्या तशी सांगतात.
मग मी त्यांना दुसरा प्रश्न विचारतो, तुम्ही वाचन करता का ?मग वेगवेगळे कारणे सांगतात. वेळच मिळत नाही, कामच असते. काहींना आवडच नसते.
जे पुस्तक वाचत नाहीत अशा माणसांचे जीवन ताणतणावाचे असते. संकट आली की ते कोलमडून जातात. परंतु वाचणारा मार्ग शोधतो आणि पुढे चालत राहतो. मला वाटतं सर्व लहान थोरांनी वाचन केलं पाहिजे.
कसे जगावे ?कसे वागावे? कसे मरावे ?हे पुस्तक सांगतात. यासाठी वाचन हवे. काही पुस्तक चाखायची असतात, काही गिळायची असतात आणि काही चावून पचवायची असतात. विचारी लोक आयुष्यातल्या त्रासावर पुस्तकातून दिलासा मिळवतात. पुस्तकांवर प्रेम करायला शिका. वाचन ही एक अशी गोष्ट आहे ती सर्वांना एक सारखे वागवते. जगात तो माणूस कोठेही गेला तरी त्याच्या विद्वत्तेला सलाम केला जातो.
वाचनाचा जीवनात निश्चित उपयोग होतो. ज्यांनी ज्यांनी इतिहास घडवला त्याला कारण आहे पुस्तक. त्यांनी वाचन केलं. नवनवीन साहित्याची निर्मिती केली. समाज ते वाचून बदलून गेला. माणसात, समाजात क्रांती घडवते वाचन. म्हणून जास्तीत जास्त चांगली पुस्तके वाचा. सामर्थ्यवान ग्रंथ हे तापलेल्या लोखंडी सळयाप्रमाणे असतात. एखाद्या संस्कृतीमधील समाजमनावर त्यांचा छाप उमटतो.मग असे ग्रंथ वाचण्यासाठी अगदी मोजक्या लोकांनीच वेळ काढला असला, तरीही हा परिणाम साधला जातो. लिहिता-वाचता न येणे म्हणजे एकच दरवाजा असलेल्या जगात राहिल्यासारखे आहे, त्या एका दाराने प्रवेश केल्यावर आज काहीच नाही. म्हणून दररोज थोडे थोडे वाचन करा.
म्हणतात ना, ‘शरीर व्यायामाने घडते. प्रतिकार शक्ती वाढते, चपळता येते. जितका व्यायाम गरजेचा त्यापेक्षाही वाचन गरजेचे. अन्न हे शरीराचे खाद्य असेल. परंतु वाचन हे मनाचे खाद्य आहे. ज्याचे मन चांगले तो चांगला. मन चांगलं ठेवण्यासाठी वाचनाची नितांत आवश्यकता आहे.’ शरीराचा व्यायामाशी जो संबंध आहे, तोच मनाचा वाचनाशी आहे. मनाला आत्मचिंतन करायला लावणे हाच पुस्तकांचा खरा उद्देश असतो.
विद्येचे महत्त्व सांगताना महात्मा फुले म्हणतात,
विद्येविना मती गेली/मतीविना नीती गेली/
नीतीविना गती गेली/गतीविना वित्त गेले/
वित्ताविना शूद्र खचले/एवढे अनर्थ एका अविद्येने केले/
या देशात जे जे महापुरुष संत विचारवंत होऊन गेले. ते वाचनामुळे.
संत तुकाराम महाराज म्हणतात,
असाध्य ते साध्य करिता सायास /
कारण अभ्यास तुका म्हणे //
संत रामदास म्हणतात,’जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे , शहाणे करून सोडावे सकल जन.’
संत शेख महंमद महाराज यांच्या साहित्यातून आजही जगण्याची प्रेरणा मिळते. अज्ञानी माणूस गुरु केला तर ते सांगतात, आंधळी लागले आंधळ्याच्या पाठी/ पडले शेवटी भवडामध्ये // म्हणून संगत चांगल्याची करा. ज्ञानी माणसाशी करा.असा संदेश ते देतात.
समाजाने वाचन करावे, त्यातून शिकावे. यासाठी या संत महापुरुषांनी ग्रंथांची निर्मिती केली. या ग्रंथांमधून अनमोल विचार दिले. हे विचार आपण वाचले पाहिजे.
वाचनाच्या छंदामुळे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले. त्यांनी भारत देशाची राज्यघटना लिहिली. राज्य घटनेमुळे देशात सुसूत्रता आली. या राज्यघटनेनुसार आपला देश चालतो. एवढी ताकद आहे पुस्तकात.
वाचन वेडी माणसंच इतिहास घडवितात. मला माहित आहे एका जागी बसून तासन्तास वाचायला सर्वांनाच जमेल तसे नाही. पण जमेल तेवढं आणि जमेल तसं वाचन करायला काय हरकत आहे. एकदा आवड निर्माण झाली की सवड मिळते.
धर्म संस्कृती व इतिहास यांना जिवंत ठेवण्याचे काम पुस्तकांनी केले. ते पुस्तक वाचूनच समाज घडू शकतो.वाचनामुळे आपल्याला आपल्या जगाचा, आपल्या इतिहासाचा, आपल्या स्वतःचा शोध लागतो. वाचनाची जागा टीव्ही, सिनेमा, संभाषण किंवा इतर कोणतेही साधन घेऊ शकत नाही.म्हणून पुस्तकांशी मैत्री करा. मित्रांप्रमाणेच पुस्तकाची निवड ही काळजीपूर्वक करायची असते. आपण जे वाचतो त्यासाठी आपण जबाबदार असतो. माणूस फक्त दोन गोष्टीतून शिकू शकतो,एक म्हणजे वाचन करून आणि दुसरं म्हणजे हुशार माणसांच्या सहवासातूनही तो खूप काही शिकतो. कारण हुशार माणसांनी पुस्तके वाचलेली असतात.
वाचा वाचा आणि समृद्ध व्हा . या जगात वाचन संस्कृती वाढवा. सर्वांचाच व्यक्तिमत्व विकास वाचनामुळे होईल.
पुस्तकाशिवाय घर म्हणजे आत्मा नसलेलं शरीर होय. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर यशस्वी लोक जे करतात ते करा. आणि यशस्वी लोक करत असलेल्या अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे वाचनाने श्रीमंत व्हा.
विनाकारण वायफट खर्च करण्यापेक्षा पुस्तक विकत घ्या आणि ते वाचा. वाचनाचा छंद जोपासा. ही आपणास माझी कळकळीची विनंती.
वाचन संस्कृती टिकली तर
समाज सुसंस्कारी राहील
नाहीतर अज्ञानाचा अंधकार पसरून
गिधाडांची संस्कृती निर्माण होईल.
एवढेच सांगेन, वाचनाने येईल श्रीमंती. वाचाल तर वाचाल. वाचाल तर टिकाल. वाचाल तर समृद्ध व्हाल.
वाचाल तर शिकाल. हे सत्य आहे त्रिकाल.

    लेखक - श्री.किसन आटोळे सर
       वाहिरा ता.आष्टी जि.बीड
         
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular