Homeसंपादकीयसमाजोत्कर्षाचं विसर्जन…

समाजोत्कर्षाचं विसर्जन…

 उद्देश भरकटला की माणसंसुद्धा त्या उद्देशाच्या मागे हताशपणे भरकटली जातात आणि स्वतःच भरडलीही जातात. मग उद्देश आणि ध्येय याचा विसर पडुन तिच माणसं पळतेल्याच्या पाठी लागतात. समाजातलं आपलं स्थान पक्कं करण्यासाठी, श्रेयासाठी समाजसेवा हा एक उरलेला उपाय शोधून राजकारणी मुखवटा परिधान करून समाजाला विकासाच्या टोप्या घालण्याचं महत्वाचं कार्य अशा भरकटलेल्या माणसांकडून केलं जातं. 
  सामाजिक उद्देश, ध्येय पूर्ण करण्यासाठी समाजाला बरोबर घेऊन त्यांच्याबद्दल आदर, मान सन्मान राखून समाजामध्ये मिळून मिसळून, त्यांच्या भावना समजून घेऊन, मतभेद, हेवेदावे, राग, द्वेष ज्यांच्या मनात असतील त्यांना प्रेमाने समजावून, अतिसंवेदनशीलतेला नियंत्रणात आणून सर्वांशी पद्धतशीरपणे संवाद साधून जो प्रयत्न योग्य निर्णयापर्यंत पोहचतो तेव्हा उद्देश आणि ध्येय गाठता येणं सोपं होतं. आणि हे सर्व करण्यासाठी समाजाप्रती असलेली आत्मियता, तळमळ आणि समाजकार्य करण्याची धडपड ही प्रथम अंगी बाणवावी लागते. समाजसेवेच्या नावाखाली जो कोणी उठेल त्याची पार्श्वभूमी, त्याची ओळख, सामाजिक खरी आत्मियता, तळमळ,निस्वार्थ परोपकार, सामाजिक भ्रांत, ज्ञान ,कतृत्व, कर्तव्य, कौशल्य आणि विकासाची कास काय आहे ?या सर्व गोष्टींची पडताळणी करणं फार गरजेचं आहे. नाहीतर जो उठेल त्याच्या धोतराचा सोगा किंवा पदराचा काठ धरून त्यांच्या हो ला हो म्हणून सामाजिक तमाशा करणं म्हणजे पळतेल्याच्या पाठी लागण्यासारखच आहे. 
 माध्यम कोणतही असो ते चुकीचं नसावं. त्यामधून जे चांगलं शिकायला मिळेल ते शिकावं. नाहीतर 'शिक्षणाच्या आईचा घो' म्हणनंच रास्त ठरेल. समजावण्याचं तात्पर्य एकच होतं, की गाव एकसंध असताना त्याचं बुद्रुक आणि खुर्द असा संदेश पसरवणं मूर्खपणाचं. तिच एकसंधता आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न केला असता तर ' मी 'आणि ' आम्ही ' हे 'बुद्रुक 'आणि 'खुर्द 'सारखे शब्द आणि आपल्या गाववाल्यांच्या शब्दकोशात नसताना ते जबरदस्तीनं लादनं आणि मी सांगेन ती पूर्व दिशा हा आदेश सोडनं म्हणजे ' समाजोत्कर्षाचं ' गढूळ पाण्याच्या तळ्यात विसर्जन करण्यासारखंच वाटतं. 
  'भरीव कार्य' करायचंच पण त्या 'भरीव 'कार्याचा पाया खोदणार कोण? "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालाशी कळसं " याची थोडातरी प्रचिती 'भरीव कार्याची'आश्वासनं देणार्‍यानां यावी. 'भरीव कार्याला' किंवा सामाजिक कार्याला कोणाचाही विरोध नसणारच. पण कोणी विरोधक असलाच तर त्याला गोळी मारून त्याचं तोंड बंद करणं म्हणजे चांगल्या कार्याला गालबोट लागण्यासारखं होतं. तेव्हा अशावेळी सहनशीलता कार्याच्या आश्वासनांमध्ये भक्कमपणे असावी तरच रचलेला पाया आयता मिळत असेल तर कळसापर्यंत पोहोचणं पण तेवढच महत्वाचं झालं असतं. आणि तोही एक आदर्श बनला असता. 
   पाण्यात तरंगणारी बोट उगाच भरकटणार नाही. जर तिला योग्य दिशादर्शक मिळाला तर ती सहजपणे किनार्‍यावर पोहोचते. आपला समाज हा मेंढरासारखा चालू लागलाय. वाघाला बघून पळून जाणारी शिकार कमी नाही .पण त्याच्या भूकेवर त्याची शिकार अवलंबून असते हे ती शिकार विसरून गेलेली असते. तेव्हा समाज हा घटक चांगलं आणि वाईट काय हा विषय हाती न घेता मतदान करण्याचा हक्क बजावतो. आणि पश्चात्ताप पाचवीला पुजतो. प्रचारातून प्रसार, मेळाव्यातून विकास आणि हळदीकुंकूच्या माध्यमातून सुखी संसाराची कास.... असे होत असेल तर जो तो मुद्दा बनुन धर्म, जातीचा फेटा आणि दादागिरीचा कासोटा आवळून समाजात वावरला असता. आणि जनतेचं गरजेचं असलेलं मौल्यवान मत हे प्रेताच्या टाळूवरचं लोणी चाटून खाणार्‍याच्या घशात कायमचं टाकून द्यावं लागलं असतं. कारण जनतेचं मत हे त्यांची गरज असते हे आपण विसरून जातो. 
  समाजासाठी कार्य करणारे काही कमी नाहीत. ज्याची ऐपत तो कधीच कमी पडत नाही. त्याची समाजाप्रती धडपडही समाज ओळखून असतो. आपल्याकडे पैसा आहे म्हणून कोणी समाजात कार्य करण्यासाठी वावरत असेल पण त्याच्याकडे लागणारी मधूर वाणी आणि शब्दांचं सुपीक वावर नसेल तर तो समाजाला खाईत लोटल्याशिवाय राहणार नाही. मन, मेंदू आणि मनगटाचा मेळ झाला की समोरच्याला आसमान दाखवणं सोपं जातं. हे सूत्र मैदानी खेळासाठी उपयुक्त पडतं. पण समाजसेवेसाठी पैसा, घमेंड, स्वार्थ आणि शब्दांचा रटाळ भडीमार हा बाजुला सारुन स्वतः दिशादर्शक बनून, समाजाचा हात हाती धरून सोबतीनं घेऊन मार्ग काढला की समाजही सेवेपासून दूर जाणार नाही याची खात्री होते. 
  तात्पर्य इतकच की, कळपाची सुद्धा मेंढराला भिती असावी. कोणता झेंडा हाती घ्यायचा स्वार्थाचा की परमार्थाचा, पक्षाचा की देशाचा ही प्रत्येक हाताला माहिती असावी. आणि योग्य दिशादर्शक बनून सर्वानीच भडकणारी ठिणगी ,आग न बनता भरकटणाऱ्याचे आणि भरडणाऱ्याचे हात धरून सामाजिक कार्यासाठी स्वतःच एक आदर्श घालून आपला गाव, समाज सुजलाम सुफलाम बनवु आणि आनंदी, गुण्यागोविंदाने राहु. तरच 'जीवन नुसतं जगायचं नसतं, जगताना काहीतरी शिकायचं असतं 'असं काहीतरी चांगलं शिकून आपण एकमेकांचे आदर्श बनू. आणि कार्य सिद्धीस नेण्यास सदैव तत्पर राहू......! 
 • संतोष शिवाजी बामणे
  मु. पो. कोट,
  ता. हुक्केरी, जि. बेळगाव
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular